12 July 2020

News Flash

लवचीक प्रतिमा

मागील लेखात आपण ‘प्रतिमा लवचीकता’ या संकल्पनेची चर्चा केली.

लवचीक प्रतिमा एकीकडे ती ज्या वस्तूची प्रतिमा आहे त्या वस्तूकडेही निर्देश करते आणि त्याच वेळेला आपल्या स्मृतीमध्ये त्या वस्तूची संवेदनानुभव, माहिती व ज्ञान याआधारे बद्ध झालेल्या प्रतिमेपेक्षा वेगळी, लवचीक प्रतिमा दर्शवते. त्याद्वारे एक विशिष्ट असा अनुभव जो दररोजच्या, माहितीच्या प्रतिमांपेक्षा वेगळा असतो तो समोर येतो.

मागील लेखात आपण ‘प्रतिमा लवचीकता’ या संकल्पनेची चर्चा केली. वरील संकल्पनेची स्पष्टता मिळवण्याकरिता आपण गणेश मूर्ती, त्यांची बदलणारी रूपं, कार्टून कॅरेक्टर्स, ‘बाहुबली’ सिनेमातील प्रतिमांचा विडंबनात्मक टिप्पणीसाठी केलेला वापर आदी उदाहरणांचा आधार घेतला होता. आज त्याच्या पुढे जाऊन चित्र, शिल्प आदी कलांमध्ये प्रतिमा लवचीकता कशी वापरली जाते, का वापरली जाते, ते समजून घेण्याचा प्रयत्न करू.
‘प्रतिमा लवचीकता’ संकल्पना समजण्याच्या प्रयत्नात मागच्या लेखात निर्देशलेल्या एका मुद्दय़ाकडे मी पुन्हा वळतो. तो मुद्दा आपला मानवी संवाद, त्याचं स्वरूप या संबंधात आहे. मी नेहमीच असं म्हणत आलोय की, जरी आपल्या संवादात आपण बोली-लिखित, शब्दभाषा वापरत असलो तरीही मुळात आपल्याला प्रतिमांची देवाणघेवाण करायची असते. प्रतिमांद्वारे आपण आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करत असतो. म्हणूनच बोलताना आवाजाचा चढ-उतार, हातवारे, चेहऱ्यावरचे भाव यासह आपण एक प्रकारे ती अनुभव प्रतिमा निर्माण करायचा प्रयत्न करतो. हातवारे, चेहऱ्यावरचे भाव, आवाजाचा चढउतार आदींसह आपण शाब्दिक प्रतिमांना लवचीक करून ‘अनुभव प्रतिमा’ बनवत असतो. दृश्यकलेतही चित्रकार अशाच प्रकारे ‘अनुभव प्रतिमा’ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची ढोबळ उदाहरणं म्हणून आपण गणपतीच्या मूर्तीतील होणारे बदल गेल्या वेळेला पाहिले.
गेल्या वेळी चर्चिलेली उदाहरणं व चित्रकला, शिल्पकला यातील उदाहरणांत बराच फरक आहे. टीव्हीवरील खंडोबा, शंकर, विष्णू, कृष्ण आदी रूपांत गणपतीची कल्पना करणं व त्यानुसार मूर्ती घडवणं यामध्ये कल्पनेला महत्त्व आहे. ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याकरिता मूर्तिकार पारंपरिक शास्त्रानुसार ठरलेल्या प्रतिमेला लवचीक बनवतो. पारंपरिक गणेश प्रतिमा लवचीक झाली, की शंकर, कृष्ण, खंडोबा आदी रूपांत गणपती बनतो. इथपर्यंत सर्व ठीक आहे. एकदा अशा मूर्ती पाहिल्या आणि त्या घडवण्यामागील कल्पना समजली, की त्यापेक्षा वेगळा काही अनुभव या मूर्तीतून मिळत नाही. मूर्तीचं कार्य, ती घडवण्यामागील कल्पना दर्शकाला सांगणं इतकंच मर्यादित होतं. हीच गोष्ट बाहुबलीबाबत घडते. एकदा का लाल कांद्याची भाववाढ, त्यामुळे सोसावा लागणारा आर्थिक भार ही गोष्ट एकदा विनोदाद्वारे समजली की झालं! आपण विनोद मुळात कसा सुचला हे समजतो व त्यानंतर भला मोठा लाल कांदा घेऊन जाणारा बाहुबली या प्रतिमेतला जीव निघून जातो. त्या प्रतिमेला पाहून आपल्याला पुन:पुन्हा हसू येत नाही.
गणपतीच्या लोकप्रिय कल्पना, बाहुबलीची प्रतिमा परिणामी फारच थोडं काही सांगणाऱ्या, अल्पकाळ प्रेक्षकाच्या मनात टिकून राहणाऱ्या ठरतात. चित्रकार, शिल्पकार असं थेट विधानात्मक व अल्पकाळ टिकणारं काही मांडू इच्छित असतोच असं नाही. त्याला त्याच्या कलाकृतीमधील प्रतिमेमागची, ती प्रतिमा सुचवण्याची प्रक्रिया, कारणं आदी प्रेक्षकाला सांगायचं असतं; पण तो ते थेट सांगत नाही. नाही तर झाडे लावा, पाणी वाचवा असा थेट संदेश देणाऱ्या पोस्टर्सप्रमाणे कलाकृती तयार होत राहतील. संवादाची खुबी ही त्यातील थेटपणात जशी आहे तशी तरलतेतही असते. आपण काही थेटपणे न सांगता, दुसऱ्या व्यक्तीला असा अनुभव द्यावा की, ज्यामुळे आपल्याला अपेक्षित भावना, विचार, मतं ही दुसऱ्या व्यक्तीच्या मनात तयार होतील. आपल्या व समोरच्या व्यक्तीच्या मनातील भावना, विचार, मतं यांतील साम्य, त्याद्वारे सहमत, एकमत लक्षात आलं, की समोरच्या व्यक्तीला आश्चर्यमिश्रित आनंद होतो.
कलाकार अशा प्रकारच्या संवादाचा वापर करणं योग्य समजतात. त्याकरता ते जे सांगायचंय ते कळेल, असा अनुभव प्रेक्षक कलाकृतीद्वारे दीर्घकाळ घेत राहील याची व्यवस्था करतात. त्याकरता कलाकृतीच्या अभिव्यक्तीमध्ये भावावर, जाणिवांवर, संवेदनाच्या प्रकटीकरणावर लक्ष देतात. त्यातील तरलतेला महत्त्व देतात. त्यामुळे काही वेळा संदिग्धता, गूढता, अस्पष्टता येते, पण ते असो..
कलाकारांच्या या शब्देविण संवाद पद्धतीमुळे आपण जीवनातील वास्तवाला, त्यातील घटकांना काहीसं स्लो मोशनमध्ये व तपशिलात पाहतो. अशा पद्धतीने वास्तवाकडे पाहताना लवचीक अनुभव प्रतिमा योग्य काम करते. लवचीक प्रतिमा एकीकडे ती ज्या वस्तूची प्रतिमा आहे त्या वस्तूकडेही निर्देश करते आणि त्याच वेळेला आपल्या स्मृतीमध्ये त्या वस्तूची संवेदनानुभव, माहिती व ज्ञान याआधारे बद्ध झालेल्या प्रतिमेपेक्षा वेगळी, लवचीक प्रतिमा दर्शवते. त्याद्वारे एक विशिष्ट असा अनुभव जो दररोजच्या, माहितीच्या प्रतिमांपेक्षा वेगळा असतो तो समोर येतो. त्या अनुभवाचं नावीन्य आपल्याला सूक्ष्म पातळीवर चकित करतं, आपण ती प्रतिमा दीर्घकाळ पाहू लागतो.. कलाकृतींद्वारे संवाद सुरू होतो.
कलाकार प्रतिमांची मांडणी विविध प्रकारे करून प्रतिमा लवचीक करतो. त्यातला एक प्रकार म्हणजे प्रतिमांना त्यांच्या काही भागांना जोडून एक नवीन प्रतिमा बनवणं. भारतात प्राचीन मंदिरं, गुहा-शिल्पांत अनेक शिल्पं या पद्धतीनं बनवलेली आढळतात. त्यातलं एक प्रसिद्ध शिल्प म्हणजे ‘अर्धनारीनटेश्वर’ या नावानं ओळखलं जाणारं शिवाचं रूप दर्शवणारं शिल्प, ज्यात मानवी प्रतिमेत शरीराची उजवी बाजू शिवाचं रूप व डावी बाजू शक्ती, पार्वतीचं रूप दर्शवते. पुरुष-प्रकृतीची अर्धशरीर एकमेकांत मिसळून, जोडून ही प्रतिमा तयार होते. मुंबईजवळच्या ‘एलिफंटा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुंफांत अर्धनारीनटेश्वराची सुंदर शिल्प प्रतिमा पाहायला मिळते.
काही वेळा कलाकार वस्तूची अंतर्गत रचना बदलून, वस्तूला ताणलेल्या अवस्थेत, वितळण्याच्या अवस्थेत किंवा काहीशा विच्छेदलेल्या रूपात दर्शवतो. विच्छेदून काहीसं विरूपीकरण करून प्रभावी प्रतिमा वापरलेलं एक चित्र म्हणजे पाब्लो पिकासोचं ‘गर्निका’ हे चित्र. हे कलाइतिहासातील एक महत्त्वाचं व लोकप्रिय चित्र आहे. या चित्राकडे, त्यातील प्रतिमा तपशिलात पाहिल्या की, युद्ध व हिंसेमुळे नष्ट झालेल्या वास्तू, माणसं व प्राणी यांच्या तीव्र, न सहन होणाऱ्या वेदना, आक्रोश दिसतो-जाणवतो. हा सर्वार्थानं झालेल्या विध्वंस व्यक्त करण्यास पिकासोने ज्या प्रतिमा तयार केल्या त्यात मानवी शरीर तसेच प्राण्यांची शरीररचना यांची अंतर्गत रचना बदलून वेदना, आक्रोश व्यक्त करणाऱ्या प्रतिमा तयार केल्या. हे त्यानं प्रतिमांना लवचीक बनवलं नसतं तर शक्यच झालं नसतं.
शेवटी एक उदाहरण पाहू. १८व्या शतकातील जपानी चित्रकार हिरोशिगे याचं आहे. चित्राचं नाव आहे- टायरानो कियोमोरी यांना होणारे अतिवास्तव आभास. १२व्या शतकातील शूर, क्रूर टायरानो कियोमोरी या प्रसिद्ध योद्धय़ाला वृद्धापकाळात अनेक आभास होत असत. चित्रात आपल्याला कियोमोरी; त्यांच्या घरातून त्यांच्या घरासमोरील बागेचं दृश्य पाहात आहे. दृश्य पाहून गोंधळले आहेत, कारण त्यांना बागेच्या दृश्यात काही विचित्र आभास होत आहेत. तुम्हाला त्यांचा आभास कळला का? सगळीकडे ढगाळ वातावरण आहे, बर्फ पडलंय, संपूर्ण आयुष्य अनेक युद्धांत गुंतल्यानं हिंसा, नरक आदीसंबंधी आभास व्हायला लागले. बागेतील रस्ते, त्या बाजूची झाडं-झुडपं, झाडांच्या फांद्या यात फक्त मानवी सांगाडे आणि कवटय़ा दिसू लागल्या. हिरोशिगेचं प्रतिमा लवचीक बनवण्याचं कसब इतकं आहे की, बागेची दृश्यरचना जराही न बदलता त्याने कवटय़ा, सांगाडे व त्यातून मृत्यूची भीती निर्माण करणारं दृश्यं तयार केलं आहे. तुम्हालाही हा आभास लक्षात आला की, लवचीक प्रतिमांची ताकद, त्यांची मजा तुम्हालाही घेता येईल.
लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.
mahendradamle@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2015 12:54 am

Web Title: flexible portrait
टॅग Painting
Next Stories
1 प्रतिमा लवचीकता
2 अदृश्य = अमूर्त (?)
3 कळण्याची दृश्य-वळणे : वेध अमूर्ताचा
Just Now!
X