सलामीवीर फिंच-पडीकल जोडीची दमदार भागीदारी आणि त्याला अखेरच्या षटकांमध्ये एबी डिव्हीलियर्सच्या फटकेबाजीची मिळालेली जोड याच्या बळावर RCBने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात २० षटकांत १९४ धावांपर्यंत मजल मारली. डिव्हीलियर्सने झळकावलेलं धडाकेबाज अर्धशतक RCB च्या डावाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं. चांगली सुरुवात केल्यानंतर मधल्या षटकांमध्ये RCBच्या धावगतीवर अंकुश लावण्यात KKRचे गोलंदाज यशस्वी ठरले होते, पण डिव्हीलियर्सच्या तडाख्यापुढे KKRचे गोलंदाज हतबल ठरले. या डावात डीव्हिलियर्सने लगावलेला एक षटकार खास ठरला.

डीव्हिलियर्स आणि विराट फलंदाजी करत असताना १५व्या षटकात कमलेश नागरकोटी गोलंदाजी करत होता. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर डीव्हिलियर्सने उत्तुंग असा षटकार लगावला. तो षटकार थेट मैदानाबाहेर रस्त्यावर गेला. इतकंच नव्हे तर रस्त्यावरून जाणाऱ्या कारच्या पुढ्यातच तो चेंडू पडला आणि रस्ता पार करून दुसऱ्या टोकाला गेला.

पाहा तो उत्तुंग षटकार-

दरम्यान, RCB चा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर देवदत पडीकल आणि फिंच यांनी संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. RCB ची ही जोडी मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असतानाच पडीकल ३२ धावांवर बाद झाला. फिंच आणि विराट कोहली यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अर्धशतकाच्या आधीच फिंच त्रिफळाचीत झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या डीव्हिलियर्स फटकेबाजीची जबाबदारी घेतली. डिव्हीलियर्सने तडाखेबाज खेळी करत नाबाद ७३ धावा केल्या. तर विराट कोहलीने नाबाद ३३ धावा करत त्याला उत्तम साथ दिली.