ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात मुंबईच्या सूर्यकुमार यादवला स्थान न मिळाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खूप वाद सुरु आहे. संघाची निवड झाल्यानंतर सूर्यकुमारने RCB विरुद्ध सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करुन आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. सोशल मीडियावर चाहते सूर्यकुमारला वारंवार डावललं जात असल्यामुळे विराट आणि बीसीसीआयवर नाराज आहेत. RCB विरुद्ध सामन्यातील सूर्यकुमारची खेळी पाहिल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूर्यकुमारचं कौतुक करत त्याला संयम ठेवण्याचा सल्ला दिला.

रवी शास्त्रींच्या या सल्ल्यावर भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीनेही खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “भारताकडून खेळताना मी ज्यावेळी शतक झळकावलं त्यावेळी तुम्ही प्रशिक्षक असायला हवे होतात. तुमच्या या शब्दांनी माझं करिअर वाचलं असतं. तुमचं हे ट्विट पाहून सूर्यकुमारला नक्कीच आनंद झाला असेल.”

सूर्यकुमारने ४३ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ७९ धावांची खेळी केली. RCB च्या गोलंदाजांनी सूर्यकुमारला बाद करण्यासाठी अथक प्रयत्न केले परंतू त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.