बीसीसीआय शब्बीर हुसेन शेखादम खंडवावाला यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी युनिट (बीसीसीआय-एसीयू) सध्या यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलवर बारीक लक्ष ठेवून आहे. पंजाब किंग्जचा फलंदाज दीपक हुडाने मंगळवारी दुपारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरुन मोठा गोंधळ उडाला आहे. बीसीसीआय आता दीपक हुडा याने केलेल्या पोस्टची चौकशी करणार आहे आणि ही पोस्ट भ्रष्टाचारविरोधी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करते की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे दीपक हुडाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मंगळवारी दीपक हुडाने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी एका फोटो त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. त्यानंतर आता बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी युनिटने चौकशी करण्याचे ठरवले आहे.

या प्रकरणी एका अधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “इन्स्टाग्राम पोस्टमध्ये संघ नाही, पण जर ते बीसीसीआय एसीयूने ठरवलेल्या नियमांचे उल्लंघन करत असेल तर ते निश्चितपणे पाहतील. एसीयू या पोस्टकडे लक्ष देईल. आम्ही संघाच्या रचनेबद्दल कोणतीही चर्चा होणार नाही यावर निर्बंध घातले आहेत.”

हुडाने मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. ज्यात तो टीमचे हेल्मेट घालताना दिसत आहेत. त्याने या पोस्टसह पंजाब किंग्स वि राजस्थान रॉयल्स. आयपीएल २०२१ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरील मेसेजवर प्रतिक्रिया कशी द्यावी याबद्दल काही चर्चा झाली आहे का, असे विचारले असता, एसीयूचे अधिकारी म्हणाले, “काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शक तत्वे आहेत.” माजी प्रमुखांनी असेही स्पष्ट केले की पीआर संघ खेळाडूंची काही सोशल मीडिया अकाऊंट हाताळतात, पण खेळाडूंनी त्यांच्या बाजूने कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.

मंगळवारी राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाबला दोन धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत १८५ धावा केल्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून पंजाबचा संघ चार विकेट्सवर फक्त १८३ धावा करू शकला.