आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सवर १५.५० कोटींची बोली लावली. यासह कमिन्स तेराव्या हंगामातला सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाची यंदाच्या हंगामात आतापर्यंतची कामगिरी ही संमिश्र स्वरुपाची राहिलेली आहे. पण कोलकात्याचा संघ अजून पूर्ण क्षमतेने खेळत नसल्याचं मत कमिन्सने व्यक्त केलं. परंतू अजुनही संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम असल्यामुळे कमिन्सने समाधान व्यक्त केलं.

“चार विजय आणि तीन पराभव…बघायला गेलं तर हा निकाल काही वाईट नाही. आम्ही गुणतालिकेत अव्वल चारमध्ये आहोत. परंतू आम्ही अद्याप आमचा सर्वोत्तम खेळ केलेला नाहीये. समोरच्या संघाला धडकी भरेल असा खेळ आमच्याकडून झालेला नाही.” मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्याआधी पॅट कमिन्स पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. आतापर्यंत मिळवलेल्या ४ विजयांपैकी कोलकाता नाईट रायडर्स चेन्नई आणि पंजाबविरुद्ध सामने शेवटच्या क्षणी जिंकला होता. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात KKR च्या खेळाडूंनी शेवटच्या क्षणी सामन्याचं पारडं आपल्या दिशेने झुकवलं.

पंजाब आणि चेन्नईविरुद्ध सामन्यात खरं पहायला गेलं तर आम्हाला विजयाची संधीच नव्हती…तरीही आम्ही ते सामने जिंकले. याचा अर्थ आमच्या संघात चांगला खेळ करण्याची ताकद आहे. कोणत्याही क्षणी सामना जिंकण्याची ताकद या संघात आहे. त्यामुळे काही गोष्टींवर अधिक लक्ष देऊन सराव केल्यास कोलकात्याचा संघ यंदा चांगली कामगिरी करु शकतो असं मत कमिन्सने व्यक्त केलं. दरम्यान KKR चा कर्णधार दिनेश कार्तिकने फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी संघाचं कर्णधारपद मॉर्गनकडे सोपवलं आहे. त्यामुळे यापुढील सामन्यांपासून मॉर्गन KKR चं कर्णधारपद भूषवणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : KKR मध्ये नेतृत्वबदल, मॉर्गन संघाचा नवीन कर्णधार