शक्ती अदृश्य असते. पण आपण ती ‘दिसावी’ म्हणून प्रतीकरूपाने, देवतेच्या रूपाने डोळ्यासमोर आणतो, उदा. अष्टभुजा. आपल्या मन:शक्तीचंसुद्धा (मनोदेवतेचंसुद्धा) असंच आहे. तिचे कार्य करण्याकरता काही आयुधे आपल्यापाशी आहेत. ही आयुधे म्हणजे धृति, स्मृती, मेधा, वाणी, क्षमा आणि इतर किती तरी गुण… समाधानी आयुष्य जगण्यासाठी कसा उपयोग करायचा या आयुधांचा…

नवरात्रीच्या निमित्ताने समाजामधल्या ‘नवदुर्गां’ची माहिती गेल्या शनिवारपासून ‘लोकसत्ता’मध्ये आपण वाचत आहोत. दुर्गा हे महाकालीचं एक रूप आहे. महिषासुर/ रक्तबीज/ शुंभ-निशुंभ यांसारख्या बलाढय़ राक्षसांना मारण्यासाठी देवीने उग्र रूप धारण केलं आणि आपल्या भक्तांचं रक्षण करून ‘माता’ हे नाव सार्थ केलं. ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध होणाऱ्या नवदुर्गांनीही अनेक कष्ट सोसून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून समाजाच्या कल्याणासाठी कामे केलेली आहेत आणि त्याचं यथोचित कौतुक या नवरात्रीनिमित्त होत आहे. यातल्या प्रत्येक दुर्गेचं कार्य आपणा सर्वांना स्फूर्तिप्रद आहे. आपण प्रत्येक जण समाजाचा एक भाग आहोत म्हणून नवदुर्गांच्या कार्याचा विचार करताना मी अंतर्मुख झाले आणि मला आपल्या प्रत्येकाच्या आत असलेल्या दुर्गांचा शोध लागला. या लेखातून आपण त्याकडे पाहणार आहोत.

Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
jejuri marathi news, two lakh pilgrims jejuri marathi news
जेजुरीच्या सोमवती यात्रेस दोन लाख भाविक, शालेय परीक्षा व पाडवा सणाचा यात्रेवर परिणाम
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर

दुर्गा हे शक्तीचं रूप. आपल्यातच दुर्गेची अनेक रूपे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळ्यांवर सामावलेली आहेत. शारीरिक पातळीवर बघायचं झालं तर आपल्याला माहितीच आहे की आपलं शरीर हे वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींनी बनलेलं आहे. प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जा तयार करण्याचं काम सतत चाललेलं असतं. जन्मापासून!… अखंडपणे!! हीच आपली ‘जीवनशक्ती’. या जीवनशक्तीला इंधन लागतं. ते आपल्या पचनसंस्थेतर्फे पुरवलं जातं. खाल्लेल्या अन्नाचं नीट पचन होणं, त्याचं रक्तामध्ये योग्य प्रकारे शोषण होणं वगैरे गोष्टी पचनसंस्थेचं कार्य व्यवस्थित आहे हे दर्शवितात. हे ‘पचनशक्ती’चे कार्य आहे. ही एक शक्तीच आहे. तसेच जीवनशक्तीसाठी प्राणशक्तीचीही (प्राणवायूचीही) गरज आहे. म्हणून प्राणशक्ती हे दुर्गेचंच एक रूप झालं. सध्या डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया, फ्लू वगैरे आजार पसरविणाऱ्या विषाणूंचा सर्वत्र सुळसुळाट आहे. या किंवा अशा प्रकारच्या विषाणूंबरोबर झगडून त्यांना नामोहरम करणाऱ्या शरीरातल्या शक्तीला ‘प्रतिकारशक्ती’ म्हणतात. म्हणून प्रतिकारशक्ती हेही याच शक्तीचं रूप आहे. याचं अगदी आपल्या परिचयाचं उदाहरण म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की ‘माझ्या अंगात ताकद/ एनर्जी नाही किंवा मला अशक्तपणा वाटतो’ त्या वेळी समजावं की शरीरातल्या जीवनशक्तीवर कोणत्या तरी शत्रूचं आक्रमण झालेलं आहे आणि ते मोडून काढण्यासाठी आणि जीवनशक्ती पुन्हा पूर्ववत होण्यासाठी (शक्तिवर्धक) उपाययोजना सुरू करण्याची गरज आहे.

हे झालं शारीरिक पातळीवरच्या दुर्गामातांबद्दल. आता जरा पुढे जाऊ. या जगात वावरताना आणि कोणतेही कार्य सिद्धीस नेण्याकरता आपल्याकडे शरीर, मन आणि बुद्धी ही तीन साधने आहेत. आपल्याला माहितीच आहे की कोणतेही साधन (यंत्र) वापरायचे म्हणजे त्याला चालवणारी एक शक्ती लागते. जसे मिक्सर चालवायला विद्युत शक्ती लागते किंवा गाडी चालवायला पेट्रोल/ डिझेल इंजिन लागते. खरं तर या विश्वात एकच शक्ती आहे. ती उर्जेच्या अनेक रूपात व्यक्त होते; म्हणजे उष्णता, प्रकाश, ध्वनी, अणू, विद्युत, वारा वगैरे. तशीच आपल्यालाही कार्य करण्यासाठी मन नावाची शक्ती मिळालेली आहे. ती, ‘इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती’ या स्वरूपात प्रकट होते.

म्हणजे असं बघा, एखादं चांगलं कार्य करण्याची प्रथम इच्छा व्हावी लागते. ते कार्य करण्याची जबरदस्त प्रेरणा झाली की या इच्छेचं ‘इच्छाशक्ती’ (‘विल पॉवर’)मध्ये रूपांतर होतं. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला शास्त्रज्ञ व्हायचं असेल तर त्यासाठी ‘त्या विद्यार्थ्याची’ इच्छाशक्ती जागृत व्हावी लागते. केवळ पालकांची इच्छा असून हे काम होत नाही. पण नुसती इच्छाच असेल तर ते दिवास्वप्न ठरेल. म्हणून त्या इच्छेची पूर्ती कशी करायची ते समजण्याकरता ‘ज्ञानशक्ती’ जागृत करावी लागते व योग्य ते ज्ञान मिळवावे लागते. प्रथम दहावी/ बारावी तसेच पुढच्या परीक्षांमध्येही योग्य त्या विषयात ‘उत्तम’ गुण मिळवावे लागतात. पण प्रत्यक्ष यश मिळतं ते क्रियाशक्तीच्या वापराने! या सर्व प्रवासात अर्थातच अडचणी येऊ  शकतात; नव्हे येतातच. त्या वेळी चिकाटी (कार्यरत इच्छाशक्ती) आपल्याला त्यातून तारून नेते. आपण नुकतेच वाचले किंवा ऐकले असेल की पी. व्ही. सिंधूने अॅलिम्पिक करता दुर्दम्य इच्छाशक्तीचा वापर केला. तिच्या कोचकडून ज्ञानशक्ती (खेळाचे कौशल्य व प्रत्येक सामन्याची व्यूहरचना) मिळविली व तिच्या स्वत:च्या सरावाने म्हणजे क्रियाशक्तीने साथ केली. अर्थात या सर्व प्रवासात अनेक विघ्ने असतात (पूर्वी साधनेत राक्षस विघ्ने आणत असत. आता टीव्ही, मोबाइल, सोशल मीडिया यांच्या अति वापराच्या रूपात विघ्ने आणली जातात). बहुतेकांना अशक्य वाटणारी गोष्ट म्हणजे स्पर्धेपूर्वी तीन महिने तिने मोबाइल दूर ठेवला होता. पार्टी वगैरे शब्द आजूबाजूला फिरकूही शकत नव्हते. हे केवळ या तीन शक्तींमुळेच (आणि पालकांच्या/ हितचिंतकांच्या पाठबळामुळे) होऊ  शकले. अनेक विद्यार्थीही परीक्षेच्या आधीच्या काळात अशाच प्रकारची ‘व्रते’ पाळताना दिसतात. त्यांच्या दृष्टीनं हेच नवरात्रीचे व्रत. सरस्वती पूजन म्हणजेच ज्ञानशक्तीची उपासना. मग तीच सरस्वती दुर्गेच्या रूपात येऊन वाटेत येणाऱ्या विघ्नांचा (राक्षसांचा) संहार करते. आणि मग तीच शक्ती इच्छापूर्तीची/ यशाची/ आनंदाची महालक्ष्मी म्हणून प्रकट होते.

शक्ती अदृश्य असते, पण तिचे कार्य मात्र दृश्य स्वरूपात आपल्याला दिसते. म्हणजे, विद्युत शक्ती आपल्याला दिसत नाही पण पेटलेला दिवा किंवा फिरणारा पंखा आपल्याला दिसतो व आपण म्हणतो वीज आहे. विश्वातली शक्ती अशीच अदृश्य आहे. तिचे कार्य म्हणजेच हे दृश्य विश्व. पण… आपण मानव आहोत. आपल्याला ती शक्ती ‘पाहिल्याशिवाय’ चैन पडत नाही, मग ती ‘दिसावी’ म्हणून आपण प्रतीकरूपाने, देवतेच्या रूपाने डोळ्यासमोर आणतो (उदा. अष्टभुजा). या देवतेला तिचे इच्छित कार्य साधण्याकरता वेगवेगळी आयुधे तिच्या हातात आहेत अशी कल्पना करतो. आपल्या मन:शक्तीचंसुद्धा (मनोदेवतेचंसुद्धा) असंच आहे. तिचे कार्य करण्याकरता काही आयुधे आपल्यापाशी आहेत. ही आयुधे म्हणजे धृति, स्मृती, मेधा, वाणी, क्षमा आणि इतर किती तरी गुण (भगवद्गीतेतही श्रीकृष्ण या गुणांना आपल्या विभूती म्हणतात). आपण एकेका गुणाकडेच पाहू या ना.

धृति म्हणजे धैर्य. ही शक्ती आपणा सर्वांना सतत वापरावी लागते. केवळ युद्धभूमीवर वीरांना लागते असे नसून, रोजचे जीवन हाही एक प्रकारचा संघर्षच आहे आणि त्यामध्ये टिकून राहण्याकरता आणि आपले इच्छित ध्येय गाठण्याकरता लागणारी शक्ती म्हणजे धैर्य. आपण कोणत्याही महापुरुषाचे (पुरुष हा शब्द येथे मानव या अर्थाने घ्यायचा आहे, ज्यात स्री-पुरुष दोघेही येतात) जीवन-चरित्र अभ्यासले तर धैर्यशक्ती ही सतत त्यांना त्यांच्या मार्गावर चालण्यासाठी मदत करत होती असे दिसते.

दुसरा गुण म्हणजे स्मृती किंवा स्मरणशक्ती. आपण मिळवलेले ज्ञान, अनुभव जर सतत आपल्याजवळ नसतील तर ध्येयप्राप्तीच्या प्रवासात आपण पुढेच जाऊ शकणार नाही (‘पुढचं पाठ, मागचं सपाट’ अशी स्थिती होईल.). पुष्कळ माहिती/ ज्ञान डोक्यात भरलेले असणे हे स्मृतीचे अव्यक्त रूप होय. परंतु ती माहिती/ ज्ञान वेळेवर उपलब्ध होणे (व्यक्त करणे) म्हणजे स्मरणशक्ती. याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बऱ्याच वेळा परीक्षा किंवा मुलाखत संपवून बाहेर आल्यावर कळते की, ‘अरे, हे उत्तर तर मला येत होतं परंतु त्या वेळी ते काही लक्षात आले नाही.’ या उलट काही जणांच्या बाबतीत भूतकाळातल्या कटू अनुभवांनी स्मृती भरलेली असते आणि तिचे सततचे स्मरण क्रोध/ चिंता/ ताण यामध्ये परिणित होते. यामुळे अत्यंत महत्त्वाच्या अशा स्मृतीशक्तीचा अपव्यय होतो. याकरता स्मृतीबरोबरच विस्मृती हीही शक्ती असावी असे मला वाटते. एका उदाहरणाने हे स्पष्ट करू. आपल्या सर्वांना माहितीच आहे की सध्या मोबाइलचा जमाना आहे. नवीन मोबाइल घेताना भरपूर मेमरी कॉपॉसिटी (स्मृतीसाठी जागा) आहे हे पहिले जाते. कारण जवळजवळ प्रत्येकाकडेच वेगवेगळे अॅप्स असतात. या अॅप्सवरच्या मेसेजेसमध्ये मेमरी वापरली जाते. प्रत्येक जण काही काळाने नको असलेले मेसेजेस काढून टाकतो (डिलीट करतो) व पुन्हा नव्या मेसेजेससाठी मेमरी तयार ठेवतो. साध्या फोनच्या बाबतीत आपण इतकी काळजी घेतो मग आपल्याला निसर्गाने दिलेली मेमरी (स्मृती) मात्र वर्षानुवर्षे तशीच अनावश्यक अशा आठवणींनी भरलेली असते. ती डिलीट नको का करायला? कशी डिलीट करायची? उत्तर आहे… ‘विस्मृतीने’. अहो, आपल्याकडेसुद्धा एक डिलीट बटन आहे त्याचं नाव ‘क्षमा’. म्हणूनच श्रीकृष्णांनी क्षमाशक्तीला दैवी संपत्ती म्हटले असावे. या क्षमाशक्तीमुळे व्यवहारात, आपल्या चांगल्या कार्यात मन:शक्तीचा अपव्यय टाळला जातो.

तिसरा गुण म्हणजे मेधा. मेधा म्हणजे बुद्धी हे आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती आहे. खरं तर मेधाचा अर्थ खूपच गहन आहे, परंतु आपल्यापुरतं बोलायचं तर मेधा म्हणजे आकलनशक्ती. आकलनातूनच सखोल आणि यथार्थ ज्ञान प्राप्त होते. एखाद्या गोष्टीची केवळ माहिती असणे म्हणजे ज्ञान नव्हे.

चौथं (आणि अत्यंत महत्त्वाचं) साधन आहे वाणी. मानवाला लाभलेली एक शक्ती. याचे सामर्थ्य आणि उपयोग आपण रोजच अनुभवतो. वाणी कशी असावी यासंबंधी आपल्या संस्कृतीत म्हटले आहे की, ‘जिव्हा मे मधुमत्तमा’ म्हणजे बोलणे गोड असावे आणि ते सत्य असावे (‘सत्यं वद’). तसेच ते मित (योग्य तितकेच) असावे. अशी वाणी(शक्ती) व्यक्तीला यशाकडे घेऊन जाते.

अजून, असे किती तरी गुण आपल्या सर्वांमध्ये आहेत. खरं म्हणजे प्रत्येक गुण ही शक्ती आहे. सद्गुण असो की दुर्गुण. सद्गुणांना दुर्गाशक्ती म्हणतात कारण त्यामुळे हातून सत्कृत्ये घडतात. तसेच दुर्गुणांना आसुरी किंवा राक्षसी शक्ती म्हणतात कारण त्यामुळे हातून दुष्कृत्ये घडतात. आपणा सर्वांमध्ये असणाऱ्या सद्गुणरूपी दुर्गाशक्तीची नवरात्रीच्या निमित्ताने झालेली जाणीव आपण वर्षभर जागृत ठेवू या आणि आनंदाने आपल्या आयुष्याची वाटचाल पूर्णत्वाकडे नेऊ  या.

अंजली श्रोत्रिय

health.myright@gmail.com