चेन्नईविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीच्या बंगळुरू संघाने २० षटकात ६ बाद १४५ धावांपर्यंत मजल मारली. डावाच्या मधल्या टप्प्यात (६ ते १५ षटके) चेन्नईच्या गोलंदाजांनी अतिशय शिस्तबद्ध कामगिरी करत बंगळुरूच्या फटकेबाजीला आळा घातला. विराट-डीव्हिलियर्स जोडीने ८२ धावांची भागीदारी केली, पण वेगवान धावा करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे बंगळुरूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

विराटने झुंजार खेळी करत अर्धशतक ठोकलं. ४३ चेंडूत विराटने ५० धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत केवळ १ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. कोहलीचे हे ३९वे IPL अर्धशतक ठरले. रोहित शर्माला मागे टाकत त्याने शिखर धवनच्या कामगिरीशी बरोबरी केली. ३९ अर्धशतकांचा टप्पा गाठणारा कोहली तिसरा फलंदाज ठरला. या यादीत ४६ अर्धशतकांसह हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर अव्वल आहे. तर विराट आणि शिखर धवन संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान, सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला उतरलेली फिंच-पडीकल जोडी जपून फलंदाजीला सुरूवात केली. पण फिंच १५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर देवदत्त पडीकल २२ धावा काढून माघारी परतला. कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांनी बराच खेळ खेळपट्टीवर तळ ठोकला पण चेन्नईच्या गोलंदाजांनी त्याला फटकेबाजी करून दिली नाही. ६८ चेंडूत त्यांना ८२ धावांचीच भागीदारी करता आली. विराट कोहलीने अर्धशतक ठोकलं पण मोठे फटके खेळताना डीव्हिलियर्स ३९ धावांवर तर विराट ५० धावांवर माघारी परतला. मोईन अली आणि ख्रिस मॉरिसही स्वस्तात बाद झाला. त्यामुळे बंगळुरूला २० षटकांत केवळ १४५ धावाच करता आल्या.