परक्या देशातील एखाद्या शहरात राहायला गेल्यावर हॉटेलमध्ये खोली घेऊन राहण्यापेक्षा मला गेली काही वष्रे घर भाडय़ाने घेऊन राहायला आवडू लागले आहे. अगदी एक-दोन दिवसांपासून ते संपूर्ण महिन्यापर्यंत चांगल्या वाजवी भाडय़ात घरे मिळवून देणाऱ्या काही कंपन्या आता अस्तित्वात आल्या आहेत. त्यातल्या एका लहान, कल्पक, पण महत्त्वाच्या कंपनीने (AIRBNB) जगभरातील हॉटेल व्यवसायाच्या तोंडचे पाणी पळवले आहे. कारण माझ्यासारखे सातत्याने प्रवास करीत राहणारे अनेक लोक आता या स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या उत्तम घरांमध्ये राहणे पसंत करतात. त्या घरांचे फोटो, मालकांची माहिती, घराची भाडी, नकाशे, घराभोवती असणाऱ्या सुविधा आणि घराचे नियम हे फार सोप्या भाषेत वेबसाइटवर उपलब्ध असतात. आणि आपण प्रवासाला जाण्याआधी आपल्या चलनात पैसे भरून ती घरे भाडय़ाने घेऊ शकतो. मला आजपर्यंत या सेवेचा नेहमीच चांगला अनुभव येत राहिला आहे.

मी ज्या घरात या आठवडय़ात लंडनमध्ये राहतो आहे, ते एका इटालियन मुलाचे घर आहे. दोन खोल्या आणि छोटे बाथरूम असा हा स्टुडिओ आहे. हाईड पार्कच्या परिसरात. घरापासून हाईड पार्कचे गोल तळे पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. घरात वावरताना त्याच्या काही वस्तू मला सापडतायत; ज्या तो ठेवून गेला असावा. म्युझिकवरची काही उत्तम पुस्तके, त्याचे कपाटातील काही साधे पांढरे टी-शर्ट्स- जे त्याच्याविषयी उत्सुकता तयार करतात. बाथरूममध्ये आरशाच्या वर सापडलेली गांजा भरून गुंडाळलेली एक सिगरेट. आणि माझ्या पलंगाखालील त्याचा फुटबॉल हातात घेऊन काढलेला एक जुना आकर्षक फोटो. मी त्याला भेटलेलो नाही. तो डॉक्युमेंटरीज् बनवतो आणि म्हणून भेटायला आवडेल, असे पत्रात लिहिलेले असतानासुद्धा आमची भेट झालेली नाही. किल्ली इमारतीच्या तळघरात एका दगडाखाली ठेवली होती. ती घेऊन मी आणि माझ्या मित्राने दार उघडले. हा मुलगा आमच्यासमोर कधीच आलेला नाही.

australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

गेल्या आठवडय़ात मी रसेल स्क्वेअरजवळ माझ्या फिल्मच्या युनिटसोबत ज्या घरात राहत होतो, त्या घराच्या मालकालासुद्धा मी भेटलो नाही. किल्ली इमारतीच्या कचरापेटीजवळ असलेल्या एका जमिनीलगतच्या छोटय़ा काचेच्या पेटीत ठेवली होती. त्या पेटीला सांकेतिक कोड होता; जो मला पत्राने कळवला गेला होता. मला घरमालकाचे आणि माझे असे नाते फार दृश्यात्मक वाटते. त्यात एक गुपित असलेली समजूत साठवून ठेवलेली असते. आपल्यासमोर काय आश्चर्य वाढून ठेवले आहे याची उत्सुकता ताणणारे हे नाते. मी आजवर ज्या पाच-सहा घरांमध्ये अशा पद्धतीने राहिलो, त्यातल्या एकाही घरमालकाला मी भेटलेलो नाही. मला आजपर्यंत कधी फसवले गेलेले नाही. दुसऱ्या किल्लीने दार उघडून कधी कुणी घरात आलेले नाही. जे नाटय़ घडते आणि सापडते, ते सगळे नाटय़ तो मुलगा किंवा ती मुलगी घरात मागे सोडून गेलेल्या वस्तूंच्या रूपाने. उत्सुकतेचे आणि आकर्षणाचे प्रवाह तयार होतात. कितीही सफाई करून ठेवलेली शुभ्रता आणि डिर्टजटचा मोहक वास असला तरी तुम्ही त्यांच्या पलंगात झोपत असता.

घर सोडून जाताना किल्ली परत त्या ठिकाणी ठेवायची असते. आपण निघून जाताना फोनवर मेसेज केला की एक तासाने घर साफ करणारी व्यक्ती घरात शिरते आणि आपण मागे सोडलेल्या काही वस्तूंची विल्हेवाट लावते. मी अशा घरांमध्ये नेहमी एक-एक वस्तू मागे सोडून येतो.

मला या घरांमध्ये राहायला आवडते, कारण तिथे शांतपणे लिहीत बसता येते. त्याचप्रमाणे दिवसभर हिंडून-फिरून घरी परत आल्याची भावना तयार होते; जी हॉटेलमध्ये कधीच होत नाही. हॉटेलच्या वास्तव्यात मन कधीच थाऱ्यावर राहू शकत नाही. कारण हॉटेलच्या खोल्यांमध्ये नेहमी सेक्सचा अदृश्य विचार भरून राहिलेला असतो. आपण वावरतो त्यातली नव्वद टक्के जागा पलंगाने व्यापलेली असते आणि त्या जागेत शिरताच काहीतरी banal आणि  adventure ने भारून गेलेले उष्ण आणि  तात्पुरते नाते तयार करावे, या जाणिवेतून मनाची सुटका होत नाही. हॉटेलच्या खोलीत सुटीचे सामान टाकताच मनात आकर्षणाचे वारे वाहू लागतात आणि सगळा वेळ मन त्या विचाराने भरून राहते. हॉटेलच्या खोलीत एकटय़ाने राहणे म्हणजे सुट्टी नव्हे. तसेच हॉटेलच्या खोलीत ओळखीच्या आणि सवयीच्या माणसासोबत एकत्र राहणे म्हणजे तर सुटीचा अपमान आहे. ओळखीच्या माणसाला सुटीच्या दिवशी आपल्या हॉटेलच्या खोलीत दात घासताना पाहणे यासारखे बिचारेपण दुसरे नाही. प्रवासाला गेल्यावर जो मोकळेपणा आणि जी गुप्तता मनाला आणि शरीराला परकी शहरे देतात, त्यातून तयार होणाऱ्या भुका भागवताना मनाची दमछाक होऊ शकते. आपण शहाणे वागायचे ठरवले तर घरामध्ये ती दमछाक कमी होते. म्हणून मला परक्या शहरांमध्ये भाडय़ाची घरे घेऊन राहण्याचा विचार हल्ली काही काळ तरी आवडू लागला आहे.

मी जर मित्रांसोबत किंवा मत्रिणीसोबत असे घर भाडय़ाने घेऊन कधी राहिलो, तर स्वतंत्र झोपायच्या खोल्या असलेले घर घेतो आणि त्यांच्या खोलीतून किंवा माझ्या खोलीतून सकाळी कोण बाहेर पडते याचा फार विचार न करता मोकळेपणाने राहतो. आणि जे कुणी त्या वेळी घरात असतील त्यांच्यासाठी कॉफी आणि ब्रेकफास्ट बनवतो. मला तो बनवून अनोळखी माणसाचे मन जिंकून घ्यायला फार आवडते. नव्या शहरात मी सायकल घेऊन फिरतो. कचऱ्याच्या पिशव्या खाली टाकायला रोज जातो. कपडे धुतो, वाळत टाकतो. गच्चीवर ठेवलेल्या टेबलावर बसून तासन् तास लिहीत बसतो.

नव्या शहरात सुटीला गेल्यावर त्या शहरातील सर्व जागा बघून संपवण्याचे कोणतेही बंधन आपल्यावर नसते. त्यामुळे तिथली राहती घरे हीसुद्धा आपल्या सुट्टय़ा रंगीत करत राहतात. निवांतपणा आणि शांतपणा देतात. खूप वेळ अनेक ठिकाणी लोळत घेतलेली नवी पुस्तके वाचत बसायला देतात. या घरांमध्ये अचानक टिंगटाँग करून मोलकरणी येऊन ‘दादा, आज काय जेवायला बनवू?’ असले निर्णय घ्यायला लावत नाहीत. भांडय़ाची पावडर संपली आहे, अशी महत्त्वाची माहिती देत नाहीत. दुपारी खोल्या पुसायला येऊन पाय वर घेऊन किंवा उघडे पाय झाकून बसायला लावत नाहीत. ही घरे अनोळखी, एकटय़ा शेजाऱ्यांसाठी दरवाजा उघडून धरायचा अनुभव घेऊ देतात. लिफ्टमध्ये काही नव्या शक्यता घडवून आणू देतात. आणि नव्या शहरात एक आपुलकीची आणि ओळखीची शांत भावना ही घरे फुलवतात.

मी इस्तंबूलमध्ये एक-दीड वर्षांपूर्वी असे घर घेऊन राहिलो ते एका नटीचे होते. त्यातून समुद्राचा सुंदर देखावा दिसत असे. गोव्यातले घर एका पोर्तुगीज मुलाचे होते- ज्याचा मातीची भांडी तयार करायचा कारखाना होता. त्या घरात मला एक जुने ग्रीटिंग कार्ड सापडले होते. त्याच्या मित्राने लिहिलेले.

काल घराखालच्या पबमध्ये शांतपणे मित्रासोबत बसलेलो असताना एक तरुण ब्रिटिश मुलगा आला आणि तुमच्या टेबलवर बसू का, असे म्हणाला. इतरांना अशावेळी हवी असते तशी त्याला सिगरेट नको होती. तो म्हणाला, ‘‘गेले तीन दिवस मी कुणाशीच बोललो नाहीये, तर मी तुमच्याशी बोलू का? मला या शहरात फार एकटे वाटत आहे..’’ आम्ही ऐकत आहोत म्हटल्यावर तो बोलू लागला. त्याची कहाणी इतर कोणत्याही एकटय़ा मुलाच्या कहाणीच्या साच्यातलीच होती. त्याला गिटार वाजवायचे होते आणि त्याची मत्रीण त्याला काम सोडून ते करायला साथ देत नव्हती. त्याला आम्ही काही बोलायला नको होते. फक्त त्याला जिवंत माणसाशी बोलून सगळे ओकायचे होते. काही काळ बोलून, आमचे आभार मानून तो निघून गेला. जाताना- ‘‘I should ask who you are and what do you do. But I guess this is not the right time to do so. I will do it later sometime…’’ असे म्हणून तो निघून गेला.

आम्ही एअरपोर्टकडे जात असताना आमची टय़ूब एकाच जागी अर्धा तास थांबली. आणि नंतर आम्हाला कळले की, एका मुलाने रुळावर उडी मारून आत्महत्या केली. काही कारण नसताना मला परत तो पबमध्ये भेटलेला मुलगा डोळ्यांसमोर येऊन गेला.

मी यावेळी दिल्लीच्या सरोजिनी मार्केटमध्ये फार पूर्वी घेतलेले एक जाडेभरडे थंडीचे जाकीट घरात सोडून आलो. कारण पुस्तके आणि नव्या बुटांनी बॅगमध्ये जागा उरली नव्हती. ते आता तिथे इकडेतिकडे बेघर माणसांच्या अंगावर फिरेल. अशाच गोष्टी फिरत राहतात.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com