टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा सात वर्षांनी पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळताना दिसणार आहे. ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १४ व्या हंगामात पुजारा चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसेल.

कसोटी फलंदाज अशी चेतेश्वर पुजाराची प्रतिमा आहे, पण आता तो क्रिकेटच्या झटपट प्रकारासाठीही स्वतःला तयार करत आहे. आयपीएलसाठी नेट्समध्ये सरावादरम्यान एकाहून एक उत्तुंग षटकार मारताना पुजारा दिसतोय. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ‘क्रिकबझ’सोबत बोलताना, “मी मैदानाबाहेर चेंडू टोलवण्यासाठी तयार आहे, टी-२० प्रकारात ज्या प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता असते त्यांचा सराव सुरू आहे”, असं पुजारा म्हणाला. टी-२० मध्ये षटकार सर्वात महत्त्वाचा असतो, आणि त्यावरच मेहनत घेत असल्याचं त्याने सागितलं. कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार असल्याचंही पुजारा म्हणाला. शिवाय धोनीच्या कर्णधारपदाखाली खेळण्यास उत्सुक असल्याचं पुजाराने सांगितलं.


३३ वर्षीय पुजारा आयपीएलमध्ये अखेरचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सविरोधात २०१४ मध्ये खेळला होता. त्यावेळी तो किंग्स इलेव्हन पंजाबचा भाग होता. यंदाच्या हंगामात चेन्नईने पुजाराला ५० लाख रुपयांमध्ये खरेदी केलं आहे.