07 April 2020

News Flash

ब्रिटिश मालकीचे इतरांचे लंडन!

मी ट्रेनमधून आज घरी जाताना माझ्या पिशवीत मी स्वत: बेक केलेला पहिला ब्रेड आहे.

बेकिंग स्कूलमध्ये पहिल्यांदा संपूर्ण एकटय़ाने ब्रेड बनवायला शिकलो. मला आज फार आनंद झाला आहे.

मी ट्रेनमधून आज घरी जाताना माझ्या पिशवीत मी स्वत: बेक केलेला पहिला ब्रेड आहे. गरम. आज मी लंडनमधील एका फार चांगल्या बेकिंग स्कूलमध्ये पहिल्यांदा संपूर्ण एकटय़ाने ब्रेड बनवायला शिकलो. मला आज फार आनंद झाला आहे. तो का झाला आहे हे माहीत असूनही आश्चर्य या गोष्टीचे वाटते आहे, की आपल्याला इतका आनंद देऊ  शकणारी ही गोष्ट आपण याआधी का नाही केली? बेकिंग करायला आधी का नाही शिकलो?

मला शिकवणारा शेफ फ्रेंच आहे. त्याला मदत करणारा साहाय्यक इटालियन. आम्ही सगळे आहोत लंडन शहराच्या मध्यभागी.. बरो मार्केटमध्ये. हे बेकिंग स्कूल लंडनमधील अतिशय प्रसिद्ध स्कूल आहे. त्यांची स्वत:ची बेकरी आहे- जिथून राणीला नेहमी ब्रेड पाठवला जातो. आम्हाला शिकवणारा शेफ आम्हाला अभिमानाने हे सांगत होता. माझ्या शिक्षणाची सुरुवात टेबल कसे साफ करायचे, या उपक्रमाने झाली. शेफचे म्हणणे होते की, बेकिंग करणे म्हणजे सर्वात आधी टेबलची सफाई आणि गोष्टींची नीट मांडामांड याची दृष्टी असायला हवी. ब्रेड बनवायला लागणारे घटक पदार्थ अतिशय योग्य प्रमाणात बेकिंगच्या खास वजनकाटय़ावरून तोलून घेता यायला हवेत. त्यात एका ग्रामचासुद्धा फरक होता काम नये. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओव्हन बेकिंग करत नाहीत. बेकिंगचे काम हे आपण आपल्या नाकाने आणि डोळ्याने करायचे काम आहे. यंत्रावर फार अवलंबून राहू नये.

पुण्यात चित्रीकरण सुरू झालेल्या आमच्या मराठी चित्रपटाची कथा लंडनमध्ये येऊन संपते. पुण्यातील चित्रीकरण संपवून आम्ही इथे आलो आणि गेल्या चार दिवसांत झपाटय़ाने इथे राहिलेले चित्रीकरण पूर्ण केले. चित्रपटाची कथा ही मराठी जेवणाची कथा आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या आजच्या काळातील एका तरुण मुलाच्या आयुष्याची ही गोष्ट आहे. नेहमीप्रमाणे इथे मधेच पडणारा पाऊस चालू आहे. त्याच्या तऱ्हा सांभाळत आम्ही रस्त्यावर काम करत आहोत.

मी या शहरात आलो की फारच निवांत आणि सवयीची भावना पटकन् तयार होते. इथे मी आयुष्यात खूप उशिरा आलो. फ्रेंच शिकत असल्याने आणि फ्रान्सशी कामाने नेहमी संबंध आलेला असल्याने लंडनविषयी माझ्या मनात सुप्तपणे कंटाळ्याची भावना फार लहान असल्यापासून तयार होत होती. फ्रेंच शिक्षणाचा तो एक भाग असल्यासारखे नकळत माझ्या मनात लंडनविषयी एक उदासीनता आणि कंटाळा होता. काय ठेवलंय त्या शहरात? त्यापेक्षा पॅरिस कितीतरी चांगले आहे. आपल्याला करण्यासारखे सगळे काही पॅरिसमध्ये आहे, लंडनमध्ये नाही, असे मला अनेक वर्षे उगाच वाटायचे आणि त्यामुळे मी इथे यायचा निर्णय पुढे ढकलत आलो.

दोन वर्षांपूर्वी मी इथे पहिल्यांदा आलो तेव्हा फार सहजपणे या शहराच्या प्रेमात पडलो. शहराच्या प्रेमात पडलो; ब्रिटिशांच्या नाही. कारण मी मनातून फार फ्रेंच स्वभावाचा मुलगा आहे. आणि ब्रिटिश समाजाची जडणघडण आणि मानसिक व्यवहार मला अजूनही परके आहेत. लंडन म्हणजे इंग्लंड नाही. लंडन हे एक जागतिक शहर आहे. ज्याला ते परवडू शकेल अशा प्रत्येकाचे ते शहर आहे. ब्रिटिश लोक हे अतिशय धूर्त, व्यापारी वृत्तीचे असल्याने त्यांनी या सुंदर आणि अवाढव्य शहराला एक वस्तू किंवा एक सेवा- म्हणजे ज्याला कामाच्या भाषेत ‘सव्‍‌र्हिस’ म्हणतात, तसे तयार केले आहे. ब्रिटिशांचा जुना इतिहास, इमारती आणि संपन्न भूतकाळ विकणे आणि पैसे कमावणे हे या शहराचे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. त्याचप्रमाणे जगातील ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान आणि पायाभूत सेवांची आखणी या क्षेत्रात काम करणाऱ्या जगातील सर्वोत्तम कंपन्या आणि माणसे या शहरात राहतात. हे जगातील अतिशय महाग आणि प्रचंड वेगवान शहर आहे. वाईनचे घुटके घेत निवांत तंगडय़ा वर करून कविता करत बसणारे हे शहर नाही. मुंबईप्रमाणे सतत आपल्या ध्येयाच्या मागे धावणारी या शहराची वृत्ती आहे.

ही वृत्ती समजून घेण्यासाठी इथे काही दिवस कामासाठी राहावे लागते. राणीचा राजवाडा, बिग बेन घडय़ाळ, या राजाची चड्डी, त्या राणीचा आरसा, या राजपुत्राची खेळणी अशी भारतीय म्हाताऱ्यांना असणारी आकर्षणे जर आपल्या मनातून संपली असतील तर लंडनच्या वर्तमानाची खरी मजा घेता येते. अनेक मराठी माणसे अजूनही पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘अपूर्वाई’ या पुस्तकाच्या चौकटीतून या शहराकडे पाहत असतात. अशा म्हाताऱ्या लोकांच्या खिशातून भरभक्कम पैसे काढून त्यांना जुने राजवाडे, मेणाचे पुतळे, हिरे, तलवारी अशा गोष्टी दाखवून त्यांना परत पाठवून देणे, हे या शहराला उत्तम जमते. पण या शहराची आजची खरी ऊर्जा ही वर्तमानातील सेवाक्षेत्रात आहे. ती समजणे ही भारतीय मध्यमवर्गाच्या पलीकडची गोष्ट आहे. कारण अजूनही बहुसंख्य भारतीय माणसे ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या भावनेतून बाहेर आलेली नाहीत. दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बिंगनंतर जे लंडन पूर्ववत उभे राहिले आहे त्याचा सर्व खर्च भारताने केला आहे. ही जाणीव एकदा झाली की तुमचे लक्ष या शहरात चार दिवस येऊन बेभान होऊन राजवाडे आणि घडय़ाळे बघत हिंडणाऱ्या म्हाताऱ्या, भाबडय़ा भारतीय माणसांवरून उडते.

इतिहासातील जुनाट इमारती आणि राजवाडे  सोडून या शहरात बरेच काही शोधण्यासारखे आणि सापडण्यासारखे आहे. पण त्यासाठी नावीन्याची आवड, वर्तमान शोधण्याची तयारी आणि लंडनसारख्या जागतिक शहरात मिसळून जाण्यासाठी आवश्यक असे गुण असावे लागतात.

वेगळे खाणेपिणे आणि पाणी पचवायची ताकद, आपल्या समाजाच्या अभिमानाला घातलेले कुलूप, जिथे गेलो आहोत तिथले नियम पाळायची वृत्ती या तीन गोष्टी जरी जमल्या, तरी लंडनच्या समाजात मिसळून काम करणे फार सोपे जाते. लंडनमध्ये ब्रिटिश माणसे फार कमी वाटय़ाला येतात. इतर कोणत्याही देशातील माणसे न आवडणारी म्हातारी ब्रिटिश माणसे आता लंडनपासून लांब, छोटय़ा, शांत गावांत राहायला गेली आहेत. लंडनमधील मोठय़ा इमारती आणि धंदे त्यांनी अरबांना आणि चिनी लोकांना चालवायला दिले आहेत. पूर्व युरोपातील आणि आशियातील मजूर हे शहर चालवतात. प्रचंड राबतात. भांडवल अरबांचे आणि चिनी लोकांचे; हात पूर्व युरोपातील लोकांचे आणि नफा ब्रिटिशांचा अशी उत्तम व्यवस्था करून म्हातारी ब्रिटिश माणसे लंडनपासून लांब बागकाम करत आपल्या सुंदर मोठाल्या घरांमध्ये राहतात. त्यामुळे जगातील इतर कोणत्याही शहरांपेक्षा लंडन हे सध्या फार तरुण शहर झाले आहे. युरोपातील इतर शहरांमध्ये असते तशी बाहेरच्या माणसांविषयी द्वेषाची वृत्ती या शहरात बरीच कमी आहे. कारण परवडत असेल तरच तुम्ही इथे तग धरू शकता, नाहीतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे शहर सोडून जावे लागते. अशी आर्थिक व्यवस्था उभी करण्यात ब्रिटिश लोक यशस्वी झाले आहेत. त्यामुळे इथे राहायचे असेल तर तुम्हाला कष्ट करून प्रचंड पैसे कमवावे लागतात. किंवा मग इथे खूप पैसे देऊन राजवाडे आणि घडय़ाळे बघून दोन-चार दिवसांत परत जावे लागते. इतरांना परवडणारे हे सोपे शहर नाही.

लंडन मला आवडते ते इथल्या पुस्तकांच्या दुकानांसाठी. अनेक विषयांवर उत्तम आणि सध्याची पुस्तके मिळणारी अक्षरश: हजारो दुकाने या शहरात आहेत. त्याचप्रमाणे या शहराचा फॅशन सेन्स जगातील कोणत्याही इतर शहराच्या पुढे आहे. लंडनच्या रस्त्यावरील माणसांचे कपडे पाहणे हा माझा आवडता छंद आहे. मी हाईड पार्कजवळ राहतो आणि पायी किंवा सायकलने शहरभर फिरत असतो. माझ्यासोबत माझ्या मनात असलेली भीती आणि संकोचसुद्धा सहजपणे वावरत राहतो. इतकी वर्षे युरोपमध्ये राहून, प्रवास करून माझ्यात अजूनही इथे जगण्याचा संपूर्ण आत्मविश्वास कसा आला नाही, याचा मी विचार करतो तेव्हा माझ्या हातात कोणतेही उत्तर सापडत नाही. मी इथे आलो की आवर्जून जुनी आणि नवी नाटके पाहतो. आणि इथल्या जुन्या, सुंदर पब्समध्ये बसून माझी आवडती हेन्ड्रिक्स नावाची जीन पीत राहतो.

आपले शरीर आणि आपले मन लंडनसारखे असावे असे इथे फिरताना मला नेहमी वाटून जाते. सुंदर, शिस्तबद्ध, मोकळे आणि आखीव. शिवाय बुद्धिमान. लंडन शहराचे हे गुण आपल्या शरीराला आणि मनाला लावून घेतले तर आयुष्य फार सुंदर जाईल.

सिनेमाचे चित्रीकरण संपवून माझा मुख्य नट सिद्धार्थ भारतात परत गेला आहे. आणि माझी हक्काची वार्षिक सुट्टी सुरू झाली आहे.

..माझ्या पिशवीत मी स्वत:च्या हाताने बनवलेला गरम गरम ब्रेड आहे आणि एक वाईनची बाटली. आणि आता पाऊस थांबून फार मोकळे आणि सुंदर ऊन पडायला लागले आहे.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2017 3:07 am

Web Title: author shares experience of making cake in baking school in london
Next Stories
1 शहराचे छायाचित्र (भाग- २)
2 शहराचे छायाचित्र ( भाग १ )
3 ‘जात’कारणाची प्रखर जाणीव
Just Now!
X