‘आयपीएल’मधील किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याबद्दल रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या या सामन्यात बेंगळूरुचा ९७ धावांनी मानहानीकारक पराभव झाला होता.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूने षटकांची गती कमी राखून प्रथमच ‘आयपीएल’च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे संघाचा कर्णधार कोहली याला १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, असे ‘आयपीएल’च्या पत्रकात म्हटले आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या कोहलीच्या कामगिरीवर जोरदार टीका झाली. शतकवीर के. एल. राहुलचे त्याने सोडलेले झेल अतिशय महागडे ठरले. त्यानंतर फलंदाजीतही तो अपेक्षित योगदान देऊ शकला नाही.