05 August 2020

News Flash

माझी बदललेली दिवाळी

वास्तविक पाहता ज्यांच्या मूर्ती नाहीत त्या देवांवर आणि राक्षसांवर विश्वास ठेवणारा समाज आम्ही नव्हतो.

दिवाळी आली की आपोआप आजूबाजूला आनंद निर्माण होत जाई. वातावरणात अतिशय सुखद असा गारवा तयार होत असे. नवीन कपडे घालायला मिळत असत. आणि ते घालून मनाच्या अगदी आतमध्ये स्वत:विषयी एक गुप्त प्रेम निर्माण होत असे. स्वत:विषयी निर्माण होणाऱ्या त्या गुप्त अशा प्रेमामुळे मला लहानपणी दिवाळीची वाट पाहायला आवडत असे. वास्तविक पाहता ज्यांच्या मूर्ती नाहीत त्या देवांवर आणि राक्षसांवर विश्वास ठेवणारा समाज आम्ही नव्हतो. ज्याची मूर्ती तयार केली आहे फक्त तेच ते देव आम्ही गांभीर्याने घ्यायचो. उदाहरणार्थ, दिवाळीच्या आधी नुकताच येऊन गेलेले गणपती आणि गौरी. दिवाळीचा देवांशी किंवा राक्षसांशी संबंध नव्हता. म्हणजे कालनिर्णय दिनदर्शिकेच्या मागे जे लिहिलेले असायचे ते सगळे कॉमिक बुक वाचल्यासारखे वाचले जायचे. पण तसे काही घडले असेल असे कधीच खरे वाटले नाही. नरकासुर वगैरे मंडळींच्या मूर्ती आम्ही पाहिलेल्या नसल्याने आम्हाला त्यांच्या कथांमध्ये फारसा इंटरेस्ट नसायचा. लक्ष्मीपूजनाला संध्याकाळी घरी लक्ष्मी फेरफटका मारून जाते. मी लहानपणी हा विचार करत बसायचो की- आपल्याकडे ती सात वाजता आली तर मावशीकडे कधी जाईल? मामाकडे पोचायला तिला पुढे किती वेळ लागेल? असे काहीतरी. ती घरी येत असेल यावर माझा विश्वास बसत नसे. कारण एकाच वेळी ती बिचारी किती ठिकाणी जाईल? भारतीय माणसे इंग्लंड-अमेरिकेत असतात, त्यांच्या घरीपण ती जाते का, असा मला प्रश्न पडत असे. रुचकर फराळ, नवे कपडे, वातावरणातील बदल आणि त्यामुळे मनात आणि शरीरात उमटणाऱ्या नवनव्या आनंदाच्या लहरी या सगळ्यामुळे मला दिवाळीचा हा काळ फार आवडत असे.

हा सगळा काळ हा खरेदी-विक्रीचा मामला आहे हे नंतर सावकाश उमजत गेले. नाताळ, दिवाळी हे सण त्यांचे मूळ स्वरूप संपून आर्थिक उलाढाल वाढवायचे आणि मध्यमवर्गीय पारंपरिक ग्राहकाच्या खिशातून प्रचंड पैसे खर्च करून काढून घ्यायचे यासाठी बाजाराने पद्धतशीरपणे आखलेले असतात, हे फार सावकाशपणे नंतर उमजले. आणि दिवाळीला नवीन कपडे आणि वॉशिंग मशीन घेणाऱ्या लोकांची दया येऊ  लागली तरी दिवाळी आवडायची थांबली नाही, कारण दिवाळी अंक जिवंत होते. त्यांच्या जाहिरातीच्या पुरवण्या झाल्या नव्हत्या. आणि मराठी नट लिहायला लागले तरी त्यांचे लिखाण समाजात गांभीर्याने घ्यायचे वातावरण निदान आमच्या तरी शहरात नव्हते. अंकावरचा फोटो ज्यांचा असतो ती माणसे लिहीत वगैरे नसत. वय मोठे होऊ लागले तसा एक-एक करत दिवाळीचा उत्साह संपत गेला तरी महाराष्ट्रातल्या तळमळीने काम करणाऱ्या अनेक संपादक- प्रकाशक मंडळींनी अगदी जितके शक्य आहे तितके चांगले दिवाळी अंक प्रकाशित करण्याचा जो रेटा चालू ठेवला त्यामुळे दिवाळसणाचे बाजारू स्वरूप लक्षात येऊनही त्या काळाची आणि त्या काळात मनात नव्याने उमलणाऱ्या ऊर्मीची वाट बघणे मनाने थांबवले नाही. मराठी दिवाळी अंकांच्या मृत्यूपर्यंत दिवाळी आवडत होती. मग एक वर्ष असे आले, की काही वाटले नाही. आपण मोठे झालो आहोत, ही जाणीव अशा क्षणांना येत असावी.

आपल्यात आणि इतर समाजात हा एक मोठा फरक आहे की, आपण पुढची पिढी जन्माला घातलेली नाही. त्यामुळे आपल्याला जे आणि जसे मिळाले तसे आनंद त्यांना मिळावेत यासाठी त्या आनंदाची दमछाक होईपर्यंत पुनरावृत्ती करण्याचे दडपण जे पुनरुत्पादन केलेल्या प्राण्यांवर असते, ते आपल्यावर आले नाही याची जाणीव मला  झाली. काहीही केले आणि कितीही पैसे खर्च केले तरी पूर्वी जसा हिवाळा होता तसा हिवाळा माझ्या आजूबाजूचे कुणीही आपल्या लहानग्यांना देऊ  शकलेले नाहीत. तशा पणतीचा प्रकाश पाडणे हे तरी जमावे! पण तेसुद्धा जमलेले दिसत नाही. कारण दिवाळी साजरी करायला आजूबाजूला एक नेटका अंधार असावा लागतो.. तो अंधार आमच्या आयुष्यातून निघून गेला आहे हे कुणाच्याही लक्षात आलेले नाही. मग त्याची कसर प्रमाणाबाहेर खरेदी आणि पैशांची उधळपट्टी करून भरून काढली जात आहे आणि आपल्या लहानग्यांभोवती आनंदाचे वातावरण तयार केले जात आहे हे दिसू लागले.

मला लहानपणी ज्या गोष्टीची भीती होती ती घडताना मला पाहायला मिळाली. मला मोठे होण्याची भीती होती. आपल्याला आनंद मिळावा आणि सगळे काही भरपूर मिळावे म्हणून मोठी माणसे खूप पैसे खर्च करून हा दिवाळीचा माहोल आपल्याभोवती उभा करतात, हे समज आलेल्या मुलांना उमजू लागलेले असते. मोठय़ा माणसांना दिवाळीच्या काळात पैशांचे आणि खर्चाचे ताण असतात, हे लहानपणी मला कळू लागले तेव्हा आपण एका वेळी मोठे होऊ आणि आपलाही दिवाळीचा आनंद संपून जाईल, ही भीतीदायक जाणीव मला कधीतरी फार पूर्वी ना मोठा, ना लहान असताना झाल्याची मला आठवते. माझ्या मनात ती जाणीव रेंगाळत राहिली होती. मला लहानपणी असे वाटायचे की आपल्या वडिलांना आणि आपल्या आईला जसे आपण झालो तसे आपल्यालाही एक बाळ होईल. ते आपोआपच होते असे वाटायचे. कारण बाळे निर्माण करायची सक्ती असल्यासारखी माझ्या बहिणींना आणि भावांना लग्न केल्या केल्या ती होत असत. आपल्यालाही होईल आणि मग आपली दिवाळी चिंतेत आणि सगळे साग्रसंगीत पार पाडण्यात जाईल असे वाटून मी धास्तावायचो. जी. ए. कुलकर्णी यांच्यावर जशी दोन बहिणींचे करायची जबाबदारी असते तशी काहीतरी जबाबदारी आपल्यावर पडेल, किंवा अनिल अवचट यांच्याप्रमाणे आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालायचे की कॉर्पोरेशनच्या शाळेत घालायचे, असे निर्णय एका वयात आपल्याला घ्यावे लागतील आणि मग आपल्याला आत्ता जसे मोकळे, निवांत वाटते आणि दिवाळीच्या या काळात आपल्या स्वत:विषयी जे मऊ प्रेम उमलून येते तसे होणे कधीही थांबू नये असे वाटायचे. कुणी आपल्याला काही नवीन घेऊन दिले नाही, कधी परत फटाके उडवले नाहीत किंवा आईसमोर उघडय़ा अंगाने तेल लावायला बसायची आपल्याला लाज वाटून तो आनंद संपून गेला तरी ज्या गुप्त कारणांमुळे आपल्याला दिवाळी आवडते ती कारणे प्रज्ज्वलित राहू देत असे सतत वाटायचे. मौजेचा अंक माझ्यासोबतच म्हातारा झाला. मौजेचे अप्रूप सावकाश संपायचा काळ हा माझे माझ्या स्वत:विषयीचे अप्रूप संपायचा काळ होता. आता आपण दिवाळी अंकांचा आडोसा घेऊन आनंदी राहू शकत नाही हे लक्षात आले.

काही काळ या रिकामेपणाची बोचरी अवस्था आणि दिवाळीच्या काळात खूपच स्पेशल असे करायला काही नसल्याची जाणीव काही वर्षे मला येत राहिली. आनंदी व्हायला सणांची गरज नाही हे उमजले. या रिकामेपणातून आणि दिवाळीला सगळे होतात तशा वेडय़ा उधाणाच्या सक्तीतून मी सावकाश बाहेर आलो तेव्हा मला फार मोकळे आणि बरे वाटले. मधली अनेक वर्षे मोठे होण्याच्या काळात मनातून निघून गेलेले स्वत:विषयी वाटणारे ते गुप्त प्रेम सावकाशीने माझ्याकडे परत येऊ  लागले. माझ्या वयाची माणसे दिवाळीपासून आणि रोजच्या रतीबाप्रमाणे प्रत्येक सिग्नलला होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या पारंपरिक गोंगाटापासून लांब जायला शहराबाहेर पळून जातात तसे पळून जायची सक्ती मी स्वत:वर लादून घेतली नाही. पहाटेच्या गाण्याला जाण्यासाठी लवकर उठलेल्या आणि दुपारी श्रीखंड खाऊन डाराडूर झोपलेल्या रिकाम्या शहरात मी मित्रांसोबत ड्राइव्हिंगला जायला लागलो. दह्यमध्ये चकली बुडवून खाण्याचा आनंद लांब गेलेला नाही, तो आपल्यापाशी आहे हे मला लक्षात आले. पोटावर झोपून मोबाइल फोनवर अखंड गेम्स खेळणाऱ्या घरातील लहान मुलांच्या पसाऱ्यात आपल्या बहिणी आणि भाऊ  घामाचे डाग पडलेले फॅब इंडियामधून आणलेले भडक रंगाचे कुडते आणि आणि साडय़ा घालून वावरताना मी साध्या, रोजच्या कपडय़ांत बसून गप्पा मारताना मला वाटणारा संकोच कमी होत गेला.

फार लहान असल्यापासून दिवाळीला आवडते परफ्यूम घेऊन माझ्या संग्रहात ते ठेवायची एक सवय मला आहे. मी चांगल्या परफ्यूमचा संग्राहक आहे. मी मधल्या काळात मोडलेली ती सवय पुन्हासुरू केली. खुशबू ही ‘बेआवाज’ असते, असे जावेदसाहेबांनी एका गाण्यात लिहिले आहे. माझे स्वत:वरील गुप्त प्रेम अजूनही शाबूत आहे, या आश्वासक जाणिवेत मी सध्या जगतो आहे. यालाच सण साजरा करणे म्हणत असतील तर मग ठीक आहे.

kundalkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2017 3:07 am

Web Title: diwali 2017 sachin kundalkar diwali
Next Stories
1 दोन रात्री (भाग दोन)
2 दोन रात्री
3 नैराश्याची सुबक नोंदवही (भाग ३)
Just Now!
X