‘कलाजाणीव’साठी चित्रे पाठवा या ‘लोकप्रभा’ने केलेल्या आवाहनाला आमच्या वाचकांनी दिलेला हा चित्ररूप प्रतिसाद

हा छंद जिवाला लावी पिसे.. आज पन्नाशी गाठता गाठता खरोखरच या ओळींची प्रचीती येतेय. लहानपणी ड्रॉईंग आवडायचं. खरं तर तेव्हापासूनच अ‍ॅबस्ट्रॅक्ट (अमूर्त शैलीतील चित्र) बद्दल एक खास आकर्षण वाटायचं. वेडय़ावाकडय़ा ओढलेल्या रेघोटय़ांमधून व्यक्त होणारे वेगवेगळे आकार मोहवून टाकायचे. रिकाम्या वेळेत वह्य़ांच्या मागच्या पानावर काहीबाही चित्र मी बरेचदा काढायची. नंतर मग पुढचं शिक्षण, लग्न, नोकरी, घर, संसार या सगळ्यात आपल्याला काही आवड होती हेच मुळी विसरून गेले होते. काही दिवसांपूर्वी छान पेंटिंग करणाऱ्या माझ्या भाचीजवळ, अमृताजवळ मी सहज बोलून गेली की मलाही पेंटिंग करावेसे खूप वाटते तर तिने इतक्या उत्साहाने स्वत: जवळचे रंग, ब्रशेस, कॅनव्हास सगळं माझ्यासमोर ठेवले अन् म्हणाली ‘‘आत्या, तुला नक्की जमेल, करून तर बघ.’’ झालं. अशा रीतीने माझ्या पेंटिंगचा श्रीगणेशा झाला. अन् बघता बघता मी त्यात इतकी गुंतून गेले की एकामागून एक पेंटिंग करण्याचा सपाटाच लावला. मनापासून आवडणारी गोष्ट करायला मिळाली की मग आपसूकच मार्ग मिळतो, वेळही काढता येतो हे लक्षात आले. एकदा नवीन पेंटिंग सुरू केल्यावर मग ते पूर्ण होईपर्यंत सतत डोक्यात ते वेगवेगळे आकार, ते रंग, त्यांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या त्या वेगवेगळ्या शेड्स हे सगळं चक्र फिरत राहतं. मनसोक्तरंगांशी खेळायला मिळतं. कॅनव्हासवर रंग एकमेकांमध्ये मिसळून तयार होणारी रंगांची उधळण अक्षरश: वेड लावते आणि पेंटिंग पूर्ण झाल्यावर मग जे समाधान मिळते त्याला तर खरच तोड नाही. कुठल्याही निर्मितीचा आनंद खरंच शब्दातीत असतो. गेल्या साताठ महिन्यांत तब्बल ३०-४० पेंटिंग्ज केलीत. आणि हे करताना अकोल्यातील कलाकार प्रतापसिंग राठोड तसेच सतीश पिंपळे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्याने माझा उत्साह आणखी वृद्धिंगत झाला. हे सगळे इतक्या झपाटय़ाने झाले की मलाच माझ्या आयुष्यातल्या या अचानक घेतलेल्या वळणाचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. वर्षांनुवर्षे मनात कुठेतरी खोल दडलेल्या उर्मीला अचानक वाट मिळाली हे तर खरेच, पण मला स्वत: ला माझा नव्याने शोध लागला हे मनाला जास्त भावलं.
– मधुमती वऱ्हाडपांडे, अकोला.

गृहिणी या भूमिकेबरोबरच चित्रकला हा छंद जोपासणाऱ्या प्रिया पाटील यांनी कोणतेही प्रशिक्षण न घेताही पेंटिग्ज करून प्रदर्शनाच्या माध्यमातून ती चित्ररसिकांपर्यंत पोहोचवली आहेत. केरळ मधील कोची येथे भरलेल्या ‘वर्ल्डवाइड आर्ट मूव्हमेंट’ या संस्थेने घेतलेल्या ‘आर्ट मॅस्ट्रो अ‍ॅवॉर्ड २०१५’ या स्पर्धेत प्रिया पाटील यांच्या ‘रेफ्युजी अ‍ॅण्ड लोटस मंडल’ या बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारित चित्राला विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हे चित्र चिन्हांकित तसेच प्रतीकात्मक आहे. भगवान गौतम बुद्ध हा फक्त मानवी आकार नसून त्यांच्या तत्त्वज्ञानात त्यांच्या लक्षणाचे आणि प्रतीकाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यापैकी कमळ हे एक प्रतीक होय. कमळाचा जन्म चिखलात होतो त्यानंतर त्याच्या अवस्था आणि अखेर त्याला प्राप्त होणारे पवित्र आणि पूजनीय दिव्यत्व याचे रेखाटन या चित्रात केलेले आहे. आठ पाकळ्या असलेले कमळ हे भगवान गौतम बुद्धांच्या अष्टांग मार्गाचे प्रतीक आहे. याप्रमाणे या चित्रातील धम्मपद चारही दिशांना आहे जे धम्माला शरण जाऊन दिव्यत्वाकडे जाण्याचा मार्ग दर्शवते.
– प्रिया पाटील, मुंबई.