मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला प्रारंभ होऊन आता एक महिना उलटला असून एव्हाना प्रत्येक संघातील खेळाडूंबरोबरच त्यांच्या मुख्य तसेच साहाय्यक प्रशिक्षकांची नावेही चाहत्यांना ओळखीची झाली आहेत. मात्र यंदा साहाय्यक चमूतील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून महिलासुद्धा विविध भूमिका चोखपणे बजावत असल्याचे निदर्शनास येत आहे.

‘आयपीएल’च्या आठ संघांपैकी तीन संघांच्या साहाय्यक चमूत महिलांचा समावेश आहे. किनिता पटेल  यंदा मुंबई इंडियन्सची आहारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ‘मिल पिरॅमिड’ नावाचे आहारविषयक मार्गदर्शनाचे वैयक्तिक केंद्र असणाऱ्या किनिता यांची प्रथमच मुंबईने नेमणूक केली आहे. याशिवाय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठीही त्या आहारतज्ज्ञाची भूमिका बजावतात.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुच्या प्रत्येक सामन्यादरम्यान संघाची जर्सी घालून डगआऊटमध्ये बसलेली जी महिला दिसते, ती म्हणजे नवनीता गौतम. नवनीता या बेंगळूरुच्या मसाज थेरपिस्ट असून, ‘आयपीएल’मध्ये एखाद्या महिलेला साहाय्यक फळीत स्थान देणारा बेंगळूरु पहिलाच संघ ठरला आहे. कॅनडामध्ये जन्मलेल्या नवनीताने यापूर्वी कॅनडाच्या ट्वेन्टी-२० लीगमध्ये टोरंटो नॅशनल्स, तर आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघालासुद्धा तिने मार्गदर्शन केले आहे.

बेंगळूरुनंतर राजस्थान रॉयल्सनेही त्यांचा कित्ता गिरवत मुंबईकर अनुजा दळवीला फिजिओ म्हणून साहाय्यक चमूत स्थान दिले. ३४ वर्षीय अनुजा या ‘आयपीएल’मधील पहिल्या महिला फिजिओ असून त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी तसेच बांगलादेश क्रिकेट मंडळासाठीही फिजिओची भूमिका बजावली आहे. करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर राजस्थानच्या खेळाडूंसाठी योग्य ती नियमावली आखण्याचे कार्यही अनुजा करत आहेत. क्रिकेटव्यतिरिक्त बॅडमिंटन, टेनिस, नेमबाजी आणि जिम्नॅस्टिक्स या खेळांसाठी त्यांनी फिजिओची धुरा वाहिली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार लिसा स्थळेकर राजस्थानच्या युवा खेळाडूंच्या विकासासाठी मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे त्या समालोचकाची भूमिकाही बजावत आहेत. लिसाबरोबरच अनुजा, नवनीता आणि किनिता यांच्याकडून प्रेरणा घेत भविष्यात अधिक महिला साहाय्यक चमूत पाहायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.

पंजाबची ‘यशोप्रीती’

‘आयपीएल’च्या तीन संघांच्या सहमालकांमध्ये महिलेचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सच्या नीता अंबानी, कोलकाता नाइट रायडर्सची जुही चावला, तर किंग्ज इलेव्हन पंजाबची प्रीती झिंटा यांच्या उपस्थितीने चाहत्यांचा उत्साह नेहमीच वाढवला आहे; परंतु यंदाच्या हंगामात मात्र प्रीती पंजाबसाठी थेट संयुक्त अरब अमिरातीत पोहोचून पाठिंबा दर्शवताना दिसत आहे. त्याशिवाय गेल्या काही लढतींपासून पंजाब सलग सामने जिंकत असल्यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित असणारी प्रीती पंजाबसाठी यशस्वी ठरत असल्याची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगू लागली आहे.

अंतिम सामना १० नोव्हेंबरला दुबईत

दुबई : ‘आयपीएल’च्या उत्तरार्धातील ‘क्वालिफायर-१’ आणि अंतिम फेरीचा सामना दुबईत तर बाद फेरीचे अन्य दोन सामने अबू धाबीला होतील, अशी घोषणा रविवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केली. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम ‘आयपीएल’चे २४ साखळी सामन्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

महिलांचा अंतिम सामना ९ नोव्हेंबरला शारजात

महिला ट्वेन्टी-२० चॅलेंज स्पर्धा ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत शारजात होणार आहे. या स्पध्रेचा अंतिम सामना ९ नोव्हेंबरला शारजा येथेच खेळवण्यात येणार आहे.

महिला ट्वेन्टी-२० चॅलेंज

तारीख                  सामना                  सामन्याची वेळ

४ नोव्हेंबर      सुपरनोव्हाज वि. व्हेलोसिटी      सायं. ७.३० वा.

५ नोव्हेंबर      व्हेलोसिटी वि. ट्रेलब्लेझर्स            दु. ३.३० वा.

७ नोव्हेंबर      सुपरनोव्हाज वि. ट्रेलब्लेझर्स       सायं. ७.३० वा.

९ नोव्हेंबर      अंतिम सामना                        सायं. ७.३० वा.

पुरुषांची बाद फेरी

तारीख               सामना         सामन्याची वेळ

५ नोव्हेंबर      ‘क्वालिफायर-१’  सायं. ७.३० वा.

६ नोव्हेंबर      ‘एलिमिनेटर’    सायं. ७.३० वा.

८ नोव्हेंबर      ‘क्वालिफायर-२’  सायं. ७.३० वा.

१० नोव्हेंबर     अंतिम सामना   सायं. ७.३० वा.