आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरपासून युएईत या स्पर्धेला सुरुवात होणार असून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने तेराव्या हंगामासाठी आपल्या संघात दुखापतग्रस्त हॅरी गुर्नेच्या जागी अमेरिकन जलदगती गोलंदाज अली खानला संधी दिली आहे. अली खानने नुकतचं कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेत त्रिंबागो नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

हॅरी गुर्नेच्या खांद्यावर शस्त्रक्रीया होणार असल्यामुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागेवर आता अली खानची निवड करण्यात आली आहे. जाणून घेऊयात अली खानबद्दल महत्वाच्या गोष्टी…

१) अली खान हा मुळचा पाकिस्तानी खेळाडू, वयाच्या १८ वर्षापर्यंत अली खान पाकिस्तानाच वाढला. यानंतर तो अमेरिकेला स्थायिक झाला. क्रिकेटप्रती त्याचं प्रेम आणि खेळ पाहून अली खानची अमेरिकेच्या संघात निवड झाली.

२) अली खानने आतापर्यंत केवळ एक वन-डे सामना खेळला असला तरीही जगभरातील अनेक टी-२० लिगमध्ये खेळण्याचा अनुभव अलीकडे आहे. कॅरेबिअन प्रिमीअर लिग, पाकिस्तान सुपर लिग, ग्लोबल टी-२० कॅनडा, अबु धाबी टी-१० लिग, बांगलादेश प्रिमीअर लिग अशा अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये अली खान खेळला आहे.

३) २०२० साठीच्या लिलावासाठी अमेरिकेकडून नाव नोंदवलेला अली खान हा एकमेव खेळाडू होता. २०१९ सालीही अली खानने आयपीएलच्या लिलावासाठी आपलं नाव नोंदवलं होतं.

४) २०१८ साली अली खान त्रिंबागो नाईट रायडर्स संघाचा हिस्सा होता. या हंगामात त्याने १६ बळी घेतले, तर २०१९ साली झालेल्या हंगामात त्याने १० बळी घेतले होते. नुकत्यात पार पडलेल्या कॅरेबिअन लिग स्पर्धेत त्याने ८ बळी घेतले आहेत.

५) याव्यतिरीक्त अली खानने ९ अ श्रेणीचे आणि ३६ टी-२० सामने खेळले आहेत.

त्यामुळे यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना अली खान कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.