News Flash

शरीरयंत्र

वेगवेगळी माणसं त्यांच्या व्यवसायानुसार वेगवेगळी यंत्रं वापरतात

समर्थानी ‘दासबोध’मध्ये म्हटलंच आहे ‘‘या शरीरयंत्रासारखे यंत्र आणिक नाही.’’ इतकं गुंतागुंतीचं असूनही त्याचा कारभार अत्यंत सुसूत्रपणे चाललेला असतो; परंतु आश्चर्य म्हणजे रोज चोवीस तास वापराव्या लागणाऱ्या या यंत्राबद्दल आपल्याला ना नीट माहिती असते ना त्याविषयी आदर असतो. ती माहिती करून देणारा आणि त्याविषयी आदर कसा व्यक्त करायचा ते सांगणारा लेख.

कोणतंही यंत्र- मग ते साधा स्क्रू ड्रायव्हर असो नाही तर प्रचंड जंबो जेट असो, त्याचा अपेक्षित आणि योग्य प्रकारे उपयोग करून घ्यायचा असेल, तर ते यंत्र नीट समजून घ्यायला लागतं. नुसती त्या यंत्राची रचनाच नव्हे, तर कोणत्या ठिकाणी व कशा प्रकारे ते वापरलं जातं, त्याचा बाहय़ जगाशी कसा संबंध येतो याचा सर्वागीण (होलिस्टिक) विचार करणं गरजेचं असतं. तसं केलं नाही तर ते यंत्र वापरताच येणार नाही असं नाही; पण त्याचा उपयोग फारच मर्यादित होईल किंवा चुकीच्या वापराने ते बिघडू शकेल किंवा त्यापासून अपघातही होऊ शकेल.
वेगवेगळी माणसं त्यांच्या व्यवसायानुसार वेगवेगळी यंत्रं वापरतात; पण प्रत्येक व्यक्तीला रोज वापरावं लागणारं यंत्र कोणतं? फार विचार करायला नको. आपलं शरीर हेच ते यंत्र. समर्थानी ‘दासबोध’मध्ये म्हटलंच आहे ‘या शरीरयंत्रासारखे यंत्र आणिक नाही.’’ इतकं गुंतागुंतीचं असूनही त्याचा कारभार अत्यंत सुसूत्रपणे चाललेला असतो; परंतु आश्चर्य म्हणजे रोज चोवीस तास वापराव्या लागणाऱ्या या यंत्राबद्दल ना आपल्याला नीट माहिती असते ना त्याविषयी आदर असतो. त्यामुळे कितीही दणकट आणि टिकाऊ असलं तरी ते बिघडतं आणि मग त्याला शरीराचे इंजिनीयर्स (डॉक्टर्स) किंवा वर्कशॉप (हॉस्पिटल) मध्ये दुरुस्तीसाठी न्यावं लागतं. काही वेळा याच्या एकेका भागाच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च येऊ शकतो. काही वेळा कित्येक दिवस वर्कशॉपमध्ये ठेवावं लागतं.
याआधीच्या एका लेखात आपण पाहिलं की, निसर्गाकडून मोफत मिळालेल्या या शरीररूपी यंत्राचे मूलद्रव्य म्हणजे यामध्ये असलेल्या (जवळजवळ दोनशे प्रकारच्या) असंख्य पेशी. या पेशींच्या समूहापासून उती (टिश्यू), अवयव आणि संस्था बनतात. आपल्या शरीरात अशा बारा संस्था एकमेकींच्या साहाय्याने सतत काम करत असतात. यांच्या अखंड चालणाऱ्या कार्यामुळेच आपण जगू शकतो, उत्साहाने इकडेतिकडे वावरू शकतो.
इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील प्रगतीमुळे दररोज नवनवीन गॅजेट्स बाजारात येत आहेत. त्यांच्यासाठी वापरली जाणारी अनेक प्रकारची अ‍ॅप्सही येत आहेत. याविषयीची उत्सुकता केवळ तरुण वर्गालाच नाही, तर ज्येष्ठांनाही असते व त्यासंबंधीची माहिती घेण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो. सध्या ‘टेकसॅव्ही’ हा परवलीचा शब्द झालाय. अगदी धुणीभांडी/घरकाम करणाऱ्या स्त्रियाही व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेजेस वाचताना सर्रास दिसतात. हा बदल छानच आहे. याचा अर्थ ज्याची आपल्याला नड असते त्याविषयी जाणून घेण्याची गरज आपल्याला वाटते आणि असं जाणून घेतल्याने आपण समाजापासून दूर/वंचित नसून त्या समाजाचाच एक भाग आहोत, ही भावना येते व मनाला समाधान वाटतं; परंतु हा नियम शरीराला मात्र लावला जात नाही. ज्या यंत्रामुळे आपलं अस्तित्व आहे त्याच यंत्राला गृहीत धरलं जातं. वैद्यकशास्त्रामधून शरीराची माहिती जशी दिली जाते तशी ‘कठोपनिषद’मधूनही एका रूपकाद्वारे शरीराचं वर्णन केलं जातं. ते असं- आपलं शरीर म्हणजे एक रथ आहे. आपला जीव हा त्या रथाचा स्वामी आहे. इंद्रिये (सहज प्रवृत्ती) म्हणजे त्या रथाचे घोडे आहेत. बुद्धी ही त्या रथाची सारथी असून मन हे लगाम आहे. असा हा रथ विषयोपभोगाच्या वस्तुरूपी मार्गावरून धावत असतो.
या रूपकाप्रमाणेच एखाद्या मोठय़ा कंपनीचेही रूपक शरीराला देता येईल. एखाद्या कंपनीचा चांगला मालक आपल्या कामगारांना काय सोयी हव्यात ते पाहतो. कामगारांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना शाबासकी देतो, बक्षीस देतो, त्यांचं मनोधैर्य उंच ठेवण्याचा प्रयत्न करतो. अर्थात याचा फायदा कंपनीलाच आणि पर्यायाने मालकालाच होतो. आपल्या शरीरातल्या पेशीसुद्धा अत्यंत विश्वासू आणि कामसू कामगार आहेत. त्यांचं कार्य उत्तम रीतीने चालवण्याबद्दल आपण (मालक या नात्याने) पाहिलं पाहिजे. काय हवं असतं पेशींना? पेशींना हवं असतं शुद्ध, सात्त्विक अन्न, तेही योग्य वेळी योग्य प्रमाणात. पेशींना हवं असतं शुद्ध पाणी आणि श्वासावाटे आत येणारा ऑक्सिजन, शरीराला योग्य ती विश्रांती (झोप) देण्यानं पेशींच्या नेमून दिलेल्या कार्याला काही प्रमाणात विश्रांती मिळते; पण या काळात पेशी झोपलेल्या नसतात, तर त्यांचं ‘हीलिंग’ प्रक्रियेचं, शरीराची वाढ करण्याचं पडद्यामागचं काम चालू असतं. शरीराला ताजंतवानं वाटण्यासाठी अशा विश्रांतीची गरज असते. विश्रांतीप्रमाणेच योग्य अशा व्यायामाचीही शरीरयंत्र नीट ठेवण्यासाठी गरज असते. बाकी आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे आपल्या शरीराचं कार्यच आहे- मानवाच्या जगण्याच्या प्रवृत्तीतून आलेलं.
बऱ्याच वेळा मला प्रश्न पडतो की, पचन, रक्ताभिसरण, चयापचय (मेटॅबॉलिझम) वगैरेसारखी कामं जर ‘आपल्या हातात’ असती तर? ‘मला खाल्लेलं अन्न पचवायला वेळ मिळाला नाही’ किंवा ‘कामाचा इतका ताण होता की, रक्ताभिसरण करायलाच विसरलो’ किंवा ‘बोलण्याच्या नादात रक्त शुद्ध करायचंच राहून गेलं’ असं काही तरी म्हणत राहिलो असतो आणि याच्या परिणामाची कल्पनाही करता येत नाही.
शरीरातल्या पेशी आपल्याला साहाय्य करण्याचं काम करतात, पण आपण त्यांना साहाय्य करतो का? उलट, आतमधल्या सुसूत्रपणे चाललेल्या कामात आपण चुकीच्या वागण्याने अडथळाच आणत असतो. जीवनशैलीच्या नावाखाली केव्हाही आणि कितीही प्रमाणात तळलेले, मसालेदार, चरबीयुक्त, साखरेचे किंवा नमकीन पदार्थ खाल्ले जातात आणि पाण्याऐवजी सॉफ्ट ड्रिंक्स, अल्कोहोल, तंबाखू यांचे सेवन होते. (हे म्हणजे पोलीस किंवा शिक्षक यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कामांना लावण्यासारखे आहे आणि त्याचे समाजजीवनावर होणारे परिणाम आपण पाहतोच.) यामुळे शरीराचे आतले संतुलन बिघडते; पण कमाल म्हणजे अशा असंतुलित वातावरणातही पेशी चिडून न जाता तो समतोल परत मिळवण्यासाठी इतर प्रक्रिया सुरू करतात व त्याची सूचना म्हणून आपल्याला बाहेर दिसण्यासारखी चिन्हं व लक्षणं दाखवतात. (ताप येणं, खोकला, वेदना, खाज, उलटी, डायरिया वगैरे). अशा वेळी पहिल्यांदा आपल्याला आत काही तरी चाललंय याची जाणीव होते; परंतु अज्ञानाने म्हणा किंवा निष्काळजीने म्हणा, आपण शरीराला तो समतोल परत मिळवण्याची संधी न देता त्या बाहय़ लक्षणांनाच समस्या समजून ती बंद करण्यासाठी अँटॅसिड्स लॅक्झेटिव्हज, अँटी- इन्फ्लमेटरी ड्रग्ज, पेन किलर्स वगैरे घेतो. पुन्हा हा सर्व कचऱ्याचा निचरा पेशींनाच करावा लागतो. बरेच दिवस असे चालू राहिले तर शरीरात टॉक्सिन्सची (विषारी द्रव्यांची) वाढ होते आणि दाह (इन्फ्लेमेशन) सुरूच राहते. आपणच आपल्या शरीरावर केलेल्या या भ्रष्टाचाराला काय म्हणावं?
मग आता करायचं काय? करायचं तसं फारसं काही नाही. बाहेरच्या जगात आपण क्षणोक्षणी ‘सॉरी’ किंवा ‘थँक यू’ म्हणतोच की नाही? तेच काम आपल्या आतल्या जगासाठी करायचं. यासाठी दिवसातली केवळ पाच-दहा मिनिटं पुरेत. बाहेरचे डोळे मिटून आपल्या आत दृष्टी वळवावी व आतल्या विश्वाकडे एकदा प्रेमानं पाहावं. (आतल्या अफाट विश्वाचा विचार करावा). त्या अवाढव्य विश्वाकडे त्याचा मालक म्हणून पाहावं. त्याच्या बिनबोभाट चाललेल्या कार्याचं कौतुक करावं. हृदयावर हात ठेवावा. त्याचे ठोके देणं (हार्ट बीट्स) एकाग्रतेने ऐकावेत. हृदयाशी बोलावं. त्याला सांगावं की, जन्मापासून एक सेकंदही उसंत न घेता तुझं कार्य चाललं आहे याची मला कल्पना आहे. ते कार्य बंद झाल्यास या देहाचं काय महत्त्व उरेल? त्याचप्रमाणे मेंदूवर (डोक्यावर) हात ठेवून त्याच्या कार्याबद्दल शाबासकी द्यावी. (मेंदूचं कार्य काही कारणांनी थांबलं तर उरलेल्या देहाला व्हेजिटेबल म्हणून संबोधलं जातं). याचप्रमाणे ज्ञानेंद्रिये आणि कर्मेद्रियांचं कौतुक करावं. एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे शरीरातल्या पेशी जिवंत असतात आणि बुद्धिवानही असतात. आपण केलेलं कौतुक, शाबासकी त्यांना समजते. अशा कौतुकामुळे अजून चांगलं काम करण्याचं बळ त्यांना येतं; पण हे कौतुक वरवरचं नसावं, मनापासून असावं. जगात वावरताना आपल्या माणसाचं कौतुक करताना आपण बक्षीसही देतो. आपल्या पेशींचंही कौतुक केल्यानंतर बक्षीस म्हणून योग्य आहारविहार ठेवावा.
यामुळे शरीरावरचा, मनावरचा ताण दूर होण्यास मदत होईल. शरीर आरोग्यवान आणि मन प्रसन्न राहील. ‘गीते’त म्हटल्याप्रमाणे ‘आत्मैव आत्मन: रिपु’ होण्याऐवजी ‘आत्मैव आत्मन: बंधु’ हे वचन एका अर्थाने खरं करून दाखविता येईल.
– अंजली श्रोत्रिय
health.myright@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2016 1:41 am

Web Title: spiritual article about human body
टॅग : Human Body
Next Stories
1 ‘सेले’ब्रेशन
2 रोटी, कपडा, मकान आणि खूप काही
3 ही जीवनशैली की मरणशैली?
Just Now!
X