29 September 2020

News Flash

ही जीवनशैली की मरणशैली?

पुणे हे भारताचे महत्त्वाचे शहर. त्याला कारणंही तशीच आहेत.

आधी स्थिर बुद्धीचा पाया, त्यावर समतोल व सुसंस्कृत मनाची इमारत व वरती शरीराचा दिसणारा कळस असं आरोग्यमंदिर बांधायला हवे. परंतु सध्या बॉडी क्लॉक बिघडल्याने शारीरिक, मानसिक परिणाम अर्थात ‘सोशल जेटलॅग सिंड्रम’ जाणवू लागला आहे. आपली बदलती जीवनशैलीच याला कारणीभूत आहे.

पुणे हे भारताचे महत्त्वाचे शहर. त्याला कारणंही तशीच आहेत. पुण्याची ऐतिहासिक परंपरा, सौम्य  हवामान, शैक्षणिक सुविधा, आय.टी. आणि इतर इंडस्ट्रीज इत्यादी. एका गोष्टीत पुणे उणे आहे असे वाटत होते; परंतु पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने काही काळापूर्वी प्रसिद्ध केलेली एक माहिती पाहाण्यात आली. त्यावरून पुण्याने ‘हम किसीसे कम नही’ हे दाखवून दिले. ही माहिती म्हणजे मधुमेह (डायबेटीस) आणि उच्च रक्तदाबाने (हाय ब्लड प्रेशर) मृत्यू पावलेल्यांची संख्या. २००३ पासून २०११ पर्यंतची वर्गवारी दिलेली आहे. म्हणजे २००३ मध्ये मधुमेहाने २०७ लोक तर उच्च रक्तदाबाने २३४ लोक मृत्यू पावले. ही संख्या दरवर्षी वाढत जाऊन २०११ मध्ये मधुमेहामुळे १३४३ तर उच्च रक्तदाबामुळे ११४९ लोक मरण पावले. हे आकडे मृत्यूच्या दाखल्यावर डॉक्टरांनी लिहिलेल्या मृत्यूच्या कारणावर आधारित आहेत. प्रत्यक्षात प्रमाण वेगळे असू शकेल. आपण त्यावर लक्ष केंद्रित न करता केवळ माहिती म्हणून याकडे पाहिले तरी परिस्थितीचा अंदाज येतो.
जागतिक आरोग्य संघटनेने (हऌड) भारतातील मृत्यूच्या प्रमाणाच्या संबंधात असे म्हटले आहे की इथे दर दहापैकी केवळ दोनच मृत्यू हे संसर्गजन्य रोगांमुळे होतात. उरलेल्या आठ मृत्यूमागे ‘लाइफस्टाइलने’ दगावलेल्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी वार्धक्य हे मृत्यूचे नैसर्गिक आणि म्हणून नित्य कारण असे व अधूनमधून येणारे साथीचे रोग हे नैमित्तिक कारण असे. ‘लाइफ’ असले की ‘डेथ’ असणे हे निसर्गाला धरूनच आहे. पण लाइफ ‘स्टाइल’ आहे म्हणून ‘डेथ’ आहे ही प्रगती (?) केवळ मानवानेच केली आहे. कारण पूर्वी घराघरांतून बहुतांशी आजोबा, पणजोबा, आजी, पणजी, यांना ‘देवाज्ञा झाली’ अशा तारा येत असत. आता वडील, काका, भाऊ, मुलगा ‘सडनली एक्स्पायर्ड’ असे एसएमएस येतात. यावरून मला पूर्वी वाचलेले एक वाक्य आठवते ते असे की शांतता काळ आणि युद्धकाळ यामध्ये मुख्य फरक कोणता? तर शांतता काळात मुलगा वडिलांचा अंत्यसंस्कार करतो परंतु युद्धकाळात याच्या उलट परिस्थिती असते. आजकालच्या लाइफस्टाइलमुळे युद्धासारखी परिस्थिती आलीय की काय अशी भीती वाटत आहे.

वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे आणि त्यायोगे ज्ञानाच्या प्रसारामुळे देवी, कॉलरा, टायफॉइड वगैरे (प्रतिपक्षाच्या) विकेटस् आपण काढल्या, पण आपले बॅटस्मन मात्र (लाइफ) स्टाइलच्या नावाखाली ‘हिट विकेट’ होऊन आऊट होत आहेत. हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, वजनवाढ, वेगवेगळे कर्करोग हे सर्व लाइफस्टाइलमुळे येणारे म्हणून यांना लाइफस्टाइल डिसीझेस (एल.डी) असं म्हणतात. या एल.डी.चे गिऱ्हाईक छोटय़ांपासून मोठय़ांपर्यंत सर्वजण. गिऱ्हाईक हा शब्द अशा करता की आपणहून हे रोग पैसे खर्च करून घरी आणतो. रोग म्हटला की आपल्या डोळ्यांपुढे कोणतातरी व्हायरस दिसायला लागतो. मग एल.डी.चा काही व्हायरस आहे का हो? हो. आहे तर. ‘सगळं काही इथेच आणि आत्ताच’ हे या व्हायरसचं नाव आहे आणि गंमत म्हणजे हा व्हायरस शरीरात न घुसता मनातच घर करतो. त्यामुळे तो कोणत्याही ‘स्कोपी’ मध्ये दिसत नाही, इतका तो सूक्ष्म आहे.

लेखाच्या सुरुवातीला दिलेले आकडे मृत व्यक्तींचे आहेत. ते तितकेसे गंभीर वाटत नसले तरी गेल्या ३-४ वर्षांत चित्र खूपच पालटलेले आहे. मृत्यूचे मूलभूत कारण असणाऱ्या उच्च रक्तदाब व मधुमेह या रोगांनी पीडित रुग्णांमध्ये कितीतरी पटींनी वाढ झालेली आहे. प्रौढांमध्ये तीस-चाळीस टक्के लोक उच्च रक्तदाबाने तर दहा ते वीस टक्के लोक मधुमेहाने पीडित आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. प्रौढच कशाला, (टाइप टू) मधुमेहाने ग्रस्त असलेल्यात आता विशीतले तरुण आणि तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही; परंतु दहापंधरा वर्षांची स्थूल मुलेही समाविष्ट होताना दिसतात.
हे कमी की काय रस्त्यांवरील अपघातांचे आकडे सतत वर्तमानपत्रात येत असतात. गेल्या वर्षी (२०१४) भारतात रस्ते अपघातांमुळे ७५ हजार मृत्यू झाले. पण थांबा. हा झाला बातमीचा अर्धा भाग. पुढचा अर्धा भाग सांगतो की ही सर्व माणसे १५ ते ३५ वयोगटातली होती. याशिवाय ३५ ते ६५ वयोगटातील ५० हजार माणसे अपघातांमध्ये दगावली म्हणजे सव्वा लाख माणसे अपघातांमध्ये दगावली. या अपघातांची कारणे म्हणजे वेग (५७ हजार), अतिवजनाचे वहन (२७ हजार), मद्य प्राशन (७ हजार) आणि हिट अँड रन (२० हजार) या सर्व कारणांचा जीवनशैलीशी खूप जवळचा संबंध असलेला दिसतो. ‘नवा गडी नवं राज्य’ या म्हणीप्रमाणे यामध्ये (जीवनशैलीमध्ये) आता अजून एका नव्या विकाराची भर पडली आहे (नव्हे, नव्हे आपणच ही भर टाकलेली आहे) या विकाराचं नाव आहे ‘सोशल जेटलॅग सिंड्रोम’. या सिंड्रोमचा आणि विमानाने प्रवास झाल्यानंतर येणाऱ्या जेटलॅगचा काहीही संबंध नाही.

जगभरातल्या तरु ण पिढीला या विकाराने ग्रासले आहे. या सिंड्रोमचा अर्धवट, पूर्ण न झालेल्या झोपेशी संबंध आहे. कामाचा ताण, कामासाठी खूप दूर अंतर कापताना लागणारा वेळ, ट्रॅफिकचा ताण यामध्ये दिवसाचे १२ ते १४ तास जातात. घरी उशिरा आल्यानंतर व्यवस्थित ‘घरचं’ (किंवा घरच्यासारखं) जेवण घेतलं जातच असं नाही. त्याची जागा पिझ्झा, पास्ता, बर्गर, वडापाव वगैरेसारखे ‘पार्सल’ पदार्थ घेतात व पाण्याची जागा सॉफ्ट ड्रिंक्स, फ्रुट ड्रिंक्स भरून काढतात. शिवाय रात्री झोपायच्या ऐवजी  ‘निवांतपणे’ सोशल नेटवर्किंग अपडेट करताना वेळ कसा व किती ‘तास’ला जातो ते कळतच नाही. परिणामी निकृष्ट आहारामुळे पचनसंस्थेवर ताण पडतो व अपुऱ्या झोपेमुळे मेंदूवर ताण पडतो. कामाच्या वेळेत पेंग येते. झोपेची थकबाकी आठवडाभर साठवली जाते.  वास्तविक डेली झोपेचा डेबिट बॅलन्स डेली झोप भरूनच सेटल करावा लागतो, असा निसर्गनियम आहे. हा क्रेडिटवर टाकता येत नाही. निसर्गाला ‘चलता है’ फार काळ चालत नाही. त्यामुळे शरीरात आळस भरतो. बॉडी क्लॉक बिघडल्याने जे शारीरिक, मानसिक परिणाम दिसू लागतात त्याला ‘सोशल जेटलॅग सिंड्रम’ म्हणतात. या सिंड्रोममुळे हॉर्मोनमधले असंतुलन, सतत मूड बदलणे, आत्मविश्वास गमावणे, कार्यक्षमतेत घट येणे. पचनसंस्थेचे विकार वगैरेसारखे विकार होऊ शकतात. मुख्य म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी होते. खरं म्हणाल तर आपल्याला शरीरात रोगप्रतिकार शक्ती (इम्युनिटी) निसर्गानेच विनामूल्य दिली आहे. पण कोणत्याही विनामूल्य गोष्टीप्रमाणे आपल्याला तिची किंमत राहिलेली नाही. तिची देखभाल व वाढ आपण करत नाही त्यामुळे व्हायरस आता आला तरी दुर्बल प्रतिकारशक्तीमुळे तो आतमध्ये स्थिरावतो व धुमाकूळ घालतो. त्याला बाहेर काढता काढता शरीराची नासाडी होते.

जे शरीराच्या इम्युनिटीबद्दल तेच मनाच्या इम्युनिटीबद्दल म्हणता येईल. हातात खुळखुळणारा पैसा, बाजारात अनेक वस्तूंची- विशेषत: चैनीच्या वस्तूंची आणि खाण्यापिण्याची मुबलकता, मनाला चिथावणी देणाऱ्या टीव्ही, पेपर, रेडिओ, मोबाइलवर चोवीस तास येणाऱ्या जाहिराती ऑफर्स, क्रेडिट घ्या म्हणून पाठीमागे लागलेल्या बँका.. एकदा का ऋ ण काढून सण करायची सवय लागली की त्याची परिणती आर्थिक दिवाळखोरीत होते. त्याप्रमाणे हा व्हायरस एल.डी.च्या रूपाने किंमत वसूल करतोच. मानसिक शांतता, मनाचा समतोलपणा, विचार व संयम, सोशिकपणा या मनाच्या व्यायामाच्या  अभावामुळे व संस्काररूपी पोषणाच्या अभावामुळे मनाची प्रतिकारशक्ती कमी होते व व्हायरस आत स्थिरावतो. तो थेट बुद्धीवरच अंमल चालवतो व तिला वश करून घेतो. एकदा बुद्धी मनाला साथ देऊ लागली की पोलीसच चोराला सामील झाला की जे व्हायचं ते आपल्याबाबतीत घडायला लागतं. ‘पोलीस आहेत’ या भरवशावर आपण गाफील राहतो व आपल्या नकळत घरावर दरोडा पडल्यावरच जागे होतो. त्यावेळी पोलिसाची (म्हणजे बुद्धीची) हजेरी केवळ पंचनाम्यापुरतीच असते. पंचनामा चोरी थांबवत नाही तर ती झाली आहे एवढंच सिद्ध करतो. ज्या अनेक महागडय़ा मेडिकल टेस्टस् आपण करून घेतो तो आपल्या आरोग्याची घरफोडी झाल्यानंतरचा एक प्रकारे पंचनामाच असतो. (एरवी साध्या युनिट टेस्टला घाबरणारे आपण या टेस्टस्ला स्वत:हून बसतो!)

रोग म्हटला की त्यावर काही उपचार येतातच. तेव्हा आता या एल.डी वर काय उपाय ते पाहू. शरीर हे सहज दिसणारं म्हणजे स्थूलरूप आहे. त्याच्यावर सूक्ष्म अशा इंद्रियांची सत्ता चालते. या इंद्रियांवर सूक्ष्मतर अशा मनाची सत्ता चालते व मनावर सूक्ष्मतम बुद्धीची सत्ता चालते. पण सध्याचं दृश्य काय सांगतं? इंद्रियांची सत्ता मनावर आणि मनाची सत्ता बुद्धीवर! सगळीच उलटी आणि ढिसाळ मॅनेजमेंट. हे म्हणजे चपरासी किंवा रिसेप्शनिस्टने सी.ई.ओ.ला कंट्रोल करण्यासाठी अवस्था. परिणाम? वर नमूद केलेला व्हायरस आत घुसतोय व स्थिरावतोय.

तेव्हा आधी स्थिर बुद्धीचा पाया, त्यावर समतोल व सुसंस्कृत मनाची इमारत व वरती शरीराचा दिसणारा कळस असं आरोग्यमंदिर बांधायला हवे. सध्याच्या जीवनशैलीचे पर्यावसन आरोग्यमंदिरात न होता टॉवरमध्ये होतंय ज्याचा पाया कच्चा आणि कळसासारख्या टॉवरला पॉलिश असते. विचार करावासा वाटतो की ही जीवनशैली की मरणशैली? प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं. आपल्याला व्यायामाचं ,  पौष्टिक आहाराचं स्वातंत्र्य आहे, पुरेशी झोप घेण्याचं स्वातंत्र्य आहे. थोडक्यात म्हणजे आरोग्यदायी व आनंददायी जीवन जगण्याचं स्वातंत्र्य आहे.
बॉल इज ऑलवेज इन अवर कोर्ट!
health.myright@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2016 1:15 am

Web Title: social jet lag sindrome
टॅग Social Media
Next Stories
1 प्रवास हा सुखाचा
Just Now!
X