इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आय़पीएलच्या १४ व्या हंगामाला शुक्रवारपासून (९ एप्रिल २०२१ पासून) सुरूवात होणार आहे. एकीकडे आयपीएलचे सामने सुरु होणार असतानाच दुसरीकडे देशातील करोनाची परिस्थिती दिवसोंदिवस चिंताजनक होताना दिसत आहे. मागील वर्षीही आयपीएल सुरु होण्याच्या कालावधीमध्येच करोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. यंदासुद्धा जगातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक असणारी ही मालिका सुरु होण्याआधी आता दिवसाला देशात ७० ते ८० हजार करोना रुग्ण आढळून येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे बायोबबल, क्वारंटाइन आणि इतर सर्व काळजी घेऊनही आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंपासून ते ग्राऊण्डवरील कर्मचारी आणि अगदी ब्रॉडकास्टींग टीममधील सदस्यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याने आयपीएलच्या या हंगामावरील करोनाचा संकट पुन्हा गडद झाल्याचं चित्र दिसत आहे.

करोना झाला आणि मात करुन मैदानावरही आला

आयपीएलमध्ये एका आठवड्यात चार खेळाडूंना करोनाचा संसर्ग झालाय. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोलकाता नाईड रायडर्सचा नीतीश राणा करोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली. मात्र नीतीशने करोनावर मात करुन पुन्हा मैदानात सरावासाठी हजेरी लावण्यासही सुरुवात केलीय. नीतीश हा केकेआरच्या सलामीच्या फलंदाजांपैकी एक आहे.

आरसीबीचे दोन खेळाडू पॉझिटिव्ह…

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघालाही मालिका सुरु होण्याआधी करोनाचा चांगलाच फटका बसलाय. आरसीबीच्या दोन खेळाडूंना करोनाचा संसर्ग झालाय. २२ मार्चच्या चाचणीमध्ये संघाचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल करोना पॉझिटिव्ह आला. मात्र देवदत्तने करोनावर मात केली असून नुकत्याच घेतलेल्या चाचणीत तो करोनामुक्त झाल्याचं समोर आलं आहे. मात्र दुसरीकडे संघातील अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्सचा ७ एप्रिल रोजीचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं संघ व्यवस्थापनाने सांगितलं आहे. डॅनियल लवकरच करोनावर मात करेल असं सांगितलं जात आहे. तरी करोनाची लागण झाल्याने त्याला पहिल्या काही सामन्यांना मुकावं लागणार आहे.

दिल्लीच्या संघालाही फटका…

दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेललाही करोनाचा संसर्ग झाला आहे. २८ मार्च रोजी अक्षर सरावासाठी संघाच्या कॅम्पमध्ये आला तेव्हा त्याचा करोना चाचणीचा निकाल निगेट्व्ही होता. मात्र त्यानंतर केलेल्या चाचणीमध्ये त्याचा निकाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळेच आता अक्षर पहिले काही सामने खेळू शकणार नाहीय.

मोरेंनाही करोनाची लागण

भारताचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांनाही करोनाची लागण झालीय. एके काळी भारतीय क्रिकेट संघाची निवड करणाऱ्या सामितीचे प्रमुख राहिलेले मोरे हे आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट हंट टीमचे सदस्य आहेत. ५८ वर्षीय मोरे यांचा ६ एप्रिलचा करोना चाचणीचा निकाल पॉझिटीव्ह आलाय. सध्या मोरे आयसोलेशनमध्ये आहेत.

यांनाही झाला करोना…

आयपीएलमधील खेळाडूच नाही तर ग्राउण्ड स्टाफ आणि ब्रॉडकास्टिंग टीममधील सदस्यांनाही करोनाचा फटका बसलाय. मुंबईतील वानखडे स्टेडियमवरील ग्राउण्ड स्टाफपैकी ११ जण करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. तसेच मुंबईमधून सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करणाऱ्या टीममधील १४ जणांना करोनाची लागण झालीय.