आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज संघाची सुरुवात खराब झाली. गतविजेत्या मुंबईवर मात करुन चेन्नईने स्पर्धेची चांगली सुरुवात केली. मात्र राजस्थान आणि दिल्लीविरुद्धच्या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात धोनी फलंदाजीसाठी उशीरा येत असल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. संघाला गरज असताना धोनी उशीरा फलंदाजीसाठी का येतो असा प्रश्न माजी खेळाडू आणि चाहते सोशल मीडियावर विचारत आहेत. अनेकांनी सुरेश रैनाला चेन्नईच्या संघात पुन्हा जागा द्यावी अशी मागणी केली.

गेल्या काही दिवसांपासून रैना चेन्नईच्या संघात परतणार अशा चर्चा सुरु होत्या. संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी याबद्दल माहिती दिली आहे. “आम्ही रैनाकडे पर्याय म्हणून आता पाहू शकत नाही. त्याने खासगी कारण देत यंदाची स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतलाय. आम्ही त्याचा विचार करत नाहीये. चेन्नईचे चाहते जगभरात आहेत आणि मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो की आम्ही नक्कीच पुनरागमन करु. स्पर्धा म्हटली की जय-पराजय या गोष्टी आल्याच. पण खेळाडूंना नेमकं काय करायचं आहे काय करायचं नाही याची जाणीव आहे आणि ते तसा प्रयत्न करतायत.” ANI वृत्तसंस्थेशी बोलताना विश्वनाथन यांनी माहिती दिली.

अवश्य वाचा – IPL 2020 : गोलंदाजी आणि फलंदाजीत आमची कामगिरी चांगली होत नाहीये – धोनी

दिल्लीविरुद्धचा सामना गमावल्यानंतर चेन्नईला सात दिवसांचा ब्रेक मिळणार आहे. पहिला सामना खेळल्यानंतर अंबाती रायुडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेला होता…पण तो पुढच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल असं विश्वनाथन यांनी स्पष्ट केलं. चेन्नईसुपरकिंग्जचा दुसरा सामना २ ऑक्टोबररोजी सनराईजर्स हैदराबादसोबत होणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : CSK ने आपल्याच खेळाडूंना केलं ट्रोल, संथ खेळ पाहून चाहत्यांनाही आली झोप