मुंबईकर क्रिकेटपटू आणि भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत एकही सामना खेळायला मिळालेला नाही. गेल्या हंगामापर्यंत राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अजिंक्यला तेराव्या हंगामासाठी Player Transfer Window अंतर्गत दिल्लीच्या संघात देण्यात आलं. मात्र दिल्लीच्या संघात असलेली फलंदाजांची मांदियाळी पाहता अजिंक्यला संघात स्थान मिळवण्याची धडपड करावी लागणार असल्याचं आधीपासूनच स्पष्ट दिसत होतं. त्यातचं राजस्थान रॉयल्सची गेल्या काही सामन्यांतली कामगिरी पाहता, संघाच्या चाहत्यांनाही अजिंक्य रहाणेची आठवण येते आहे. अजिंक्यला दिल्लीच्या संघात दिल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या काय आहे Mid Season Transfer ची संकल्पना?

काही दिवसांपूर्वी हातात ग्लोव्हज घेऊन, राखील खेळाडूचं टी-शर्ट घालून डग आऊटमध्ये बसलेल्या अजिंक्यचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यावरुन अनेक चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. सध्या आयपीएलचा तेरावा हंगाम Mid Season Transfer कडे वळतो आहे. अशा परिस्थितीत अजिंक्यला दिल्लीच्या संघातून इतर संघात द्यावं अशी मागणी होत होती. दिल्ली कॅपिटल्सच्या संघ व्यवस्थापनाने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सोशल मीडियावर जे काही बोललं जातं तो संघनिवडीचा निकष असू शकत नाही. रहाणे खूप चांगला खेळाडू आहे त्याच्याकडे अनुभवही आहे. पण धवन आणि पृथ्वी शॉ ही जोडी दिल्लीसाठी चांगली कामगिरी करत आहे. एखादी गोष्ट जर तुटलेली नसेल तर ती दुरुस्त का करायची?? गेल्या दोन हंगामापेक्षा जास्त काळ जे संघासोबत आहेत त्यांना आम्ही पाठींबा देत आहोत. शॉ-धवन यांनी संघासाठी चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे खरं सांगायला गेलं तर रहाणेला आपली संधी येईपर्यंत वाट पहावी लागेल.” दिल्ली संघातील एका जबाबदार अधिकाऱ्याने ANI वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली.

“अजिंक्य आता आमच्या संघाचा अविभाज्य भाग आहे. हंगामाच्या मध्यावधीत त्याला दुसऱ्या संघात दिलं जाईल यासाठी त्याला आम्ही स्थान दिलेलं नाही. बाहेर काहीही चर्चा होवू दे, तो संघाकडून खेळण्यासाठी आश्वासक तयारी करतोय. जिथे शक्य असेल तिकडे तो आपला सल्ला देतो, नवीन खेळाडूंना मदत करतो.” Mid Season Transfer मार्फत अजिंक्यला दुसऱ्या संघात दिलं जाईल का या प्रश्नावर दिल्ली संघातील अधिकाऱ्याने उत्तर दिलं. मुंबईकर पृथ्वी शॉने गेल्या ५ सामन्यांमध्ये १७९ धावा केल्या असून यात २ अर्धशतकांचा समावेश आहे, तर शिखर धवनच्या नावावर या हंगामात १२७ धावा जमा आहेत.