इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटच्या (आयपीएल) १४व्या हंगामासाठी अवघा एक दिवस शिल्लक असतानाही स्पर्धेवरील करोनाचे सावट अद्याप कायम आहे. बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा वेगवान गोलंदाज डॅनिएल सॅम्सला करोनाची लागण झाली, मात्र सलामीवीर देवदत्त पडिक्कल करोनातून सावरल्याने बेंगळूरुला दिलासा मिळाला आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळूरुची शुक्रवारी होणाऱ्या सलामीच्या लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सशी गाठ पडणार आहे. या लढतीसाठी दोन्ही संघ सध्या चेन्नईत कसून सराव करत आहेत. परंतु २८ वर्षीय अष्टपैलू सॅम्स करोनाबाधित झाल्याने बेंगळूरुला धक्का बसला आहे. ३ एप्रिल रोजी चेन्नईत दाखल झाल्यावर सॅम्सने करोना चाचणी केली. त्या वेळी त्याच्या चाचणीचा अहवाल नकारात्मक आला. परंतु मंगळवारी केलेल्या दुसऱ्या चाचणीदरम्यान त्याला करोना झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुढील १० दिवस विलगीकरण करण्याबरोबरच सुरुवातीच्या किमान तीन लढतींना सॅम्सला मुकावे लागेल. गतवर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून ‘आयपीएल’मध्ये पदार्पण करणाऱ्या सॅम्सला तीन सामन्यांचा अनुभव आहे.

कर्नाटकचा प्रतिभावान २० वर्षीय सलामीवीर पडिक्कलच्या मात्र दुसऱ्या करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्याने त्याला सरावाची परवानगी मिळाली आहे. २२ मार्च रोजी करण्यात आलेल्या करोना चाचणीचा निकाल आल्यानंतर पडिक्कलला करोनाची लागण झाल्याचे समजले. तेव्हापासून तो स्वयं विलगीकरण कक्षात होता. पडिक्कल करोनातून सावरला असला तरी मुंबईविरुद्धच्या सलामीच्या सामन्याला तो मुकण्याची शक्यता आहे.

संघमालकांमध्ये भीतीचे वातावरण

देशातील करोनाबाधितांचा आकडा वाढू लागल्यामुळे संघमालकही चिंतेत सापडले असून कोणत्याही क्षणी ‘आयपीएल’चा गाशा गुंडाळावा लागेल की काय, अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. ‘‘जैव-सुरक्षित वातावरणाचे नियम खडतर असले, तरी देशातील परिस्थिती अधिकच वाईट बनत चालली आहे. ‘बीसीसीआय’कडून अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा होत नसली तरी यंदाचा मोसम अर्धवट स्थितीत गुंडाळण्यात येईल की काय, अशी भीती आम्हाला आहे,’’ असे एका संघमालकाने सांगितले.