मनाची ताकद प्रचंड असते म्हणून बाऊबीसारखा माणूस केवळ एका पापणीच्या हालचालीवर संपूर्ण कादंबरी सांगू शकतो. माणूस मनानेच जगत असतो. कारण शरीर मनाशिवाय काम करू शकत नाही. अनेक कारणांमुळे मी आनंदी नाही अशी एकदा मनाची समजूत झाली की, तिथून एक न संपणारा नकारात्मक प्रवास सुरू होतो. या उलट काही कारण नसताना मी आनंदी आहे अशी समजूत करून घेतली तर आनंदी राहाणं आपल्या विवेकी मनाला सहज शक्य आहे. म्हणून तर समर्थानी मनाला ‘सज्जना’ अशी साद घालून उपदेश दिला आहे.

समाजात जेव्हा नैराश्य येतं किंवा नव्या उत्साहाची आवश्यकता असते तेव्हा स्फूर्तिदायी गीते किंवा स्फूर्तिदायी कथा, महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा गीतांमध्ये जोश असतो. अथक प्रयत्न, एकजूट, इच्छाशक्ती यांना महत्त्व असतं आणि मुख्यत: तरुणांना साद घातली जाते, त्यांच्यातला आवेश जागवला जातो. तरुण रक्त सळसळतं आणि मग हवं असलेलं कार्य होऊ  शकतं. स्वातंत्र्य लढय़ातील अशी कितीतरी स्फूर्तिगीतं, कथा आपण ऐकलेल्या आहेत. ‘बचेंगे तो औरभी लडेंगे’ म्हणणारा दत्ताजी शिंदे काय किंवा ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा’ म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि इतर कितीतरी जणांच्या कथा स्फूर्तीदायी आहेत. अफझलखानाचा शिवाजी महाराजांनी केलेला वध किंवा बाजीप्रभूंचा पराक्रम गाणारे पोवाडे केव्हाही आणि कितीही वेळा ऐकले तरी अंगात जोश आणतात.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा

इतिहासातील या कथांप्रमाणेच अजून एक प्रकार स्फूर्तिदायक कथांमध्ये मोडतो. या कथा बऱ्याच वेळा सामान्य माणसांसंबंधी असतात. अशा माणसांनी अपघाताने किंवा अन्य काही कारणाने शरीराचा(चे) अवयव गमावलेला असतानाही नैराश्याने घेरले न जाता परिस्थितीवर मात केलेली असते. ‘पॅरालिम्पिक्स’मध्ये या गोष्टीचं ठसठशीत दर्शन होतं आणि मन थक्क होऊन जातं. येत्या ७ सप्टेंबरपासून रिओ येथेच या ‘पॅरालिम्पिक्स’ खेळांना सुरुवात होते आहे तेव्हा आपण हे सर्व पाहणार आहोतच.

अशीच मन थक्क करणारी एक कथा आठवते. नव्वदच्या दशकातली ही कथा जगप्रसिद्ध आहे. ती ऐकण्याचा योग मला दहाबारा वर्षांपूर्वी आला. त्याचं असं झालं.. एका न्यूरॉलॉजिस्टचं भाषण ऐकत होते. बोलण्याच्या ओघात त्यांनी जाँ डॉमिनिक बाऊबी या माणसाची सत्यकथा सांगितली व त्याच्या आत्मचरित्राचे नावही सांगितले : ‘द डायव्हिंग बेल अ‍ॅन्ड द बटरफ्लाय’ (या नावामध्येही खूपच अर्थ दडलेला आहे त्याचा उल्लेख पुढे येईल). मीही त्या कथेने इतकी प्रभावित झाले होते की घरी येता येताच हे पुस्तक विकत घेतले आणि लगोलग वाचलेही. काय आहे बाऊबीची कथा?

जाँ डॉमिनिक बाऊबी हा फ्रेंच माणूस. पॅरिसमध्ये राहायचा. व्यवसायाने पत्रकार होता; परंतु महत्त्वाचं म्हणजे तो जगप्रसिद्ध ‘एल’ (एछछए) या फॅशन मासिकाचा मुख्य संपादक होता. पॅरिस शहर, तिथले फॅशन मॅगेझिन आणि त्या मॅगेझिनचा मुख्य संपादक अशी त्रयी एकत्र आल्यावर प्रसिद्धीचं वलय त्याच्याभोवती असेल तर नवल नाही. बाऊबी या वलयाचा आनंद तर घेत होताच; परंतु त्याबरोबर येणारी जबाबदारीही पार पाडत होता. सर्व व्यवस्थित चालले होते. आणि तो दिवस उजाडला, ८ डिसेंबर १९९५! त्या दिवशी आपल्या आलिशान कारमधून त्रेचाळीस वर्षांचा बाऊबी घरी परतत होता. अचानक त्याच्या मेंदूत रक्तस्राव सुरू झाला आणि तो बेशुद्ध पडला. त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पुढचे जवळजवळ वीस दिवस तो कोमात होता. त्यानंतर तो शुद्धीवर आला खरा, परंतु त्याच्या शरीरातल्या एकाही स्नायूची हालचाल होत नसल्याचे लक्षात आले. मेडिकल शास्त्राप्रमाणे त्याच्या ब्रेन-स्टेममध्ये झालेल्या रक्तस्रावाचा तो परिणाम होता. अन्न घेणे, बोलणे तर सोडाच, पण चेहऱ्यावरच्या एकाही स्नायूची किंवा हातापायांची कशाचीही हालचाल होत नव्हती. त्याच्या शरीरातला केवळ एकच स्नायू हलत होता आणि तो म्हणजे त्याच्या डाव्या डोळ्याची पापणी. या पापणीची उघडझाप करणे हेच त्याचे जगाशी संवाद साधण्याचे एकमेव साधन होते. बाऊबीच्या स्थितीला ‘लॉक्ड इन सिंड्रोम’ म्हणतात, म्हणजे आपणच आपल्या शरीरात बंदिस्त होणे.

शारीरिक पातळीवर बाऊबी पूर्णपणे अधू झाला असला तरी त्याच्या मेंदूचे कार्य मात्र व्यवस्थित चालू होते. त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. परंतु आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यावाचून गत्यंतर नव्हते. मग त्याने मनाशी एक निर्धार केला आणि काय केलं? त्याने चक्क एक पुस्तक लिहिलं. शरीराने काहीही करता येत नसताना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर त्याने हे कार्य केले. यासाठी एका मशीनची मदत घ्यावी लागली. या मशीनला पार्टनर-असिस्टेड-स्कॅनिंग म्हणतात. एक एक अक्षर या मशीनद्वारे त्याच्यापर्यंत पोहोचवलं जायचं. जेव्हा योग्य अक्षर यायचं तेव्हा त्याच्या पापणीची उघडझाप व्हायची. त्याची मदतनीस ते अक्षर लिहायची. असं एक एक अक्षर करून त्यानं हे पुस्तक लिहिलं. एका एका शब्दासाठी दोन ते तीन मिनिटं जायची. असं म्हणतात की संपूर्ण पुस्तक पूर्ण होण्यासाठी बाऊबीला दोन लाख वेळा पापणीची उघडझाप करावी लागली. अशा तऱ्हेने त्याने ‘द डायव्हिंग बेल अँड द बटरफ्लाय’ हे पुस्तक पूर्ण केले. त्या पुस्तकाचे (फ्रेंच आवृत्ती) प्रकाशन

७ मार्च १९९७ या दिवशी झाले आणि त्यानंतर केवळ दोन दिवसांनीच बाऊबीचे निधन झाले. या पुस्तकामध्ये बाऊबीने स्वत:च्या आयुष्यातील घटनांबरोबरच ‘लॉक्ड इन सिंड्रोम’ने ग्रासलेल्या रुग्णांच्या मनातील भावनांवरही भाष्य केले आहे. मेंदूच्या विकारांशी संबंधित तज्ज्ञांना बाऊबीचे हे पुस्तक म्हणजे एक चमत्कार वाटतो.

आता या पुस्तकाच्या शीर्षकाविषयी थोडेसे – ‘डायव्हिंग बेल’ ही एक घंटेच्या आकाराची लोखंडी पेटी, उपकरण असते. त्यामध्ये माणसाला बसवून समुद्रातल्या खोल पाणबुडीत सोडतात. कल्पना करता येईल की सर्व बाजूंनी बंदिस्त अशी लोखंडाची पेटी, त्यामध्ये जेमतेम बसता येईल इतकीच जागा, सभोवताली अंधार आणि खोल खोल जाणं.. वाचूनच किती घुसमटल्यासारखं वाटतं नं? बाऊबीची शारीरिक अवस्थाही अशीच घुसमटल्यासारखी झाली होती. परंतु त्याचं मन मात्र शंभर टक्के ‘जागं’ होतं. ते फुलपाखराप्रमाणं हलकं होतं. त्याची ही शारीरिक आणि मानसिक विरोधाभास दाखवणारी अवस्था त्याने या शीर्षकातून व्यक्त केलेली आहे. (या पुस्तकाची अनेक भाषांतरे झालेली आहेत आणि हॉलीवूड चित्रपटही निघालेला आहे.)

तर अशी ही बाऊबीची कथा. या कथेचा आपल्याशी संबंध आहे. आपल्या शरीराशी नाही, पण मनाशी याचा संबंध आहे. तसं बघायला गेलो तर माणूस हा मनानेच जगत असतो. कारण शरीर हे मनाशिवाय काम करू शकत नाही, असा आपला अनुभव आहे. ‘अरे, मी मनात आणलं तर..’ असं म्हणून एखाद्या कार्याचा संकल्प अगर आरंभ होत असतो. आणि या उलट आपण एखाद्याला चांगले काम करायला कितीही सांगितले तरी .. ‘पण ते त्याच्या मनाने घेतले पाहिजे ना!’ अशी शंका असते. म्हणजे आपलं सगळं जगणं मनावर अवलंबून आहे असं दिसतं. म्हणून तर समर्थानी मनाला ‘सज्जना’ अशी साद घालून उपदेश दिला आहे. पण मन हे स्वभावत:च चंचल आहे आणि त्यातही प्रकाशाच्या अफाट वेगापेक्षाही चपळ आहे. बहुतेक वेळा आपलं मन आपल्याच जवळ न राहता भूतकाळात तरी दडी मारून बसतं किंवा भविष्यकाळात तरी हरवून जातं. आपल्या बऱ्याचशा काळज्या किंवा चिंता याचं जणू ते मूळच असतं. तसंच आपल्या आयुष्यातले बरेचसे नको असलेले अनुभव हे मनाच्याच विकारांमधून येतात. मनाचे विकार म्हणजे अति क्रोध, अति लोभ, अति आळस, मत्सर, भय, नैराश्य वगैरे. यांचा आपल्याला काहीच फायदा होत नाही. उलट तोटाच होतो हे आपल्याला ठाऊकही आहे. या मनाच्या विकारांनी आपण ‘लॉक-इन’ होतो म्हणजे आपण आपल्यालाच बंदिस्त करून ठेवतो.

या मनाच्या विकारांनी जसे आपण बंदिस्त होतो तसेच मनाच्या काही सवयींनी पण होतो. उदाहरणार्थ, आपल्याजवळ काय नाही याचाच विचार मन सतत करत असतं. त्याऐवजी माझ्याकडे काय आहे (बाऊबीकडे फक्त एका पापणीची हालचाल होती!) याची नीट यादी केली तर ती ‘काय नाही’च्या यादीपेक्षा मोठीच निघेल. मला बंदिस्त करणारं कुलूप मीच काढू शकते ना, कारण किल्ली माझ्याचकडे आहे. तसंच आपण आपल्या मनाला काही विशिष्ट कल्पनांनी आणि काही समज/गैरसमज यांनीही कळत-नकळत ‘लॉक-इन’ करून घेत असतो. मग शरीर धडधाकट असूनही काही चांगलं कार्य आपल्या हातून घडत नाही.   थोडक्यात म्हणजे ‘मी आनंदी नाही, कारण..’ हे कुलूप आपण स्वत:ला लावून घेतलंय. व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणं प्रत्येकाचं कारण निराळं. पण काहीतरी एका किंवा अनेक कारणामुळे मी आनंदी नाही अशी एकदा मनाची समजूत झाली की, तिथून एक न संपणारा प्रवास सुरू होतो. या उलट काही कारण नसताना मी आनंदी आहे (परिस्थिती कशी का असेना) अशी जर आपण समजूत करून घेतली तर कोणाची हरकत असणार आहे? (कारण आधीची ‘मी आनंदी नाही’ ही समजूत पण आपणच करून घेतली होती की नाही?). उदाहरणच घेऊ या ना. असं बघा, वाढदिवसाच्या किंवा दिवाळीच्या दिवशी इतर सर्व परिस्थिती तशीच असते ना? पण तरीदेखील आपण आनंदी असतो की नाही? कारण आपण ठरवलेलं असतं की आज (वाढदिवस किंवा) दिवाळी, दसरा आदी सणाचा दिवस.. आनंदाचा दिवस. बस्स! आपण ठरवलं हेच ते कारण. मग ‘असं असेल तरच..’ किंवा ‘असं झालं तरच..’ या ‘अटी लागू’ कशाला? तेव्हा चला. आत्ता, या क्षणापासूनच म्हणूया, ‘मी आनंदी आहे. मी आनंदी आहे’. कारण?.. कारण काही नाही, तोच माझा ‘स्व’भाव आहे.

अंजली श्रोत्रिय

Health.myright@gmail.com