रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचे सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी होणाऱ्या लढतीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा संघ विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी उत्सुक आहे, तर सनरायजर्स हैदराबादला पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.बेंगळूरुने पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध आत्मविश्वास उंचावणारा विजय मिळवत ‘आयपीएल’ हंगामाला दिमाखदार प्रारंभ केला. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबादने मात्र सलामीच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पराभव पत्करला.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : पडिक्कलकडे लक्ष

करोनातून सावरलेला सलामीवीर देवदत्त पडिक्कल परतल्यामुळे बेंगळूरुची फलंदाजीची ताकद वाढली आहे. २२ मार्चला करोनाची लागण झाल्यामुळे तो विलगीकरणात होता. परंतु त्याने आता बेंगळूरुच्या सहकाऱ्यांसमवेत सरावाला प्रारंभ केला आहे. कर्नाटकच्या २० वर्षीय डावखुऱ्या पडिक्कलने गतवर्षीच्या ‘आयपीएल’मध्ये बेंगळूरुकडून सर्वाधिक ४७३ धावा (१५ सामन्यांत) केल्या होत्या. त्याने सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत सहा सामन्यांत ४३.६०च्या सरासरीने २०१८ धावा केल्या, तर विजय हजारे करंडक स्पर्धेत सात सामन्यांत ७३७ धावा केल्या. पडिक्कलच्या अनुपस्थितीत कोहलीने वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने सलामीचा भार सांभाळला होता. बेंगळूरुच्या फलंदाजीची धुरा कोहली आणि एबी डीव्हिलियर्सवर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलकडेही सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता आहे. येत्या काही सामन्यांत बेंगळूरु मोहम्मद अझरुद्दीन आणि अ‍ॅडम झम्पा यांना अजमावू शकेल. पहिल्या सामन्यात रजत पाटीदार आणि वॉशिंग्टन अपयशी ठरले होते.

सनरायजर्स हैदराबाद : बेअरस्टोला बढती?

कोलाकाताविरुद्धच्या सामन्यात वृद्धिमान साहा आणि वॉर्नर हे दोन्ही सलामीवीर अपयशी ठरले होते. जॉनी बेअरस्टोने मधल्या फळीत फलंदाजीला उतरत अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे साहाऐवजी बेअरस्टोचा सलामीसाठी प्रयोग होऊ शकेल. मनीष पांडेने ४४ चेंडूंत ६१ धावा केल्या होत्या. केन विल्यम्सन या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार कोलकाताविरुद्ध महागडा ठरला होता. परंतु भुवनेश्वर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवणारी गोलंदाजी करील, अशी आशा आहे. रशीद खान आणि मोहम्मद नबी यांच्या फिरकीवर हैदराबादची भिस्त आहे.

वेळ : सायंकाळी ७.३० वा. ’

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)