News Flash

“IPL हा काही ऑस्ट्रेलियन संघाच्या दौऱ्याचा भाग नाहीय, त्यामुळे…”; भारतात असणाऱ्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियन PM चा दणका

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडे आयपीएल संपताना खेळाडूंना मायदेशी येण्यासाठी विशेष विमानाची सोय करावी, अशी मागणी...

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारतामध्ये वाढणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर १५ मे पर्यंत बंदी घातली आहे. विशेष म्हणजे ही बंदी सर्वांसाठी लागू होमार असून यामध्ये इंडियन प्रिमियर लिग खेळण्यासाठी सध्या भारतात असल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक, समालोचक आणि अन्य व्यक्तींचाही समावेश असणार आहे. मॉरिसन यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना स्वदेशात येण्यासाठी स्वत:ची सोय स्वत: करावी लागेल असं स्पष्ट केलं आहे. ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मॉरिसन यांनी, “ते खेळाडू तिथे खासगी दौऱ्यावर गेले आहेत. आयपीएल हा काही ऑस्ट्रेलियन संघाच्या दौऱ्याचा भाग नाहीय. ते तिथे स्वत:च्या इच्छेने आणि स्वत:चा निर्णय घेऊन गेलेत. तिथे त्यांना अनेक सुविधा पुरवल्या जात आहेत. मला अपेक्षा आहे की ते त्यांच्या पद्धतीने ऑस्ट्रेलियात परत येण्याची सोय करतील,” असं म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू अ‍ॅण्ड्रयू टाय, केन रिचर्डसन आणि अ‍ॅडम झाम्पा यांनी भारतामधील करोनाबाधितांची संख्या आणि निर्माण झालेली आरोग्य विषय परिस्थिती पाहून आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये मागील काही दिवसांपासून रोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहे. मागील काही दिवसांपासून रोज दोन हजारहून अधिक जणांचा देशात करोनामुळे मृत्यू होत आहे. ऑस्ट्रेलियाचे एकूण १४ खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. याशिवाय दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाँण्टींग, सायमन कॅटिच, समालोचक मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, मायकल स्लेटर आणि लीजा स्टालेकर सुद्धा आयपीएलसाठी भारतात आहेत.

मुंबई इंडियन्सचा फलंदाज क्रिस लिनने, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडे आयपीएल संपताना खेळाडूंना मायदेशी येण्यासाठी विशेष विमानाची सोय करावी, अशी मागणी केली होती. आयपीएलचे साखळी सामने २३ मे पर्यंत होणार असून अंतिम सामना ३० मे रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने लिननच्या या मागणीसंदर्भात सध्या तरी वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

नक्की वाचा >> करोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑस्ट्रेलियानं भारतातून येणारी प्रवासी विमानं १५ मेपर्यंत केली रद्द!

क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संघाने जारी केलेल्या संयुक्त पत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसार ते आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या क्रिकेटपटूंच्या, प्रशिक्षकांच्या, समालोचकांच्या संपर्कात आहेत. सध्याच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. “आम्ही भारतातील आमच्या खेळाडूंकडून माहिती घेत आहोत आणि त्यानुसार ऑस्ट्रेलियन सरकारला सल्ला देऊ. सध्या परिस्थिती चिंताजनक असून आमच्या शुभेच्छा भारतासोबत आहेत,” असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 4:15 pm

Web Title: coronavirus australian pm scott morrison says australian players gone to play ipl can come by their own resources scsg 91
Next Stories
1 IPL सोडून स्मिथ आणि वॉर्नर मायदेशी परतणार?
2 …आणि LIVE शोमध्ये स्टेन रडायला लागला!
3 लोकांना बेड्स मिळत नसताना संघ मालक, कंपन्या, सरकार IPL वर एवढा पैसा कसा खर्च करु शकतात?; ऑस्ट्रेलियन खेळाडूचा सवाल
Just Now!
X