News Flash

माणूस नावाचं ‘मटेरियल’

माणसामधल्या ‘हजबंड मटेरियल’, ‘वाइफ मटेरियल’, ‘फादर मटेरियल’ला शोधता शोधता आपलंच ‘मटेरियल’ होऊन जाईल.

माणूस नावाचं ‘मटेरियल’

‘माणूस’ हे असं एक ‘मटेरियल’ आहे की त्याचा देवही होऊ शकतो आणि दानवही. निर्जीव पदार्थाचे गुणधर्म हे रासायनिक किंवा इतर यांत्रिक प्रक्रियांनी बदलता येतात; जसं लोखंडाचं स्टेनलेस स्टील होतं. माणसामध्ये मात्र प्रक्रियेसाठी ‘शिक्षण आणि संस्कार’ महत्त्वाचे अन्यथा माणसामधल्या ‘हजबंड मटेरियल’, ‘वाइफ मटेरियल’, ‘फादर मटेरियल’ला शोधता शोधता आपलंच ‘मटेरियल’ होऊन जाईल.

पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरातील भांडीकुंडी ही तांब्या-पितळ्याची किंवा लोखंडाची बनवलेली असायची. त्यानंतर अ‍ॅल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टीलची त्यात भर पडली. श्रीमंतांकडे चांदी व क्वचित् सोन्याचीही भांडी असत. कपबशी, लोणच्याची बरणी म्हटलं की, चिनी माती किंवा काच, फर्निचर म्हणजे लाकडाचं आणि कपडे हे कापसाचे, हेही ठरलेलं असायचं. आता मात्र प्लास्टिकनं सगळं घर व्यापून टाकलंय. यात प्रत्येक घटक वस्तूचे गुणधर्म वेगळे व म्हणून त्याप्रमाणे त्याचा उपयोगही. आजकाल मात्र ‘घटक वस्तू’ हा शब्द ‘मटेरियल’ हे इंग्रजी रूप घेऊनच तरुणाईमध्ये वारंवार ऐकायला मिळतो आणि तोही माणसाच्या संदर्भात असतो. वैद्यकशास्त्रानुसार माणसाच्या शरीराच्या घटक वस्तू या कॅल्शियम, कार्बन इत्यादी असल्या तरी जेव्हा माणसाचं रूपांतर व्यक्तीत होतं तेव्हा मात्र घटक वस्तू (‘मटेरियल’) या शब्दाला वेगळाच अर्थ येतो असं आजकाल दिसून यायला लागलं आहे. उदाहरणार्थ ‘हजबंड ‘मटेरियल’, ‘वाइफ ‘मटेरियल’, ‘फादर ‘मटेरियल’ इत्यादी. पूर्वी एखादी मुलगी कुणा मुलाबरोबर हिंडताना दिसली किंवा रेस्टॉरंटमध्ये दिसली की ‘मेड फॉर ईच अदर’ किंवा ‘जोडी फॉर एव्हर’ असं आजकालच्या ‘स्टेट्स’ भाषेत अपडेट व्हायचं. ती दोघेही ताकाला जाऊन भांडं न लपवता घरच्यांना सांगून ‘तदेव लग्नं’ करून रोमियो ज्युलिएटचा मेकअप उतरवून लक्ष्मी-नारायणाच्या भूमिकेत जात असत.
पण आता काळ बदललाय. म्हणजे मुला-मुलींच्या जोडय़ा आहेत. ते एकत्र फिरताहेत. जे मनाने पाश्चात्त्य जगात आहेत ते एकत्र राहातही आहेत. पण ‘तदेव लग्नं’चा ‘सुदिनं’ केव्हा येणार आहे असं विचारलं, तर ती मुलगीच सरळ सांगते, ‘‘परेश इज गुड अ‍ॅज अ फ्रेंड पण तो हजबंड ‘मटेरियल’ नाहीये!’’ एकदा अशाच प्रकारे ‘मटेरियल’ डिटेक्टरमधून सहीसलामत बाहेर पडून लग्न झालेलं जोडपं एका समारंभात भेटलं. लग्नाचा प्रोबेशन पीरियड संपूनही काही वर्षे उलटली होती. पण संसारवेलीवर फूल (ही सांविधानिक उपमा) उमललेलं नव्हतं. कुणी तरी विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘सारंग इज अ गुड हसबंड बट ही इज नो फादर ‘मटेरियल’!’’
मी या ‘मटेरियल’ शब्दावर विचार करायला लागले (कारण गुगलवर याचं उत्तर नव्हतं). आपण ‘मुलगी मटेरियल’ आहोत का? ‘मैत्रीण मटेरियल’, ‘शेजारीण मटेरियल’, ‘वहिनी मटेरियल’.. मला कॉम्पलेक्स येतोय की काय अशी भीती वाटायला लागली. निर्जीव वस्तूंचं ठीक आहे. त्यांचे गुणधर्म या विश्वाच्या उत्पत्तीपासून अखेपर्यंत तेच राहणार. म्हणजे असं, की आदिमानवाच्या काळात लोखंड पाण्यापेक्षा जड होतं ते आजही तसंच आहे. उद्याही तसंच असणार. पण आपल्यासारख्या माणसाचं काय? मी कसलं ‘मटेरियल’ आहे हे कोणता एक्स-रे ठरवणार?
मग असं कळलं की कोणी दुसऱ्याने ते ठरविण्याची गरज नाही. ‘माणूस’ हे असं एक ‘मटेरियल’ आहे की त्याचा देवही होऊ शकतो आणि दानवही. इतिहासात काय किंवा वर्तमानात काय, याची अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. निर्जीव पदार्थाचे गुणधर्म हे रासायनिक किंवा इतर यांत्रिक प्रक्रियांनी बदलता येतात; जसं लोखंडाचं स्टेनलेस स्टील होतं. माणसामध्ये मात्र या प्रक्रियेला ‘शिक्षण आणि संस्कार’ असं म्हणतात. शिक्षणाचा परिणाम बुद्धीशी आणि म्हणून विचारांशी निगडित आहे तर संस्कारांचा उपयोग मनाच्या मशागतीसाठी आणि भावनेच्या सौंदर्याशी संबंधित आहे. दगडासारखं कठीण काळीज असलेला वाल्या कोळी, नारद मुनींच्या सहवासात आल्यावर त्याचे ‘मटेरियल’ वाल्मीकी ऋषीत बदलले आणि ते महाकवी म्हणून जगाच्या पुढे आले.
तेव्हा ‘तो हजबंड मटेरियल’ नाही किंवा ‘फादर मटेरियल’ नाही’ असं जेव्हा ऐकू येतं तेव्हा समजावं की, ‘तिच्या दृष्टीने’ तो बुद्धीने आणि भावनेने पुरेसा संस्कारित नाही. त्यामुळे तो जबाबदारी घेऊ शकेल की नाही अशी तिला शंका येत असावी. संस्कारित नाही याचा अर्थ, त्याच्यावर संस्कार झालेले नाहीत. मग प्रश्न असा की संस्कार म्हणजे काय? संस्कार ही काही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन एका दिवसात मेक ओव्हर करण्यासारखी वरवरची उपचार पद्धती नाही. तसंच ते कुठल्या तरी शिबिरात एक महिना जाऊन होत नसतात किंवा ते शिकवूनही येत नसतात. तर घरातल्या मोठय़ा आणि नुसत्या सुशिक्षित नव्हे तर सुसंस्कारित पालकांच्या अनेक वर्षांच्या सहवासामुळे, त्यांच्या बोलण्या-चालण्यावरून, वागण्यावरून ते ‘संसर्गाने’ होत असतात; नुसत्या ‘संपर्काने’ होत नसतात. सुसंस्कारित वातावरण सतत मुलांच्या आसपास घरात असेल तर मुलं ते संस्कार सहज जाता येता घेऊ शकतील.
म्हणून, एखादी व्यक्ती ‘हजबंड (किंवा वाइफ) मटेरियल नाही’ असा कायमचा शिक्का मारून आपण त्या व्यक्तीचं ‘निर्जीव मटेरियल’ बनवतो व आपल्याला योग्य किंवा सोयीची अशी त्याची (तिची) उपयुक्तता ठरवतो. म्हणून ‘हसबंड/ वाइफ (आई/वडील) मटेरियल’ बनण्यासाठी त्याने (किंवा तिने) आपल्या गुणदोषांचा जाणीवपूर्वक विचार करून दोष टाळावेत व गुण घ्यावेत. आजकालच्या स्पेशलायझेशनच्या जमान्यात हा फक्त मित्र, हा फक्त हजबंड असे आपण माणसाचे विभाग पाडतो. निसर्गात असे नसते. पाहा ना, एका शुभ्र सूर्यकिरणात सप्तरंग दडलेले असतात. ते वरवर दिसत नाहीत. त्याकरिता ते सूर्याचे किरण पाण्याच्या थेंबातून जावे लागतात. अगदी तशाच प्रकारे पाण्यासारख्या स्वच्छ मनातून (पूर्वग्रहदूषित नसलेल्या) पाहा. तुम्हाला तुमच्याच साथीदारात सर्व रंगांची ‘मटेरियल’ दिसतील. कवी कालिदासाने हे गुपित फार पूर्वीच सांगून ठेवलं आहे- स्त्री-सखी-सचिव-गृहिणी ही चारही ‘मटेरियल’ एकाच व्यक्तीत असतात. मात्र ती कार्यरत करायची तयारी हवी. ते तसं अवघड काम नाही. आपण रोज जेव्हा आपल्या कामाच्या ठिकाणी जातो तेव्हा आपलं घरातलं व्यक्तिमत्त्व विसरून आपल्या कार्यालयातल्या भूमिकेशी समरस होतो. त्या वेळी बुद्धीने आपण आपलं ‘मटेरियल’ बदलतोच की! तेही किती सहजपणे. बऱ्याच वेळा कंपनीमध्ये गणवेश याच कारणाकरिता सक्तीचा केला जात असावा. घरी आल्यावर पुन्हा आपले घरचे कपडे घालून आपण स्वत:च्या भूमिकेत येतो. जेव्हा आपण ‘बाहेरची’ आपली भूमिका न बदलताच घरात शिरतो तेव्हा मग आपलं ऑफिसमधलं ‘साहेब ‘मटेरियल’’ वापरून इतरांवर आपली मतं लादायला लागतो. बऱ्याच वेळा आपण पाहतो की घरी येऊनही आपण आपलं ऑफिस आपल्याबरोबर आणतो आणि घरी ऑफिसच्या गप्पा मारत बसतो. बरेच जण घरी आल्यानंतरही ऑफिसच्या ईमेल्स सतत बघत असतात याउलट काही लोक ऑफिसमध्ये घरच्या प्रश्नांवर चर्चा करताना दिसतात. अशा रीतीने दोन्ही ठिकाणी पाहिजे त्या गोष्टीवर मन एकाग्र होत नाही, कामाचा दर्जा राखला जात नाही आणि तणाव निर्माण होतो. घर आणि ऑफिस यामधलं अंतरच आपण नष्ट करत आहोत. टीव्हीमुळे आधीच घराचं थिएटर झालंय आणि आता स्मार्ट फोनमुळे घराचं ऑफिस झालंय.
घराचं पावित्र्यच नष्ट होतंय की काय असं वाटू लागलंय. तंत्रज्ञानावरची आपली हुकूमत फारच दुर्बल झाली आहे. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून फ्रान्समध्ये सरकारी पातळीवर उपाययोजना चालू आहे अशा अर्थाची बातमी नुकतीच वाचली. आपल्याकडच्या शिक्षणाचा अधिकार, माहितीचा अधिकार या चालीवर आता तिकडे ‘घरी आल्यावर कामाच्या ठिकाणाचा संपर्क तोडण्याचा’ अधिकार लोकांना मिळावा यासाठी काय उपाययोजना करता येईल याचा विचार चालू आहे.
तेव्हा आता आपलं खरं ‘मटेरियल’ काय आहे हे समजून घेण्याची आणि ते ओळखण्याची वेळ आली आहे. आपलं मूळ ‘मटेरियल’ हे ‘आनंद’ आहे. आपला प्रयत्न कळत नकळत सतत त्याकडेच जाण्याचा असतो. त्यामुळे आपल्या बाह्य़ जीवनात आपण अनेक प्रकारचे ‘मटेरियल’ होऊनही आपलं मूळ ‘मटेरियल’ आनंदाचेच आहे याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. हेच तर मानवी जीवनाचं वैशिष्टय़ आहे आणि म्हणूनच आपण कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहू शकतो आणि म्हणू शकतो ‘जगू आनंदे’.
health.myright@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2016 1:33 am

Web Title: education and rite is needed for good human being
Next Stories
1 तंत्रज्ञानावर उतारा योगशास्त्राचा
2 एक्झिट स्ट्रॅटेजी
3 ‘युरेका’ क्षण
Just Now!
X