मार्च महिना जवळ आला आणि उरलेल्या पैशांची विल्हेवाट लावून नवीन देणग्यांसाठी आपापली बँकेची खाती झाडून, सारवून, सडा, रांगोळी घालून तयार ठेवायची वेळ आली की अचानक भारतात सामाजिक संस्थांची चर्चासत्रे, मुलाखती आणि चित्रपट महोत्सवांचे पेव फुटते. या चर्चासत्रांसाठी अनेक सामाजिक विचारवंत विमानांनी प्रवास करीत फिरू लागतात. मुख्य कलात्मक प्रवाह, मुख्य चित्रपट महोत्सव, प्रदर्शने, कलात्मक चळवळी आणि व्यावसायिक कलात्मक उद्योग यांचे काम कमीच पडले आहे की काय असे वाटून सामाजिक काम करणाऱ्या संस्थांनासुद्धा कलात्मक उपक्रम करायचे असतात. कारण ते केल्याने खूपच प्रेरणा मिळून आणि खूपच मस्त आत्मभान येऊन समाज लगोलग सुधारणार असतो. या उपक्रमातील सर्वात आवडता, लोकप्रिय आणि भरपूर चालणारा उपक्रम म्हणजे ‘स्त्रियांनी बनवलेल्या चित्रपटांचे महोत्सव’ भरवणे. म्हणजे नेमके ते काय करतात आणि कशाला करतात, हे मला गेली अनेक वर्षे झाली- कळलेले नाही.

चित्रपट एक तर चांगला असतो किंवा वाईट असतो. तो स्त्रीने बनवलेला असो, पुरुषाने बनवलेला असो किंवा एखाद्या वडाच्या झाडाने बनवलेला असो. तो चित्रपट अनुभव कोणता देतो आणि त्याची ताकद काय आहे, ही दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांच्या गुणांवर आणि त्यांच्या कालसुसंगत दृष्टीवर ठरणारी गोष्ट आहे. मी खूप लहान असल्यापासून भारतात सई परांजपे चित्रपट बनवत होत्या. ते चित्रपट त्या ‘मी स्त्री दिग्दर्शिका आहे’ या लाडाकोडाने बनवत नव्हत्या. त्या भारतातील एक महत्त्वाच्या आणि बुद्धिमान दिग्दर्शिका आहेत. त्यांच्या कामाचा वेग, सातत्य आणि झपाटा पाहिला की त्यांना कोणत्याही कप्प्यात आपण बसवू शकणार नाही, हे आपल्या लक्षात यायला हवे. अपर्णा सेन यांचा पहिला चित्रपट ‘३६ चौरंगी लेन’ हा काळाला पुरून उरला आहे तो त्या स्त्री-दिग्दर्शक आहेत म्हणून नाही, तर त्या चांगला चित्रपट बनवू शकल्या म्हणून! त्यापुढील बनवलेल्या चित्रपटांत त्यांनी सुरुवातीला तयार केलेली आश्वासकता कधीही मिटवलेली नाही. मीरा नायर, दीपा मेहता या बायका ‘स्त्रियांनी बनवलेल्या चित्रपट महोत्सवात’ शोभून दिसाव्यात म्हणून काम करीत नाहीत. कामाला आणि कलात्मकतेला लैंगिकता नसते. तिथे फक्त माणूस काम करत असतो. चित्रपट बनवताना व्यक्तीचे आयुष्य इतके ताणाचे आणि गुंतागुंतीचे बनून जाते, की त्या व्यक्तीचा एक प्राणी बनतो. स्त्री-पुरुष असले भेद उरत नाहीत.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

पण जुन्या पद्धतीने सामाजिक कामाकडे बघण्याची एक सत्तर-ऐंशी सालातील NGO दृष्टी बाळगून सगळ्या गोष्टींना gender  politics चा भाग बनवणाऱ्या आक्रस्ताळ्या संस्था जेव्हा असली विभागणी करून स्त्रीला उजळवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा काळाचे भान त्या संस्था चालवणाऱ्या माणसांच्या हातून सुटून गेले आहे, हे आपल्या लक्षात येते. या गोष्टीचा तोटा हा होतो, की स्त्री ही कुणीतरी लेचीपेची वस्तू आहे, दुबळी आहे, आणि तिने इतक्या प्रतिकूल, लाचार परिस्थितीतसुद्धा कसा चित्रपट बनवला पाहा! असा काहीतरी चुकीचा संदेश जाऊन आपण फार हास्यास्पद वातावरण तयार करतो. माझ्या आजूबाजूला चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या बायकांना सामाजिक संस्थांमधील लोक जर भेटले तर ते संस्था बंद करून काशीला जातील, अशा त्या हुशार, डामरट वाघिणी आहेत. असले महोत्सव भरवून आपण चित्रपटाचे आणि त्यात काम करणाऱ्या माणसांचे फार सोपे स्वरूप मांडून गोंधळ तयार करतो.

स्त्रियांचे चित्रपट महोत्सव भरवणाऱ्या संस्थांना खरे तर स्त्रीवादी विचारसरणीचे चित्रपट महोत्सव भरवायचे असतात. पण ज्याप्रमाणे घरातील तुपालोण्याच्या आणि सुक्या मेव्याच्या कपाटाची किल्ली एखाद्या गंभीर आजीबाईकडेच असते, त्याप्रमाणे स्त्रीवाद हा फक्त स्त्रियांकडेच असतो अशी काहीतरी समजूत असल्याचे आपल्याला दिसते. या महोत्सवात नव्या विचारसरणीची मांडणी केलेल्या पुरुष दिग्दर्शकाचे चित्रपट का नसतात? माझ्या सर्व उमेदवारीच्या काळात मी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीसोबत काम करीत असल्याने मला नेहमी हे प्रश्न सतावत राहिले. याचे कारण त्या दिग्दर्शकांनी बनवलेला चित्रपट कोणत्याही लेबलाशिवाय असलेला अत्यंत सशक्त भारतीय चित्रपट होता. तरीही वारंवार सामाजिक काम करणाऱ्या संस्था केवळ लेबले लावायला तो चित्रपट खूप वापरत. माझ्या भोवती बनवला जाणारा चित्रपट दोन दिग्दर्शकांचा होता. मग gender politics  ची वेळ आली की त्याचे दोन तुकडे करून तुम्ही पाहत राहणार का? स्त्री आणि स्त्रीवाद या दोन संपूर्ण वेगळ्या गोष्टी असूनही आमच्या चित्रपटातील स्त्रीला फार नको इतके चढवून मोठे केले जात होते. आणि जवळजवळ पुरुषविरोधी वातावरण असावे अशा आवेशात त्याचे सामाजिक काम करणाऱ्या लोकांकडून विश्लेषण केले जायचे तेव्हा मी खूप अस्वस्थ होत असे.

रंगभूमी आणि साहित्य क्षेत्रात स्त्रीवादी रिझव्‍‌र्ह जागा मागून झाल्या, ते एक वेळ ठीक होते. त्यामुळे अनेक बायकांनी भसाभस आत्मचरित्रे लिहिली- जी स्वत:विषयी कमी आणि नवऱ्याविषयी पुष्कळ होती. बहिणाबाई आणि लक्ष्मीबाई टिळक यांचे काही कारण नसताना दाखले देत खूप उसासे टाकणारे साहित्य निर्माण करून झाले. ज्या बायकांना आतल्या जाळाने लिहायचे होते त्या लेबलांची वाट न पाहता लेबलांच्या आधी आणि नंतरही लिहितच राहिल्या. साहित्यात करायला काही सामाजिक उरले नाही. कारण लिहिणारे लिहितात आणि न लिहिणारे लिहीत नाहीत, इतका सोपा प्रकार असतो. चित्रपट मात्र कुणीही उठून करू शकतो. त्यामुळे ऐंशी-नव्वदच्या दशकांत सर्व संस्थांचा सामाजिक विचारांचा प्रवाह चित्रपट क्षेत्राच्या वेशीबाहेर येऊन थडकला. अशा काळात एक-दोन चित्रपट करून सोडून देणाऱ्या अनेक स्त्रिया तयार झाल्या. कारण त्या स्त्रिया चित्रपटाने नाही, तर ‘मी चित्रपट बनवते’ या जाणिवेनेच भारावून सद्गदित होत गेल्या. अनेक माणसांकडे सांगण्यासारखी एकच गोष्ट असते. ती सांगून झाली की मग करायला काही उरत नाही. सोप्या सामाजिक जाणिवेने तुम्ही चित्रपटासारख्या बहुपेडी आणि ताकदवान माध्यमाकडे पाहिलेत तर चार लिंबे आणायला ट्रक घेऊन मंडईत गेल्यासारखे होते. चित्रपटाचे काम हे प्रश्न सोडवण्याचे नसून, भरपूर नवे प्रश्न आणि गोंधळ निर्माण करण्याचे आहे. ते योग्य संदेश द्यायचे आणि समाजजाणिवेचे माध्यम अजिबात नाही. ऐंशीच्या दशकात सरकारी पैसा हा सामाजिक कलात्मकतेसाठी बक्कळ उपलब्ध असल्याने अनेक ‘वन टायमर’ लोक या काळात चित्रपट दिग्दर्शक होऊन गेले.

कोणत्याही जातीपलीकडे आणि लिंगभेदापलीकडे काम करणारे चित्रपट क्षेत्र हे एक क्षेत्र असे आहे, जिथे अनेक स्त्रिया फार पूर्वीपासून अतिशय धाडसाने एकटय़ा काम करून, पैसे कमावून कुटुंबाचा गाडा ओढत आल्या आहेत. इथे सामाजिक विचारसरणीचे कधीही काम नव्हते. माझ्या लहानपणीपासून एखादी स्त्री चित्रपट क्षेत्रात काही काम करते आहे याचे अप्रूप आम्हाला कधीही वाटले नाही- इतक्या मोठय़ा प्रमाणत इथे स्त्रिया काम करतात. नुसत्या नटय़ा, गायिका, नृत्य-दिग्दर्शिका किंवा वेशभूषाकार म्हणूनच नाही. पूर्वी स्त्रिया फक्त ही चारच कामे करायच्या; पण आता असेही उरलेले नाही. माझ्यासोबत अनेक मुली संकलक, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, निर्मिती अशा अनेक पातळ्यांवर उत्तम काम करतात. गेली तीन वर्षे माझ्या युनिटची प्रमुख परिणीता भुरे नावाची मराठी मुलगी आहे. अश्विनी परांजपे, मोनिशा बलदवा, सुचित्रा साठे या आजच्या पिढीतल्या मुली केवळ कुणी ओळखीचे या क्षेत्रात आहे, किंवा नवरा निर्माता वा दिग्दर्शक आहे म्हणून इथे आलेल्या नाहीत. त्या स्वतंत्र मुली आहेत. या मुलींच्या खापरपणजीच्या पिढीत शोभना समर्थ, शांता आपटे, दुर्गा खोटे या ताकदवान बायका होत्या. स्त्रीवाद दूध पीत होता तेव्हा या बायका फार मोठय़ा स्टार्स होत्या. त्यामुळे एखादी स्त्री काही काम करते आहे याचे अप्रूप निदान महाराष्ट्रात कुणालाही वाटू नये. कोणत्याही जातीचेही अप्रूप आत्ता आत्तापर्यंत चित्रपट क्षेत्राला नव्हते.

पण महाराष्ट्रातील स्त्रीवाद ही गोष्ट अप्रूपे आणि कौतुके यांच्यावर चालते. त्या स्त्रीवादाला नवीन नवीन Brand Ambassador लागतात. खरे काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या बायका ते बनायला तयार नसतात. म्हणून मग सामाजिक संस्था असली स्त्री- दिग्दर्शकांचा महोत्सवरूपी पुरोगामी हळदीकुंकवे आजच्या काळात करताना दिसतात तेव्हा हसावे की रडावे, हे कळत नाही.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com