हैदराबादचा १० धावांनी पराभव करत विराट कोहलीच्या नेतृत्वातील आरसीबी संघाने आयपीएलच्या १३ व्या हंगामाची सुरुवात दणक्यात केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीचा हा ५० वा विजय आहे. या विक्रमासह ५० पेक्षा जास्त विजय मिळवून देणारा विराट कोहली आयपीएलमधील चौथा कर्णधार ठरला आहे.

याआधी चेन्नई सुपरकिंग्स संघाचा कर्णधार एम.एस. धोनी (१०५ सामन्यात विजय), कोलकाता संघाचा कर्णधार गौतम गंभीर (७१ सामन्यात विजय) मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा (६० सामन्यात विजय) यांच्या नावार हा विक्रम आहे. ५० पेक्षा जास्त सामन्यात संघाला विजय मिळवून देणारे सर्व कर्णधार भारतीय आहेत. यामध्ये विराट कोहलीची भर पडली आहे.

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून विराट कोहली आरसीबीच्या संघात आहेत. २०११ मध्ये आरसीबीच्या संघाचं नेतृत्व विराट कोहलीकडे सोपवली आहे. त्यानंतर विराट कोहलीने १११ सामन्यात नेतृत्व केलं आहे. त्यापैकी ५० सामन्यात विजय मिळवला आहे. तर ५५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीचा संघ २०१६ मध्ये अंतिम सामन्यात पोहचला होता. विराटने या सत्रात चार शतकासह ९७३ धावा केल्या होत्या.