21 March 2019

News Flash

उडती दुनिया

मोठय़ा संख्येने समूहात राहाणारे हे पक्षी हॉर्न वाजवल्यासारखा कलकलाट करून एकमेकांशी संवाद साधतात.

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यंच्या सीमेवर वसलेला उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातला परिसर म्हणजे भिगवण. इथे दरवर्षी हजारो स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात.

वेळ कशी भुर्रकन उडून जाते कळतच नाही. नवीन वर्ष सुरू होऊन योजलेले बेत अमलात आणायला सगळ्यांनी सुरुवात केली असेलच. गेल्या वर्षी आसमंतातल्या प्रवासात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्या निसर्गगप्पा आपण मारत होतो. निसर्गलयीत बदलणारा आसमंत आणि त्यातले बारकावे टिपण्याचा तो लहानसा प्रयत्न होता. आसमंतातून आता जंगलाकडे वळताना वर्षांच्या सुरुवातीलाच निसर्गात घडणाऱ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष दिलं तर वर्षअखेर अनेक सुखद घटना आठवणींच्या शिदोरीत जमा होऊ  शकतील हे नक्की. जानेवारी महिन्यात युरोप व मध्य आशियातून आपल्याकडे अनेक पंखवाले पाहुणे दाखल होत असतात. वर्षांनुर्वष ठरलेल्या मार्गावरून ही पंखवाली मंडळी प्रवास करतात, पिढय़ा वाढवतात आणि परत जात असतात. या पाहुण्यांना पाहण्यासाठी जाण्याचे बेत आखणं या जानेवारीतली मस्ट टू डू गोष्ट म्हणायला हरकत नाही.

युरोप आणि मध्य अशियात थंडीचा कडाका वाढला की आपल्याकडे येणाऱ्या काही चिरपरिचित पाहुण्यांबद्दल न चुकता लिहिलं जातं. या लिखाणामध्ये ठरावीक ठिकाणांची हमखास माहिती असते जिथे हे पक्षी मुक्कामाला असतात किंवा मोठय़ा संख्येने पाहायला मिळतात. अशाच एका ठिकाणाच्या आणि तिथे होऊ  घातलेल्या विशेष घटनेची ही कथा. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यंच्या सीमेवर वसलेला उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातला परिसर म्हणजे भिगवण. भीमा नदीवर बांधलेल्या या धरणामुळे डिकसळ पारेवाडी आणि दळज कुंभारवाडी हे दोन भाग दलदलीच्या पाणवठय़ाच्या जागा बनल्या असून इथे दरवर्षी हजारो स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात. या भिगवण परिसरात, रोहित पक्षी अर्थात फ्लेमिंगो शेकडय़ांनी पाहायला मिळतात. याच पाणथळीत अनेक प्रकारची बदकं, बगळे, करकोचे तर पाहायला मिळतातच, जोडीला इतर पाणपक्षी आणि माळरानावर आढळणारे पक्षी इथे हमखास दर्शन देतात. पुणे आणि सोलापूर शहरांपासून अवघ्या सव्वाशे किलोमीटर्सच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणाला हमखास स्थलांतरित पक्षी दिसण्यामुळे अलीकडेच खूप लोकप्रियता मिळायला लागली आहे. मात्र पक्षी बघण्यासाठी शनिवार-रविवार अक्षरश: शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक साधन- संपत्तीवर ताण पडतो आहेच, पण त्याचबरोबर मानवी वर्दळीमुळे पक्षी दिसण्याचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यटन आणि निसर्गभ्रमण, निसर्गपर्यटन आणि पक्षी निरीक्षण यातला फरक समजावून न घेता जंगलात, निसर्गाकडे जाणाऱ्या पर्यटकांचा दृष्टिकोन कायम सरधोपट असतो. अशा लोकांसाठी, जंगलात वाघ आणि पक्षी बघायला गेल्यावर स्थलांतरित पक्ष्यांमध्ये ग्रेटर फ्लेमिंगो पाहायला मिळाले तरच त्या ट्रिपचा पैसा वसूल असतो. अशा लोकांमुळे अभ्यासकांना त्रास होतोच, पण परिसरातील अनेक अप्रतिम गोष्टींकडे कानाडोळा होतो.

कुठल्याही पक्ष्याला त्याच्या पिल्लांसोबत किंवा साथीदारासोबत विहार करताना पाहणं यासारखं दुसरं सुख नसतं. थंडीच्या काळात आपल्याकडे येणाऱ्या आणि दीर्घकाळ  मुक्काम ठोकणाऱ्या काही पक्ष्यांच्या लकबी, सवयींच्या जोडीला केल्या जाणाऱ्या वैशिष्टय़पूर्ण गोष्टींकडे लक्ष दिलं तर कित्येक अद्भुत गोष्टी नजरेस पडतात. या निरीक्षणात सहजच पाणथळीत आपल्या चमच्यासारख्या चोचीने पाणी ढवळत आणि खाद्य पकडत फिरणारा युरेशिअन स्पुनबिल अर्थात चमचा पक्षी नजरेस पडतो. युरोपातल्या उन्हाळ्यात पिल्लं जन्माला घालून थंडीत आपल्याकडे स्थलांतर करणारा हा पक्षी या पाणथळीत अगदी सहज बागडताना दिसून येतो. या चमच्याच्या जोडीलाच भरपूर संख्येने दिसणारी बदकं म्हणजे रुडी शेलडक ऊर्फ ब्राह्मणी डक हिमालयातून आपल्याकडे थंडीसाठी स्थलांतर करून आलेली दिसतात. सौम्य हलक्या भगव्या रंगाची ही बदकं आपल्या थव्यात मुक्तपणे फिरताना पाहणंही आनंदाचा अनुभव असतो. रुडी शेलडक्सच्या खेरीज भिगवण, कुंभारगाव परिसरात पांढऱ्या मानेचे करकोचे, पेंटेड स्टॉर्क्‍स, हेरॉन्सच्या जाती, पाणकोंबडय़ा, कोतवाल, घारी, गरुड अशा अनेक सुपरिचित पक्ष्यांच्या जोडीनेच भिगवण परिसरात गेली काही वर्षे रोहित पक्षी म्हणजेच फ्लेमिंगो पक्षी अगदी शेकडय़ांच्या संख्येने वास्तव्यास येत आहेत. हे रोहित पक्षी कायम बहुतेकांच्या कुतूहलाचा विषय राहिले आहेत. साधारण साठ इंचांपर्यंत वाढणारा नर रोहित पक्षी तर माणसापेक्षाही उंच वाटू शकतो. या रोहित पक्ष्याचं वैशिष्टय़ म्हणजे यांचा  अतिशय उजळ रंग तो त्यांना त्यांच्या सातत्यपूर्ण आहारामुळेच लाभत असतो हे बहुतेकांना माहीतच नसतं. उलटा एस ठेवल्याप्रमाणे दिसणारी आपली मान खाली घालून, स्वत:च्या वैशिष्टय़पूर्ण वाकडय़ा चोचीने उथळ पाणथळीच्या दलदलीत, चिखलात आपलं भक्ष्य हुडकत हिंडणारे हे रोहित दलदलीत सापडणाऱ्या सर्व जिवांसोबतच श्रीम्प्स नावाच्या ज्या कोळंब्या आवडीने खातात, त्यातून त्यांना हा रंग कायम राखता येतो. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांच्या पिसांवरचे हे रंग दिसायला सुरुवात होतात. आश्चर्य म्हणजे, या ‘स्टेबल डाएट’ची कमतरता असते, तेव्हा या रोहित पक्ष्यांचा रंग फिक्कट तर होतोच शिवाय खाण्याची कमतरता निर्माण झाल्यास ते चक्क मीलन होऊ  देणं आणि प्रजोत्पत्ती करणं टाळतात. ही अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून ते सतत सुरक्षित आणि मुबलक खाणे उपलब्ध असेल अशा ठिकाणांना जाणं पसंत करतात. भिगवण परिसर असाच सुरक्षित आणि उत्तम निवाऱ्यात गणला जातो. उजनी धरणाच्या पाणफुगवटय़ाने परिसरात निर्माण झालेली पाणथळ या रोहित पक्ष्यांसाठी जणू नंदनवनच म्हणायला हरकत नाही.

मोठय़ा संख्येने समूहात राहाणारे हे पक्षी हॉर्न वाजवल्यासारखा कलकलाट करून एकमेकांशी संवाद साधतात. याच जोडीला पंख फडफडवून, मान वेळावूनही ते मूक संभाषण करत असतात. समूहात राहणाऱ्या या पक्ष्याला त्याच्या निवासाजवळ इतर प्राणी-पक्षी अथवा मानवी हस्तक्षेप झालेला अजिबात आवडत नाही. हे असे हस्तक्षेप, गडबड, आवाज सतत व्हायला लागले तर ते त्या निवासातून बाहेर पडतात. हल्ली भिगवण परिसरात लोटणारी जत्रा पाहता, लवकरच हे पक्षी भिगवणला रामराम ठोकतात की काय असं वाटायला लागलंय.

या पक्ष्यांच्या जोडीला, भिगवण परिसरात सध्या हजारोंच्या संख्येने युरोपातून आपल्याकडे वास्तव्यास आलेल्या भोरडय़ा दिसताहेत. रोझी स्टìलग नावाने ओळखले जाणारे हे पक्षी तसं पाहायला गेलं तर कुणाच्या खिजगणतीतही नसतात. थंडीच्या काळात, युरोपमधून स्थलांतर करणारे हे लहानसे पक्षी या काळात सहज पाहायला मिळतात. गंमत अशी आहे की सहज दिसणाऱ्या पक्षांबद्दल आपल्या मनात कुतूहल निर्माण होत नाही. या उदासीनतेने आपण पक्षी निरीक्षणात यांचा मागोवा काढत नाही की त्या मागोव्याची नोंद ठेवत नाही. भारताच्या पश्चिमेस आणि दक्षिणेस स्थलांतर करून येणाऱ्या या भोरडय़ा दलदलीचे भाग आणि कोरडय़ा भू पठारावर वास्तव्यास असतात. अंगभर गुलाबी छटेच्या तपकिरी रंगाकडे झुकलेल्या आणि हिरवट रंगछटेचे पंख असलेल्या या भोरडय़ा त्यांच्या सौंदर्यासाठी अजिबात प्रसिद्ध नसतात. अतिशय कलकल करणाऱ्या समूहात राहणाऱ्या या भोरडय़ा वेगवेगळ्या झाडांची फळं खातात. याच जोडीला गवतात राहाणारे नाकतोडय़ासारखे किडेमकोडे खातात. त्या अगदी साधासा पक्षी वाटावा अशाच असतात. या भोरडय़ांच्या किडे खाण्याच्या या सवयीचा उपयोग, चीनमध्ये अतिशय कल्पकतेने करून घेतला गेला आहे. २००० साली, चीनच्या झिनजियांग प्रांतात, या भोरडय़ांच्या मदतीने शेतावर हल्ले करणाऱ्या कीटकांचा नाश करण्यात यश आल्याने, तिथे शेतीत कीटकनाशकांच्या वापराचं प्रमाण अत्यल्प झालं. साहजिकच भोरडय़ांचं स्वागत तिकडे आनंदाने होतं. तर अशा या भोरडय़ा, या थंडीच्या काळात आपल्याकडे येतात.

एकीकडे म्हणायचं की हा अतिशय साधा पक्षी आहे, मग असं कोणतं वैशिष्टय़ आहे जे या पक्ष्यांचा माग काढायला उद्युक्त करतं? ते आहे या पक्ष्यांचं मुरमुरेशन! बहुतांश पक्षी निरीक्षकांनाच परिचित असलेला हा शब्द सर्वसामान्यांना माहीत नाही. याचं कारण म्हणजे या इंग्रजी शब्दाला आपल्या मराठी भाषेत प्रतिशब्दच नाही. हे मुरमुरेशन म्हणजे काय? हा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. रोझी स्टर्लिग पक्षी आणि मुरमुरेशन या शब्दांचं जणू अगदी जवळचं नातं आहे. सूर्यास्ताच्या सुमारास, या भोरडय़ा, एखाद्या ठरावीक ठिकाणी शेकडोंच्या संख्येने एकत्र येतात. हे नुसतं एकत्र येणं नसतं तर ते शिस्तबद्ध आणि ठरावीक दिशेने वर-खाली होत केलेलं उडणं असतं. या उडण्याला आपण हवाई कसरती किंवा  हवाई नृत्याविष्कारही म्हणू शकतो. हे नृत्याविष्कार इतक्या निमिषार्धात होत असतात की त्याचं चित्रण करणं मोठं कठीण काम असतं. गेली अनेक र्वष, भोरडय़ांच्या या हवाई नृत्याविष्कारामागचं शास्त्र उलगडायचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत. निसर्गात  क्षणार्धात होणारे बदल म्हणजे काय हे पाहायचं असेल तर खुश्शाल या भोरडय़ांच्या घोळक्यांना पाहावं. एका उंच बिंदूवर जाऊन अचानक तीर मारून खाली येणं अथवा दिशा बदलून हवेत पांगणे हे कुठल्या आज्ञा देऊन कसं काय जमवलं जात असेल हे उलगडण्याचा प्रयत्न अजूनही केला जातोय. उडताना आपला शेजारी हलतोय त्याचप्रमाणे हलणं अथवा सूर मारणं, तेही निमिषार्धात! खरंच कठीणच आहे. हे असे प्रकार जेव्हा हे स्टìलग्ज करतात, तेव्हा अक्षरश: मंत्रमुग्ध होऊन जायला होतं. विश्वाच्या अणू आणि रेणू बांधून ठेवण्याच्या आणि एकमेकांच्याकडे आकर्षल्या जाण्याच्या शास्त्राला अगदी नजरेसमोर ‘लाइव्ह’ दाखवणाऱ्या भोरडय़ाही भिगवण परिसरात वास्तव्याला येतात. हे असं मुरमुरेशन बघण्यासाठीचा योग्य काळ सध्या सुरू झालाय. भिगवण परिसरातील पाणथळीत बोटीतून जाऊन आपण नशीबवान आहोत का हे पाहायला अजिबात हरकत नाहीच.

भारतीय उपखंडात, थंडीचा काळ हा स्थलांतरित पक्ष्यांसाठी सुगीचा काळ समजला जातो. युरोपातली थंडी टाळण्यासाठी अनेक शतकं ही मंडळी आपल्याकडे येत आहेत. पूर्वी वाढत्या शहरीकरणाचा रेटा तीव्र नसल्याने अगदी गावशहरांनजीकही अनेक पक्षी सुखासुखी दिसून जायचे. यासाठी मुद्दामहून ठरावीक ठिकाणी जावं लागायचं नाही. मात्र बदललेल्या काळाचा आणि शहरीकरणाचा फटका, पक्ष्यांच्या बहुतांश निवासस्थानांना बसत आहे. याच जोडीला, निसर्ग पर्यटनाच्या नावाखाली, निसर्गाकडे धूम ठोकणारे आपल्या बेफाम वागण्याने तिथल्या घटकांना धूम ठोकून पळवून लावताहेत. सध्या पक्षी निरीक्षणाचा हंगाम सुरू असल्याने, जो तो उठतो आणि भिगवणसारख्या सुपरिचित ठिकाणी पक्षी बघायला डेरेदाखल होताना दिसतो. अशा हौशागौशा निसर्गप्रेमींच्या वर्दळीने निसर्गात पक्षी कमी आणि माणसं जास्त दिसणं सुरू झालंय. अशा कुठल्याही ठिकाणी जाताना संयमाच्या सोबत आपली नोंदवही, द्विनेत्री म्हणजेच बायनॅक्युलर, कॅमेरा आणि पक्ष्यांची माहिती देणारं सचित्र पुस्तक नेणं अगदी गरजेचं आहे. स्थानिक पर्यावरणाची माहिती तिथे जाण्याअगोदरच वाचून ठेवावी. तिथे काय पाहायचं आहे व काय पाहायला मिळेल याची पूर्वतयारी झालेली असल्याने निरीक्षण करणं सोप्पं होतं. सोबत लहान मुलं असल्यास, त्यांना या पद्धतीने निसर्ग निरीक्षणाची सवय लावणं सोप्पं होतं. अशा सवयीतून ‘पाणथळीत मोर का दिसत नाहीए’ किंवा ‘सगळी बदकं सारखीच असतात का?’ अशा प्रश्नांना सुयोग्य पद्धतीने उत्तरं देता येतात. भोरडय़ांच्या हवाई नृत्याविष्काराला मराठी शब्द नसल्याने झालेली अडचण मला जाणवली. तसच काहीसं अनेक पक्षी पाहिल्यावर आपलं होतं. त्या पक्ष्याचं मराठी नाव, त्याचं उगमस्थान याबदल मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषा वापरल्यास, केलेल्या आणि नोंदवलेल्या प्रत्येक निरीक्षणाशी आपण जोडले जातो. दूर देशातून आलेल्या परकीय भाषेच्या जोडीनेच मातृभाषेत समजून घेतलेली गोष्ट पटकन समजतेच, पण दीर्घकाळ लक्षातही राहते.

भिगवण परिसरात गेल्या वर्षी झालेल्या पावसाने, धरणाच्या पाणसाठय़ात पाणी चांगलं साठल्याने, पाण्याचा फुगवटा जास्त आहे. यामुळे अगदी काठाकाठावर दिसणरे पक्षी कमी असून, हातात पुरेसा वेळ घेऊन गेल्यास, सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा गाठल्यास पाणसाठय़ावर नांदणाऱ्या अनेक पक्ष्यांचं दर्शन हमखास होईल. सूर्योदयाच्या सुमारास पाखरांची पाणवठय़ावर येण्यासाठी सुरू झालेली लगबग, रात्रीच्या विश्रांतीने ताजीतवानी होऊन भक्ष्य म्हणून लहान पक्ष्यांना घाबरवणारी घार आणि तिच्या मागे जीव तोडून आणि जिवावर उदार होऊन लागणारा कोतवाल ऊर्फ ड्रॉन्गो पक्षी, थंड पाण्यात खोलवर डुबकी मारून ओले झालेले आपले पंख सुकवण्यासाठी झाडांवर उन्हात बसलेले पाणकावळे, आपले उंच पाय आवरत तुरुतुरु धावणाऱ्या शेकाटय़ा, उंच झाडाच्या शेंडय़ावर बसलेला शिक्रा, कर्णकर्कश ओरडण्याने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा खंडय़ा जेव्हा पाण्यात सूर मारून मासा उचलतो ते पाहणं म्हणजे जणू स्वर्गसुखच. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतची ही उडती दुनिया पाहण्यासाठी भिगवणला अगदी मार्चअखेरीपर्यंत जायला हरकत नाही आणि हो, मुरमुरेशन बघायला मिळालं तर उत्तमच.

रूपाली पारखे-देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on January 13, 2017 1:01 am

Web Title: bhigwan