‘आयपीएल’मधील सायंकाळी खेळवण्यात येणारे सामने आता आठऐवजी साडेसात वाजता सुरू होत असल्याने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह मुंबई इंडियन्सचा क्रिकेट संचालक झहीर खानने नाराजी व्यक्त केली आहे.

‘‘भारतातील प्रकाशझोतातील सामन्यांमध्ये दवाचा घटक नेहमीच निर्णायक भूमिका बजावतो. साधारणपणे आठ अथवा साडेआठ वाजल्यानंतर मैदानावर मोठ्या प्रमाणावर दव जमा होते. दुसरा संघ फलंदाजीला येईपर्यंत दवामुळे त्यांचे अर्धे कार्य सोपे झालेले असते,’’ असे धोनी म्हणाला.

‘‘ट्वेन्टी-२० प्रकारात दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघावर दडपण असते. मात्र दवाचा त्यांना अतिरिक्त फायदा होतो. दवामुळे चेंडू ओलसर झाल्याने तो गोलंदाजांच्या हातून नीट सुटत नाही. त्याशिवाय फिरकीपटूंचाही चेंडू वळत नाही,’’ असे झहीर म्हणाला.