Dream11 IPL 2020 UAE : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरू आहे. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १९५ धावा ठोकल्या. कर्णधार रोहित शर्माने ८० धावांची तुफानी खेळी केली. त्याने ६ षटकार लगावले. सूर्यकुमार यादवनेही फटकेबाजी केली, पण त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. कोलकातापुढे विजयासाठी १९६ धावांचे लक्ष्य ठेवले.

मुंबईच्या गोलंदाजीच्या वेळी ट्रेंट बोल्ट आणि पॅटीन्सन यांनी चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने देखील चांगली गोलंदाजी केली. पण या तिघांनंतर गोलंदाजीला चक्क कायरन पोलार्ड आला आणि साऱ्यांचे भुवया उंचावल्या. हार्दिक पांड्यासारखा गोलंदाजाऐवजी पोलार्डला गोलंदाजी का? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला. पण थोड्याच वेळात छोट्याशा मुलाखतीत मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी यामागचं कारण सांगितलं.

“आम्ही आज उत्तम कामगिरी केली. गोलंदाजीतही आमची कामगिरी चांगली होती. काही ठिकाणी आमच्याकडून चुका झाल्या. पण आमच्याकडे चांगली धावसंख्या होती. त्यात हार्दिक नुकताच एका शस्त्रक्रियेतून बरा झाला आहे. त्याला गोलंदाजी टाकताना स्वत:वर जोपर्यंत विश्वास वाटत नाही तोवर आम्ही त्याला गोलंदाजी टाकण्यासाठी भरीस पाडणार नाही. आम्हाला हार्दिकची तंदुरूस्ती अधिक महत्त्वाची आहे”, असे जयवर्धनेने सांगितले.

मुंबईच्या डावात हार्दिक पांड्याची विकेट चर्चेचा विषय ठरला. फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात असणारा हार्दिक पांड्या ‘हिट विकेट’ झाला. आंद्रे रसलने त्याला ऑफ साईडला टाकलेला चेंडू त्याला मारावासा वाटला पण त्याने चेंडू सोडून दिला. पण त्याच वेळी त्याची स्वत:ची बॅट स्टंपला लागल्याने त्याला माघारी परतावे लागले. त्याने १३ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह १८ धावा केल्या.