13 July 2020

News Flash

नैराश्याची सुबक नोंदवही (भाग २)

जो माणूस एकटा असतो त्याला स्वत:शी प्रामाणिक राहावे लागते.

जो माणूस एकटा असतो त्याला स्वत:शी प्रामाणिक राहावे लागते. इतर कुणाशी प्रामाणिक राहायचे जरी ठरवले आणि समोर किंवा सोबत कुणीही नसेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त स्वत:शी प्रामाणिक राहण्यापलीकडे कोणताही पर्याय नसतो. आणि ही सर्वात अवघड गोष्ट असते. कारण स्वत:ला फसवलेले आपल्याला लगेच कळते आणि डाचत राहते. एका बाजूने ही एक फार चांगली गोष्ट आहे. कारण आपले मन निराश असताना किंवा तात्पुरते झाकोळले गेले असताना आपल्या दिनक्रमाची शिस्तशीर आखणी करावी लागते. रोजचा उत्तम आहार आणि योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम, रोज शिस्तीने पाळले गेलेले दिनचक्र आपल्या मनाची पुन्हा उभारणी करायला निश्चित मदत करते असा माझा अनुभव आहे. ते करताना प्रामाणिकपणा कसोशीने जपावा लागतो. इथे लिहायला आणि वाचायला जसे सोपे वाटते आहे तितके स्वत:शी प्रामाणिक असणे सोपे नसते, हे आपल्यापैकी प्रत्येकाला आतमध्ये चांगलेच माहिती असेल. मी मोठय़ा महानगरात जेव्हा एकटा राहून काम करतो तेव्हा मला माझ्या संतुलनासाठी या एका गोष्टीची फार नीट काळजी घ्यावी लागते.

मी काही वेळा झोपेच्या गोळ्या मागून घेतल्या आहेत आणि माझ्या तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार त्या वापरल्या आहेत. पण माझ्यासारख्या कामसू माणसाला त्याची मदत झाली नाही आणि मी त्यापासून परावृत्त होत गेलो. मला सतत काम लागते. आपली वैयक्तिक मते कशीही असली तरी ती आपल्या तज्ज्ञाला सांगणे, तिचे किंवा त्याचे म्हणणे नीट ऐकणे आणि विचारपूर्वक सल्ला पाळणे केव्हाही मदतीचे ठरते.

धर्मसंस्था ही भारतातील सर्वात मोठी सायकीअ‍ॅट्री आहे. सखोल नैराश्य आलेली, पण आजार म्हणून ते स्वीकारायला नकार देणारी किंवा लाज वाटत असलेली मध्यम वयाची हजारो-लाखो माणसे अनेक कर्मकांडे करून आणि बाबा-बुवांच्या नादी लागून मनाला व्यग्र ठेवतात, हे मी अनुभवले आहे. मी धार्मिक नाही याचे मला आज फार बरे वाटते. कारण नाइट क्लबमध्ये मिळणाऱ्या कोणत्याही ड्रगपेक्षा धर्म आणि परंपरा ही दोन सगळ्यात प्रभावशाली ड्रग्स आहेत. ती घेतली की तुम्ही स्वत:ला प्रश्न विचारणे बंद करता आणि दुसऱ्या कुणीतरी आखून दिलेल्या आयत्या रस्त्यावरून मोकाट टाळ्या वाजवत धावत सुटता. त्याने प्रश्न सुटत नाहीत आणि मनाला स्थैर्य व भान कधीही येत नाही. तुम्ही कायमचे परावलंबी होता. धर्म तुम्हाला सतत अपराधी वाटवून, दुय्यम ठरवून, घाबरवून ठेवतो. कारण तो एक प्रचंड मोठा पैसे कमवायचा धंदा आहे. आपण नीट, शांत आणि सबळ झालो तर धार्मिक संस्थेची गरज संपेल आणि देवळांचे आणि आश्रमांचे उत्पन्न बुडेल. त्यामुळे या मार्गाला शक्यतो जाऊ  नये. कोणताही उपाय हा एका विशिष्ट वेळी थांबवण्यासाठी करायचा असतो. धर्म आणि त्याचे अवलंबन हा एकच उपाय असा आहे, जो आपण मरेपर्यंत थांबत नाही. मग असल्या व्यसनाच्या मागे कशाला लागा?

मी स्वत:विषयी काही शोध लावून आता चांगली आखणी करायला शिकलो आहे. मला कपाटे आवरल्याने आणि भांडी लख्ख धुऊन काढल्याने थोडेही नैराश्य आले असेल तर त्यावर ताबा मिळवता येतो. तो तात्पुरता, सोपा उपाय आहे हे मला माहीत असले तरीही मी तो प्रथमोपचार करतो. कारण मला उत्तम व्यवस्था, स्वच्छता आणि शांतता असली की मनाला हुरूप येतो. आपली कपाटे आवरणे, घर साफ करणे, अगदी चिरण्या-सोलण्यापासून संपूर्ण स्वयंपाक करणे हा माझ्यासाठी चित्ताला अत्यंत शांत करणारा उपाय ठरतो. हा माझा मी शोधला आहे, तसा प्रत्येकाचाच आपापला असणार. सखोल नैराश्यावर चांगली मदत मिळून आपल्या व्यवस्थेवर आपला संपूर्ण ताबा येईपर्यंत आपल्याला खूप जोर लावून मनाला संतुलित ठेवावे लागते. त्यासाठी कणखर व्हावे लागते. मी निराश वाटत असताना मदत मागायला संकोच करीत नाही किंवा घाबरत नाही. माझे अगदी जवळचे म्हणून जे मोजके लोक आहेत त्यांना मी शांतपणे मदतीचा फोन करतो. बहुतेक वेळा तो फोन केला की मनाला जास्त आश्वासक आणि सोपे वाटते. शहरी राहणीत आणि विचारसरणीत पटकन् उठून दुसऱ्याकडे मदत मागणे हे संकोचाचे काम असते. आपण दुसऱ्याच्या वेळेवर आणि खाजगीपणावर आक्रमण तर करत नाही ना, या संकोचापायी अनेक एकटी माणसे मदत मागायला कचरतात. असे शक्यतो करता कामा नये. गप्पा मारायला, फिरायला जायला, एकत्र बसून जेवायला, मैदानावर जाऊन काहीतरी खेळ खेळायला आपल्या जवळच्या लोकांना अशा वेळी हक्काने बोलवावे.

अनेक जुन्या पारंपरिक विचारांची तालीमबाज फक्कड माणसे आपल्या आजूबाजूला असतात- जी फक्त तर्काने विचार करतात. वेगळे अपारंपरिक अनुभव आणि मानवी मनाचे अंतर्गत पापुद्रे समजून घेण्याची अशा माणसांची ताकद नसते. अशा माणसांना नैराश्य ही कल्पनाच मान्य नसते. ‘‘असे काही नसतेच. हे उगाच काहीतरी नस्ते फॅड आहे,’’ असे मानणारी माणसे आपल्या कुटुंबात किंवा आजूबाजूला मित्रांमध्ये असली तर अशा तर्कट आणि पैलवानी डोक्याच्या माणसांपासून चार हात लांब राहावे. अशा लोकांकडे पैशाचे हिशोब किंवा व्यायाम हे सोडून कोणतेही सल्ले मागायला जाऊ  नये. अनेक माणसे ही ज्ञानाची सुपर मार्केट असतात. त्यांना मानसशास्त्र, बासरी, हस्तकला, सिनेमा, नाटक, गाणे, गांधी, नेहरू, चिवडा, आदिवासी, अभिनय असे सगळ्यातले सगळे कळते. अशा वयोवृद्ध माणसांना फार गांभीर्याने घेऊ  नये. डॉक्टरने डॉक्टर असावे आणि पूर्णवेळ नेमून दिलेले काम करावे, घरी जावे आणि शांत बसावे, ही माफक अपेक्षा आपल्या तज्ज्ञाकडून ठेवायला आपली हरकत नसावी. असे असूनही महाराष्ट्रात गाणेबजावणे करणाऱ्या डॉक्टरांची मोठी परंपरा आहे. ती सगळी चांगलीच माणसे आहेत. पण इटालियन जेवण जेवायचे तर थाळीच्या ठिकाणी जाऊन चालणार नाही, तसे आहे ते.

पुण्यात सिग्नलला तोंडाला ते विशिष्ट फडके बांधून ज्या हजारो मुली आपल्या आजूबाजूला नेटाने आणि त्वेषाने गाडय़ा रेज करत हिरवा दिवा मिळायची वाट पाहत उभ्या असतात, त्यात पन्नास टक्के मुली या ‘कौन्सिलर’ नावाच्या फार सुंदर मुली असतात. महाविद्यालयात कला शाखेत असा काहीतरी अभ्यासक्रम आहे असे या मुली सांगतात. पण त्या ‘पूर्ण तज्ज्ञ’ नसतात, हे लक्षात ठेवावे. त्या प्राथमिक प्रश्न ओळखून तज्ज्ञाकडे जायला अतिशय चांगली मदत करतात. त्या मुली गप्पा मारण्यासाठी आपल्याला भेटत नाहीत, हे आपल्याला माहीत असायला हवे. अनेक निराश तरुण मुले त्या मुलींवर भाळून त्यांचे ऐकून निवांत होतात आणि स्वत:ला त्यांच्यावर सोपवून देतात. अनेक मुलांना त्यांना कॉफी प्यायला न्यायचे असते. खूप शोधूनही हे असे मौल्यवान काम करणारी मुले मला निराश असताना कधी मिळाली नाहीत. मलाही कॉफी प्यायला आवडले असते. पण नेहमी आणि नेहमी मुलीच असतात. या मुलींनी महाराष्ट्रात डॉक्टर होण्यासाठी जे करावेच लागते, ती प्राथमिक अट पूर्ण केलेली असते; ती म्हणजे कॉलेजात नाटकात काम केलेले असते. बाकी थोडाफार उरतो तो अभ्यास आणि अनुभव. ‘‘आले आले शोनू, बले वाटते का ले तुला?’’ अशा टोनमध्ये या मुली नेहमी बोलतात. खऱ्या तज्ज्ञाच्या कोरडय़ा दालनात प्रवेश करण्याआधी अशा चांगल्या कॉफी डेट्स करूनही मनाला प्रथमोपचार उत्तम होतो. पण प्रथमोपचार हा काही उपाय नव्हे.

नैराश्य वारंवार येणाऱ्या व्यक्तीला आयुष्याच्या पूर्वार्धात अनेक जवळची माणसे आणि मित्र सोडून जातात. आपल्याला आपला स्वाभिमान आणि शांतता जपून आपली जवळची माणसे सांभाळायची कसरत करावी लागते. सुरुवातीची अनेक वर्षे ही प्रक्रिया तापदायक आणि दाहक असते. कारण आपल्या मित्रांना अनेकदा अशा परिस्थितीत माणसाशी कसे वागायचे याचा अनुभव नसतो. नैराश्याचा आजार असणाऱ्या शेकडो माणसांना आपली जवळची माणसे एक-एक करून लांब गेलेली दिसतात. या लांब जाण्याच्या प्रक्रियेकडे पाहायचा एक चांगला आणि शांत दृष्टिकोन आपल्याला आपल्या कामातून आणि आपल्या जगण्यातून कमवावा लागतो आणि मनातला दुखरेपणा कमी करून आपल्या माणसांना माफ करावे लागते. मी फार सावकाशपणे हे करायला हळूहळू शिकलो आहे.

(क्रमश:)

सचिन कुंडलकर

kundalkar@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2017 1:25 am

Web Title: articles in marathi on depression
Next Stories
1 नैराश्याची सुबक नोंदवही (भाग १)
2 ‘कंपनी’ सरकार!
3 आपल्या जाणिवेचा लेखक
Just Now!
X