आयपीएलच्या तेराव्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने यंदा निराशाजनक कामगिरी केली. एरवी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा हा संघ यंदा गुणतालिकेत तळातल्या स्थानावर फेकला गेला आहे. प्रमुख खेळाडूंची माघार, महत्वाच्या खेळाडूंना झालेली दुखापत यामुळे चेन्नईचा संघ तेराव्या हंगामात उभारी घेऊच शकला नाही. दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज इम्रान ताहीरला चेन्नईने आतापर्यंत एकही सामन्यात संधी दिली नाही. २०१९ साली इम्रान ताहीरने सर्वाधिक बळी घेऊन पर्पल कॅपचा मान मिळवला होता. परंतू यंदा संघाची घडी बसवण्यात चेन्नईचा संघ आपली लय हरवून बसला. मध्यंतरी इम्रान ताहीरचा राखीव खेळाडूंच्या बेंचवर बसलेला, खेळाडूंसाठी ड्रिंक्स घेऊन जात असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

भारतीय फिरकीपटू रविचंद्रन आश्विनच्या यु-ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ताहीरला यंदाच्या हंगामात अद्याप न मिळालेल्या संधीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ताहीरने आपली खंत बोलून दाखवली. “मला काहीच कल्पना नाहीये. याआधी फाफ डु-प्लेसिसला पूर्ण हंगाम ड्रिंक्स घेऊन येताना मी पाहिलं आहे, तेव्हा मला फार वाईट वाटायचं. टी-२० मध्ये त्याची कामगिरी चांगली आहे. यंदा तो जे काम करत होता ते मी करतो आहे, आता मला जाणवतंय की डु-प्लेसिसला त्यावेळी कसं वाटत असेल. मी यासंदर्भात त्याच्याशी मध्यंतरी बोललो देखील.”

२०१९ च्या हंगामात इम्रान ताहीरने १७ सामन्यात २६ बळी घेल पर्पल कॅपचा मान मिळवला. यंदा चेन्नईने पियुष चावला, रविंद्र जाडेजा आणि कर्ण शर्मा अशा ३ फिरकीपटूंना संधी दिली. परंतू तिन्ही गोलंदाजांकडून अपेक्षित यश मिळत नसतानाही चेन्नईने इम्रान ताहीरचा विचार केला नाही. मध्यंतरी काही खेळाडूंनी चेन्नईच्या या निर्णयाबद्दल आश्चर्यही व्यक्त केलं. सध्या चेन्नईचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर फेकला गेला आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये तरी ताहीरला संघात स्थान मिळतंय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.