IPL 2020: हैदराबादच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे पंजाबच्या फलंदाजांना २० षटकांत केवळ १२६ धावांपर्यंतच मजल मारता आली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय हैदराबादच्या खेळाडूंनी सार्थ ठरवला. राशिद खान, जेसन होल्डर आणि संदीप शर्मा या तिघांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे पंजाबच्या संघाला फारशी फटकेबाजी करता आली नाही. निकोलस पूरनने शेवटच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे संघाला १२०चा आकडा पार करता आला. परंतु, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार राहुल धावा करण्यात अपयशी ठरले.

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. नियमित फलंदाज मयंक अग्रवाल काही कारणास्तव संघाबाहेर असल्याने मनदीप सिंगला संधी देण्यात आली. सलामीला आलेला मनदीप १७ धावांवर बाद झाला. त्यानंतर ख्रिस गेल २० धावांवर माघारी परतला. खेळपट्टीवर स्थिरावलेला कर्णधार राहुल राशिदच्या गुगलीचा बळी ठरला. राहुल संयमी खेळी करत वाटचाल करत होता. पण धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात राशिदच्या चेंडूवर त्याने एक पाय पुढे काढत फटका खेळला. त्यावेळी चेंडू बॅट आणि पॅडच्यामधून थेट स्टंपवर लागला. आपण कसे बाद झालो हे काही काळ राहुललाही कळलं नव्हतं. राहुलने तर थेट स्वत:च हातच मैदानावर टेकवला आणि नंतर निराश होऊन तंबूत परतला. त्याने २७ धावा केल्या.

राहुलनंतर संघाचा डाव कोणीही सावरू शकलं नाही. मॅक्सवेल (१२), हुड्डा (०), ख्रिस जॉर्डन (७) आणि मुरूगन अश्विन (४) झटपट बाद झाले. निकोलस पूरनने शेवटपर्यंत नाबाद राहत ३२ धावा केल्या आणि संघाला १२६ धावांपर्यंत मजल मारून दिली.