बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पुणेकर ऋतुराज गायकवाडच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईने ८ गडी राखून सहज विजय मिळवला. विराट कोहलीने झुंजार अर्धशतक झळकावत बंगळुरूला २० षटकात ६ बाद १४५ धावांपर्यंत मजल मारून दिली. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना फाफ डु प्लेसिस आणि अंबाती रायडू मोठी खेळी करू शकले नाहीत, पण सलामीवीर ऋतुराज गायकवाडने नाबाद ६५ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांनी बराच खेळ खेळपट्टीवर तळ ठोकला पण चेन्नईच्या गोलंदाजांनी त्यांना फटकेबाजी करून दिली नाही. ६८ चेंडूत या दोन तडाखेबाज फलंदाजांना केवळ ८२ धावांचीच भर घालता आली. त्यांच्या या खेळीची माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने खिल्ली उडवली. विरू की बैठक या त्याच्या सोशल मीडियावरील कार्यक्रमात सेहवाग म्हणाला की विराट-डीव्हिलियर्स मैदानावर असताना बंगळुरूची फलंदाजी कोमात असल्यासारखं वाटत होतं. त्यांची खेळी पाहून झोप आली. म्हणून मी दुपारी एक शांत झोप (power nap) घेतली. पण उठून बघितलं तरीही त्यांची फलंदाजी पुढे सरकली नव्हती, असं सेहवाग म्हणाला.

विराटने सामन्यात अर्धशतक ठोकलं. पण दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळता आले नाहीत. डीव्हिलियर्सने ३९ तर विराटने ५० धावा केल्या.