कुंभारकाम किंवा मातीची भांडी ही मानवाने उत्क्रांतीच्या पर्वात सर्वात आधी शिकलेली ललित कलाच. खरेतर उपयोगितेच्या निमित्ताने तिचा जन्म झाला खरा. पण माणसातील कलागुणांनी तिला नानाविध रूपे जगभर बहाल केली. ती कलाही उत्क्रांत होत गेली. आज त्याच कलेचा आधार जगभरातील पुरातत्त्वतज्ज्ञ कालखंड निश्चितीसाठी करतात. ही कलाही आताच्या टप्प्यातही खूप चांगली विकसित झालेली दिसते. मातीकामाने आता अनंत बदल झेलून तावूनसुलाखून नवीन रूपे धारण केली आहेत. प्रसिद्ध सिरॅमिक कलावंत ब्रह्मदेव राम पंडित यांना तर याच कलेतील प्रावीण्याबद्दल पद्मश्री बहाल करून गौरविण्यात आले. त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या या मातीकामाचे एक सुंदर प्रदर्शन पाहण्याची संधी आपल्याला सिमरोझा कलादालनात २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालाधीत चालून आली आहे.