इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) युवा खेळाडूंसाठी एक उत्तम व्यासपीठ असल्याचे नेहमीच पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या प्रत्येक संघातील वरिष्ठ खेळाडू युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत असतात. युवा क्रिकेटपटूंना क्रिकेट दिग्गजांकडून शिकण्याची उत्तम संधी मिळते. आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)चा ९ विकेट्सने पराभव केला. केकेआरकडून पदार्पण करणाऱ्या व्यंकटेश अय्यरने नाबाद ४१ धावा केल्या. दरम्यान, या सामन्यानंतर त्याला विराटकडून काही खास बॅटिंग टिप्स मिळाल्या आहेत.

केकेआरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये विराट आणि वेंकटेश बोलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना केकआरने लिहिले आहे, ‘ड्रीम डेब्यू अधिक उत्तम खेळाडूकडून शिकणे, ही रात्र व्यंकटेश अय्यरसाठी स्मरणीय होती,’ असे त्यात म्हटले आहे.

या व्हिडिओमध्ये विराटने व्यंकटेश अय्यरला शॉट खेळण्यासाठी सर्वोत्तम स्थान काय आहे याबाबत माहिती दिली आहे. विराटने त्याला सल्ला दिला की फ्रंन्टफूटवर खेळल्याने त्याच्याकडे नेहमी पर्याय असतात.

विराटचा हा आयपीएलचा २००वा सामना होता, पण त्याचा संघ विराटसाठी तो स्मरणीय बनवू शकला नाही. विराटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा संपूर्ण संघ २० षटकांपूर्वी ९२ धावांवर परतला. विराट ५ आणि एबी डिव्हिलियर्स खाते न उघडता बाद झाले. केकेआरकडून वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल केकेआरने १० षटकांत केवळ एक विकेट गमावून लक्ष्य गाठले.