फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची सुरेख गोलंदाजी आणि त्यांना इतर गोलंदाजांची मिळालेली साथ याच्या जोरावर RCB ने शारजाच्या सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचा धुव्वा उडवला. १९५ धावसंख्येचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या KKR च्या फलंदाजांची पुरती दाणादाण उडाली. KKR चा संघ केवळ ११२ धावांपर्यंत मजल मारु शकला आणि RCB ने ८२ धावांनी विजय मिळवला. पण या सामन्याचा सामनावीर ठरला तडाखेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्स. फिंच-पडीकल जोडीने RCBला चांगली सुरूवात दिली होती, पण डीव्हिलियर्सने संघाला १९४ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्याने ३३ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७३ धावा कुटल्या. त्याच्या खेळीचे साऱ्यांनीच कौतुक केलं.

एबी डीव्हिलियर्सचा दणका-

“खेळपट्टीवर अजिबात ओलावा नव्हता. त्यामुळे दव पडण्याची शक्यतादेखील नव्हती. सर्व खेळाडू खेळपट्टीवर फलंदाजी करताना बाचकत होते, पण डीव्हिलियर्सची खेळी मात्र अतिमानवीय होती. फलंदाजीला उतरलो तेव्हा आमच्या डोक्यात १६५ धावांचा टप्पा गाठण्याचा विचार होता, पण त्याचे १९४ कसे आणि केव्हा झाले ते आपण पाहिलंच. ते सारं खरंच अविश्वसनीय होतं. मी जेव्हा खेळायला आलो तेव्हा थोडे चेंडू खेळून फटकेबाजी करावी असा माझा विचार होता. पण डीव्हिलियर्सने अप्रतिम खेळ करायला सुरूवात केला. तिसऱ्या चेंडूपासूनच त्याने फटकेबाजीला सुरूवात केली आणि जे त्याने केलं ते फक्त तोच करू शकला असता”, अशा शब्दात विराटने त्याच्या खेळीची स्तुती केली.

दरम्यान, RCB चा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर देवदत पडीकल आणि फिंच यांनी संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. पडीकल-फिंच जोडी बाद झाल्यावर डीव्हिलियर्स फटकेबाजीची जबाबदारी घेतली. डिव्हीलियर्सने तडाखेबाज खेळी करत नाबाद ७३ धावा केल्या. तर विराट कोहलीने नाबाद ३३ धावा करत त्याला उत्तम साथ दिली. १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. टॉम बँटन, नितीश राणा, शुबमन गिल, दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन आणि आंद्रे रसल असे नावाजलेले फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. KKRकडून शुबमन गिलने सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली झुंज दिली. पण त्याच्या खेळीचा फारसा प्रभाव पडला नाही.

——-