‘करो वा मरो’ अशा परिस्थिती असलेल्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूकडून देवदत्त पडीकल आणि जोशुआ फिलीप यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला पण पडीकल स्वस्तात बाद झाला. पडीकल बाद झाल्यावर विराट मैदानावर आला. वेगवान गोलंदाजांनी टाकलेले चेंडू स्विंग होत असल्याचं विराटने पाहिलं. त्यामुळे विराट क्रीजमधून बाहेर निघून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत होता.

विराटचा खेळण्याचा अंदाज पाहताच कर्णधार वॉर्नरने यष्टीरक्षक साहाला स्टंपच्या जवळून यष्टीरक्षण (Close Keeping) करण्यास सांगितलं. तसंच एक्स्ट्रा कव्हरवर असलेल्या विल्यमसनला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर (फलंदाजाच्या आणखी जवळ) आणलं. त्यानंतर संदीप शर्माने अगदी ठरलेल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आणि विराटने चूक करत चेंडू टोलवला. चेंडू वेगाने हवेत जात असतानाच विल्यमसनने उत्कृष्ट असा झेल पूर्ण केला आणि विराटला ७ धावांवर माघारी पाठवलं.

असा बाद झाला विराट…

विराट माघारी परतल्यावर एबी डीव्हिलियर्सलाही फारसा प्रभाव पाडता आला नाही. अतिशय संथ अशा खेळपट्टीवर फिरकीपटूच्या गोलंदाजाला त्याने आपली विकेट दिली. बंगळुरूकडून डीव्हिलियर्स आणि जोशुआ फिलीप वगळता इतर सर्व फलंदाजांनी निराशा केली.