आधुनिक विज्ञान मानवी मेंदू, त्याचं कार्य, त्याद्वारे घडणाऱ्या अनेक मानवी प्रक्रिया यांच्यावर नव्याने प्रकाश टाकत आहे. ज्यामुळे आपल्या डोळ्यांना एखादी वस्तू, प्रतिमा कशी दिसते इथपासून ते, एखादा चेहरा आपल्याला चंद्रासारखा का भासतो इथपर्यंत गोष्टी उलगडतील. परिणामी मानवी कृती, त्यामागील निर्मितीप्रक्रिया याचं नवीन ज्ञान आपल्याला होईल.

‘कला’ म्हटलं की मनात ‘अभिव्यक्ती’ हा शब्द येतोच. अभिव्यक्ती ही सर्वसाधारणपणे भावनांची असाच समज असतो. भावनांची वेदना, तरंग हे सगळ्यांनाच आवडतात. भावनांच्या डोहात डुंबणे, झऱ्याबरोबर प्रवाही होणे, लाटांत चिंब होणे, आरूढ होणे यात आपण हरवून जातो. त्यामुळे कलेचा भावनांशी अगदी घट्ट संबंध तयार होतो. कलेविषयी विचार करताना कलाकार, बहुतेक रसिक भावनिक होतात. भावनिक होऊन, कलेद्वारे व्यक्त होणाऱ्या भावनांचाच विचार करतात. हे करण्यात बहुतेक वेळा कला बाजूलाच पडते. अशा प्रकारे विचार करण्याची सवय लागते. ही सवय इतकी तीव्र होते की, व्यसनी माणसाप्रमाणे आपण या भावनिक चक्रात पुन्हा पुन्हा अडकत राहतो.
कलेचा भावनिक न होता, भावनांवर लक्ष न देता विचार करता येणं शक्य आहे का? प्रश्न कदाचित कठीण जाईल. कारण भावनिक गोष्टीबद्दल आपल्याला शास्त्रीय पद्धतीने विचार करणं आवडत नाही, रुचत नाही, पटत नाही. मूड ऑफ, रंगाचा बेरंग झाल्यासारखं वाटतं.
माणसाच्या अनेक कृतींपैकी ‘कलाकृती’ घडवणे हीसुद्धा एक कृती आहे. आपण कृती करत असताना, ती कृती कशी करायची, कृतीचा अनुभव, तिचा परिणाम आदी गोष्टी आपल्याला माहीत असतात. त्यांचा अंदाज आपल्याला असतो. त्यानुसार आपण कृती करत असतो. कृती करण्याचा अनुभव, त्या आधारे कृतीविषयक विचार करणे, कृती करणे या संपूर्ण प्रक्रियेला शास्त्रीय धीरगंभीर भाषेत ‘निर्मितीप्रक्रिया’ म्हणतात.
कलाकृती घडवणे म्हणजे एक सुंदर, आकर्षक दिसणारी वस्तू बनवणे असा आपला अर्थ असेल तर, आपण कलेचा कृतिजन्य विचार करतो असं म्हणावं लागेल. कृतीत मन, भावना, त्यांची अभिव्यक्ती यांचा काहीच संबंध नसतो. अशा कलाकृतींच्या घडणीमागे ‘निर्मितीप्रक्रिया’ नसते. तिथे फक्त ‘बनवण्याची कृती’ असते. त्यात एकामागोमाग एक क्रमाने आपण कृती करत राहतो. या कृती करताना आपण ठरवलेल्या कल्पनेनुसार कृतीचा परिणाम आपल्याला मिळतो आहे ना? हे आपण पाहात असतो. एखादा खाद्यपदार्थ बनवण्याच्या कृतीला जशी सुरुवात व पूर्णता असते त्याप्रमाणे कलाकृती बनवणे होत असते.
या बनवण्याच्या प्रक्रियेपेक्षा ‘निर्मितीप्रक्रिया’ काहीशी वेगळी असते. आपण एखादं बी रुजत घातलं की, आपल्या काळजी घेण्याबरोबरच ते ‘बी’ त्यातील ऊर्जेच्या आधारे, माती-पाणी-सूर्य प्रकाश आदींचा उपयोग करत ‘स्वयंप्रेरणेने’ वाढते तसं निर्मितीप्रक्रिया कलाकार-कलाकृती यांचं नातं आहे.
कलाकार त्यांच्यावरील संस्कारांनुसार जरी कलाकृती बनवत असला, तरीही त्याच्या मनातील नैसर्गिक जडणघडणी यासुद्धा कलाकृती बनवत असताना त्याला, आकार, त्यांची मांडणी, रंगसंगती, पोत अशा अनेक गोष्टी उत्स्फूर्तपणे सहजपणे सुचवीत असतात. या नैसर्गिक प्रेरणांनुसार चित्र घडवण्याची कृती करायला चित्रकार शिकला, तर त्याच्यावर झालेल्या बाह्य़ संस्कारांपेक्षा तो वेगळी कलाकृती घडवतो.
कलाकृतीचं वेगळेपण त्यालाही आश्चर्यचकित करतं. कलाकाराचा असा विश्वास बसतो की त्याच्या मनातील प्रेरणा, या त्याच्यावरील संस्काराप्रमाणेच कलाकृतीच्या ‘निर्मितीप्रक्रियेत’ महत्त्वाचं कार्य करतात. या प्रेरणांना कलाकार पूर्णपणे ओळखू, जाणू शकतोच असं नाही. मनाची जडणघडण, त्यातील नैसर्गिक प्रेरणा, त्यांद्वारे मिळणारे संकेत हे सर्व त्याला काहीसं गूढ वाटतं. त्याला असं वाटू लागतं की आपल्या शरीरात व मनात, आपण ज्याला पूर्णपणे समजू शकत नाही अशी एक काही प्रक्रिया आहे. (गोष्टींमध्ये ज्याप्रमाणे, गुहांमध्ये, विवरांमध्ये भूत-पिशाच, राक्षस, गंधर्व आदी असतात त्याप्रमाणे) कलाकार हळूहळू स्वत:मधील निर्मितीप्रक्रियेसह राहू लागतो; जगू लागतो.
स्वत:मधील निर्मितीप्रक्रिया कळू शकत नाही म्हणून, अशा मानसिक प्रक्रियांची चर्चा ज्या शास्त्रांमध्ये होते, त्यांचा आधार कलाकार घेऊ लागतो. मग त्यात पाश्चात्त्य मानसशास्त्रांतील सिगमंड फ्रॉईड व त्याचे सुप्त मन, त्याची रचना व त्याचं कार्य या विषयीचं विवरण किंवा मग ज्ञानेश्वर, तुकाराम, सुफी संत, त्याचं साहित्य किंवा अजून थोडं पूर्वेकडे जाऊन भारतातूनच जपानमध्ये पोहोचलेला ‘झेन’ बुद्धीझम आदी.. गंमत याच्या पुढे आहे. कलाकाराला मानसशास्त्रात विचार करतात तितक्या शास्त्रीय पद्धतीने विचार करणं आवडतंच असं नाही. म्हणजे १०० तल्या ९५ जणांना, काही अपवाद असतील किंवा ज्ञानोबा, तुकारामाप्रमाणे साधकही व्हायचे नसते. (कलाकार काही विशेष माणसे असतात, पण शेवटी माणूसच) त्यांना सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एका मूडमध्ये, भावनांच्या तरंगात पडून राहायला आवडतं. त्यामुळे ते मानसिक प्रक्रियांचं विश्लेषण, विवरण करणाऱ्या शास्त्रांचा काहीसा आधार घेताना दिसतात. परिणामी चित्रकार (आपल्याकडील) जेव्हा-जेव्हा त्यांच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल बोलतात तेव्हा, वर उल्लेखिलेल्या साहित्याचा आधार घेत बोलतात. त्यातून काहीसं काव्यात्मक, गूढ असं काही भाष्य तयार होतं. महाराष्ट्रातील कलाकारांच्या अनेक पिढय़ा या प्रकारच्या साहित्यावर पोसल्या गेल्या आहेत. फ्रॉईडच्या सुप्त मनाच्या थेअरीचं भूत या पिढय़ांतील अनेक कलाकारांच्या मानेवर बसलं आहे. त्यामुळेच कलाकार हातवारे करून म्हणत राहतात, ‘चित्र असं आतून येतं वगैरे!’ पण ते असो..
मूळ मुद्दा असा की कलेची निर्मितीप्रक्रिया समजून घेण्याकरता शास्त्रीय पद्धतीने विचार करणं शक्य आहे का? मी बऱ्याच वेळेला पाहतो की जे कलाकार सुप्त मनाची भुतं नाचवतात त्यांना जे. कृष्णमूर्तीचं लिखाण दर्शवले; ज्यामध्ये ते मनाचं पूर्ण निरीक्षण करणं याची चर्चा करतात व परिणामी सुप्त मन ही संकल्पनाच नाकारतात.. मग रंगाचा बेरंग होतो. कारण इथे भावनिक अवस्थेला बाजूला ठेवून, निर्मितीप्रक्रियेच्या मूलभूत घटकाकडे पाहण्याची पद्धत मांडली जाते; ज्याची आपल्याकडील कलाकारांना सवयच नाही..
या सगळ्याची चर्चा इथे करण्याची गरज अशी की आधुनिक विज्ञान, मानवी मेंदू, त्याचं कार्य, त्याद्वारे घडणाऱ्या अनेक मानवी प्रक्रिया यांच्यावर नव्याने प्रकाश टाकत आहे. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा अर्थ लावत आहे. ज्यामुळे आपल्या डोळ्यांना एखादी वस्तू, प्रतिमा कशी दिसते इथपासून ते, एखादा चेहरा आपल्याला चंद्रासारखा का भासतो इथपर्यंत गोष्टी उलगडतील. परिणामी मानवी कृती, त्यामागील निर्मितीप्रक्रिया याचं नवीन ज्ञान आपल्याला होईल. फ्रॉईडच्यापेक्षा कदाचित जास्त स्पष्ट असं काही आपल्याला समजेल. आपण हे सगळं समजण्यासाठी आपलं मन मोकळं ठेवलं पाहिजे. मानवी मेंदू व त्या विषयीचं आश्चर्यचकित करणारं ज्ञान व त्या आधारे चित्र-दृश्यकला त्यामागील निर्मितीप्रक्रियेचं समोर येणारं रूप याविषयी पुढच्या वेळी बोलू.

* लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत. त्यांचाई-मेल
mahendradamle@gmail.com