News Flash

पुस्तकांचे वेड (भाग १)

पुस्तकांवर प्रेम असावे लागते. माया हा शब्द योग्य ठरावा. प्रेमापेक्षा ती जास्त भाबडी असते.

‘मी सध्या काय वाचतो आहे’ या विचारामध्ये वर्तमानकाळाचे भान आहे.

एखाद्या व्यक्तीला वाचनाची गोडी तयार कशी होते? ती व्यक्ती पुस्तकाचा संग्रह कसा आणि कधी करू लागते? याचे उत्तर त्या व्यक्तीच्या लहानपणात दडलेले असणार. ती व्यक्ती लहान मुलगा किंवा मुलगी असताना आजूबाजूला वाचणारे लोक होते का? पुस्तकांची चांगली दुकाने किंवा ग्रंथालये होती का? घरात आणि शाळेमध्ये वाचनाला उत्तेजन देणारे शिक्षक होते का?

मी अशा काळात लहानाचा मोठा झालो, जेव्हा शहरी भारतात आजच्याप्रमाणे ‘पाहणारा’ समाज नव्हता, तर ‘ऐकणारा’आणि ‘वाचणारा’ समाज होता. ‘पाहण्या’साठी आमच्याकडे काहीही नव्हते. लहानपणी टीव्हीसुद्धा नव्हता. इंटरनेट प्रणाली सहज आणि मुबलक उपलब्ध झाल्यावर सर्व शहरी भारतीय समाज हा आता ‘पाहणारा’ समाज झाला आहे. आजूबाजूला सहजपणे पाहिले तर रिकाम्या वेळी किंवा निवांत वेळी माणसे सतत काही न काही पाहत बसलेली असतात. वाचनात गर्क असणाऱ्या माणसाचे फोटो काढून ठेवावेत इतकी ती अभावाने आपल्याला भेटतात. वाचणाऱ्या आणि ऐकणाऱ्या व्यक्तींची संख्या झपाटय़ाने कमी होत जाताना दिसते आहे. ती संपणार कधीही नाही. पण पुस्तक हातात वाचणारी व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहे, हे दृश्य तुम्ही शेवटचे कधी पाहिले आहे हे आठवून पहा. खूप दिवस झाले असतील आणि अशा व्यक्ती कमी होत जात आहेत, हे तुम्हाला लक्षात येईल.

पुस्तकांवर प्रेम असावे लागते. माया हा शब्द योग्य ठरावा. प्रेमापेक्षा ती जास्त भाबडी असते. नवे कोरे चांगल्या विषयावरचे पुस्तक पाहिले, की ते हातात घेऊन बाकी सगळे बाजूला ठेवून वाचत बसावेसे वाटते. घरात आणि कामाच्या ठिकाणी आपल्या आजूबाजूला माणसांइतकीच पुस्तकेही असावीत, वाचून झालेली चांगली पुस्तके आपल्या सतत आजूबाजूला फडताळावर राहावीत, ही सगळी पुस्तकप्रेमी माणसाची चांगली लक्षणे आहेत. नव्या जागेचा विचार करताना आधी आपल्याजवळ असलेल्या पुस्तकांचा विचार केला जातो. आपल्या सोबत वाचनाची आपल्यापेक्षा जास्त वेडी, आवड आणि काय निवडायचे, काय वाचायचे याचे नेमके, कालसुसंगत ज्ञान असलेली मित्रमंडळी जोडली जातात.

दात्यांचे पुण्यातल्या अलकाच्या चौकात एक पुस्तकांचे दुकान होते. ‘इंद्रजाल कॉमिक्स’ वाचण्याचे जवळजवळ व्यसन या पुस्तकविक्रेत्याने मला लहानपणी लावले होते. ‘चांदोबा’ आणि ‘इंद्रजाल कॉमिक्स’मधील रेखाटनकारांनी तयार केलेली दृश्यात्मकता लहानपणापासून मनावर शांतपणे आदळत राहिल्याने माझ्या मनाचा ‘सेन्स ऑफ अ‍ॅबस्ट्रॅक्ट’ लहानपणापासून वेगळ्या दिशेला चालत गेला. मी मोठा झाल्यावर चित्रकलेकडे कोणत्या नजरेने पाहीन आणि अमूर्ततेला किती सहजपणे स्वीकारेन याची पूर्वतयारी चांदोबा आणि इंद्रजाल कॉमिक्सने केली. माध्यमिक शाळेपर्यंत मी घरात असलेली वपु आणि पुलं यांची सर्व पुस्तके वाचून काढली होती आणि मला त्यांचा कंटाळा येऊ  लागला होता. मला माध्यमिक शाळेत जाताच जी. ए. कुलकर्णी गवसले. त्यांचा आणि सुनीताबाई देशपांडेंचा पत्रव्यवहार वाचायला मिळाला आणि माझ्या वाचनाच्या आवडीनिवडीची सुरुवात झाली. मला त्या पत्रांनी विविध पुस्तके वाचण्याचे आणि पुस्तकसंग्रहाचे वेड लागले. शाळा संपून कॉलेज सुरू होऊन बारावीची सुटी सुरू होईपर्यंत मला इंग्रजी धड वाचता येत नव्हते. पण बारावीच्या सुटीत मी जीव खाऊन हातात डिक्शनरी धरून इंग्रजी पुस्तके वाचण्याचा सपाटा लावला आणि माझे आयुष्य बदलून गेले.

सुमित्रा भावे, माधुरी पुरंदरे, अरुण खोपकर, विजय तेंडुलकर या माणसांच्या घरी आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या अफाट ग्रंथसंग्रहामुळे मला माझे वाचनाचे परीघ सतत ओलांडत राहता आले. विशेषत: तेंडुलकरांनी माझी अशा तीन माणसांशी गाठ घालून दिली ज्यांच्यामुळे वर्तमानाचे भान मला सतत येत राहिले. वर्तमान ही एक अस्थिर आणि सातत्याने बदलणारी स्थिती आहे याचे भान मला तेंडुलकरांनी आणून दिले. त्या वर्तमानानुसार आपली आवडनिवड बदलायला हवी. आणि दरवर्षी जगभरात तयार होणाऱ्या ताज्या साहित्याशी आपली ओळख असायला हवी.

‘मी काय वाचतो?’ आणि ‘मी सध्या काय वाचतोय?’ यातला सूक्ष्म फरक तेंडुलकरांच्या ग्रंथसंग्रहात होता. मी काय वाचतो याचे उत्तर आपल्या ओळखीच्या, सवयीच्या आणि आवडीच्या लेखकांमध्ये असते. आपल्याला एखाद्या लेखकाचे लेखन भावनिक आणि बौद्धिक खाद्य देऊ  लागले, की आपण सुस्तावतो आणि त्या लेखकाच्या कडेवर जाऊन आरामात बसून राहतो. सगळा महाराष्ट्र वपु आणि पुलं यांच्या कडेवर एकेकाळी बसून होता त्याप्रमाणेच हे आहे. ‘मी काय वाचतो?’ याचे उत्तर हे नेहमी आवडते लेखक असतात. कुणासाठी ती स्वामींची पोथी असते, तर कुणासाठी ती बटाटय़ाची चाळ असते, तर एका विशिष्ट वयाच्या बुद्धिमान माणसांसाठी वूडहाउस, मॉम, डिकन्स असे लेखक असतात. तुम्ही भारतातील कोणत्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत जन्माला आलात यावर तुमची सुरुवातीची वाचनाची आवड ठरली जाते. अनेक माणसे आपल्याला न पटणारे वाचतच नाहीत. पुण्यातील अनेक समाजवादी माणसांच्या घरी गेले की त्यांचे दाखवायचे ग्रंथसंग्रह पाहिल्यावर आपल्याला हे लक्षात येते, की ही माणसे आपल्याला जे अजिबात पटत नाही त्या गोष्टीची ओळख कधी करून घेणार? गांधीवादी माणसांच्या टेम्प्लेट लायब्ररी असतात. त्यात तीच ती पाचपन्नास पुस्तके असतात. अनेक मराठी माणसे गौरी देशपांडे, पुलं, लंपन आणि नेमाडे एवढेच वाचून शेवटचा श्वास घेतात. प्रणव सखदेव वगैरे बाळे गोकुळात जन्मली आहेत, हे त्यांना माहीतही नसते. सध्या अनेक हौशा माणसांना हारूकी मुराकामी या जपानी बुद्धिमान लेखकाची पुस्तके घेऊन प्रवासात सर्वाना दिसतील अशी घेऊन फिरायला आवडतात त्याप्रमाणे.

‘मी सध्या काय वाचतो आहे’ या विचारामध्ये वर्तमानकाळाचे भान आहे. वाचकाला सातत्याने आपल्या सवयीतून आणि फक्त आवडणाऱ्या लेखकांच्या कुशीतून बाहेर यावे लागते. त्याचे सूचन ‘मी सध्या काय वाचतो आहे?’ या प्रश्नाच्या उत्तरात आहे. नुसते लेखक किंवा कथाप्रकार असेच नव्हे, तर साहित्यप्रकार सुद्धा. अनेक वेळा मला जाणीव होते, की माझे कथात्म (फिक्शन) वाचन खूप असले तरी इतिहास आणि राजकारण या विषयांवरील वाचन जवळजवळ नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयीची ताजी आणि रोचक पुस्तके आपण जमवलेली नाहीत. याचे कारण कथात्म वाचन करण्यात एक प्रकारचा सुखद बौद्धिक आळस तयार होतो, जो आपल्याला आवडत जातो आणि बाकीच्या ग्रंथांकडे आपले म्हणावे तसे लक्ष जात नाही. माहितीपर, विश्लेषणपर आणि संशोधनपर साहित्य आपले जास्त लक्ष, ऊर्जा आणि बौद्धिक जबाबदारी मागते. ती देण्याचा आपण आळस करतो आणि कथा-कविता- कादंबऱ्या यांत प्रमाणाबाहेर गुरफटतो. ही मला माझ्यापुरती झालेली जाणीव आहे.

इंग्रजी वाचनाच्या बाबतीत तेंडुलकर स्वयंप्रकाशी नसणार, हे सावकाशीने मला लक्षात येत होते. त्यांना कुणीतरी पुस्तके सुचवते. कुणीतरी त्यांना सतत ताजे काहीतरी आणून देते. कुणीतरी या सगळ्यामागे आहे, हे लक्षात येत होते. यात गैर काही नाही, कारण प्रत्येक माणसाला अनेक मित्र आणि चांगले सल्लागार असतात, जे त्याची वाचनाची किंवा पाहण्याची आवड हळूहळू आकाराला आणत असतात. अनेक माणसांना मुंबईतले ‘स्ट्रॅण्ड’चे शानबाग आठवत असतील किंवा पुण्यातले इंटरनॅशनल दीक्षित माहिती असतील. कितीतरी पिढय़ांना या दोन माणसांनी वाचन करायला प्रेरित केले आणि त्यांची वाचनाची आवड उत्तम जोपासली. माणसांना पुस्तके हाताळायला आणि पाहायला चांगल्या जागा उभ्या केल्या.

तेंडुलकर व्यक्तीसंग्रहाच्या बाबतीत कुशल आणि चतुर होते. अफाट वाचन करीत असत आणि आपण त्यांच्यासमोर गेले की मुद्दाम आपल्याला पुस्तके हाताळायला देत. त्यातल्या अनेक पुस्तकांवर पेन्सिलीने केलेली ‘कुलकर्णी’ अशी सही असे. हे द्वारकानाथ कुलकर्णी. तेंडुलकरांचे जवळचे मित्र. मोठे नावाजलेले वास्तुरचनाकार. पुस्तकांचा अफाट व्यासंग, वर्तमानकाळाकडे बारकाईने नजर आणि इतिहास व स्मरणरंजन यांतला फरक ओळखण्याची जाण अशी बहुपेडी विचारव्यवस्था असलेला हा माणूस तेंडुलकर यांच्यामुळे माझ्या आयुष्यात आला आणि माझे फार भले झाले. इतर दोन महत्त्वाची माणसे आहेत ती म्हणजे पुस्तक संग्राहक आणि दुर्मीळ ग्रंथ वितरक शशिकांत सावंत आणि मुंबईतल्या ‘Wayword and Wise’ या अप्रतिम पुस्तकाच्या दुकानाचे प्रवर्तक विराट चंडोक. या तिघांनी मलाच नाही तर वाचनाची आवड असलेल्या माझ्यासारख्या अनेक मित्रमंडळींना फार काही चांगले असे दिले आहे.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2017 1:54 am

Web Title: author sachin kundalkar article about his reading hobby
Next Stories
1 परतीचा प्रवास (भाग दोन)
2 परतीचा प्रवास भाग १
3 गुणी आणि कर्तबगार नटय़ा
Just Now!
X