मुंबईविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूच्या संघाने १६५ धावांपर्यंत मजल मारली. देवदत्त पडीकल आणि जोशुआ फिलीप यांनी डावाला दमदार सुरूवात करून दिली होती. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी साफ निराशा केली. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ३ बळी टिपत बंगळुरूच्या धावगतीला चाप लावला. पडीकलने एकाकी झुंज देत ४५ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. पण बंगळुरूच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही.

बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूचे सलामीवीर देवदत्त पडीकल आणि जोशुआ फिलीप यांनी पॉवर-प्लेच्या षटकांमध्ये दमदार सुरूवात करत अर्धशतकी (५४) भागीदारी केली. जोशुआ फिलिप २४ चेंडूत ३३ धावा काढून माघारी परतला. पाठोपाठ कर्णधार विराट कोहली ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर डीव्हिलियर्सने पॅटिन्सनला विचित्र अशा षटकार लगावला. त्याने लगावलेला षटकार पाहून विराटही आश्चर्यचकित झाला.

पाहा तो व्हिडीओ-

पण शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या नादात डीव्हिलियर्स (१५) झेलबाद झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने बाऊन्सर चेंडू टाकत शिवम दुबेला २ धावांवर माघारी धाडलं. त्याच षटकात खेळपट्टीवर स्थिरावलेल्या देवदत्त पडीकललाही बुमराहने ७४ धावांवर झेलबाद केले. पडीकल बाद झाल्यावर बंगळुरूच्या डावाला गळती लागली. मुंबईच्या वेगवान आघाडीने धावगतीवर चाप लावल्याने बंगळुरूला २० षटकात ६ बाद १६४ धावांपर्यंतच मजल मारता आली. बुमराहने ३ तर बोल्ट, राहुल चहर आणि पोलार्डने १-१ बळी टिपला.