मला वारंवार पडणाऱ्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न म्हणजे मी घर बंद करून अनेक दिवस बाहेर गेलो आहे. घरात एक मांजर आहे हे विसरून गेलो आहे. अनेक दिवसांनी मी परत येतो आणि घराचे कुलूप उघडतो तेव्हा ते भुकेलेले आणि चवताळलेले उग्र मांजर माझ्यावर उडी मारते आणि नखांनी मला फाडून टाकते.

मी सकाळी खूप लवकर उठून सेटवर चालत चालत जातो. मी राहत आहे त्या हॉटेलपासून चित्रपटाचा सेट चालत पंधरा-वीस मिनिटे अंतरावर आहे. शनिवारवाडय़ाजवळील एका गल्लीत. शहराच्या या जुन्या भागात सकाळी शांतपणे चालण्याचे प्रसंग आता खूप कमी येतात. शहराच्या या भागात जुनी, तीक्ष्ण मते आणि बोथट झालेले जुने अनुभव आहेत. माझ्या आजूबाजूने मधेच आमच्या चित्रीकरणाच्या युनिटमधील माणसे, नटमंडळी गाडय़ांमधून जाताना मला त्यांच्यासोबत ये म्हणतात. मी रोज नाही म्हणतो आणि शांतपणे चालत राहतो.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
How To Made Homemade Crispy Potato Wafers
१ किलो बटाटे वापरून घरच्याघरी बनवा खमंग ‘बटाटा वेफर्स’; ३ वर्ष खराब होणार नाहीत
balmaifal story, kids, speak truth, taking care, things, plants, breaking is easy, making is hard, accept fault
बालमैफल: तोडणं सोपं, जोडणं अवघड

शहरे तुम्हाला रागावू देतात, लांब जाऊ  देतात आणि परतही येऊ  देतात. ती तुम्हाला मातीचे ऋण वगैरे फेडायला लावत नाहीत. कारण इथली समाजव्यवस्था मुख्यत: आर्थिक कारणाने आकाराला आलेली असते. अनेक माणसे जी पूर्वजांच्या कर्तृत्वामुळे किंवा नवऱ्याच्या कर्तृत्वाने इथे राहत आणि जगत असतात, ती उगाच शहरी वास्तव्याला चिकट आठवणींच्या भावना जोडतात. पण खरे तसे नसते. तुम्ही शहरात पोटापाण्यासाठी राहता. काम झाले की जाता. किती पिढय़ा राहता, इतकाच प्रश्न आहे. आमच्या शहरात बाबासाहेब पुरंदरे आणि मंगेश तेंडुलकर सोडले तर सगळे काही बदलून गेलेले आहे. ते दोघे माझ्या जन्माच्या आधी होते तसेच आहेत. त्या दोघांमुळे काळ स्थिर असल्याची एक सिगरेट ओढल्यासारखी किक् मिळते. पण ती निघूनही जाते.

सेटवर मी वेळेपेक्षा लवकर पोचलेले कुणाला फारसे आवडत नाही. कारण सकाळच्या पारी करता येणारे थोडे अळमटळम् लोकांना करता येत नाही. मी पोचायच्या आधी निवांत बिस्किटे चहात बुडवून तो पिता येतो. पण मी पोचलो की अचानक सेटवर धावपळ आणि घाई सुरू झाल्याचा भास तयार केला जातो. पण सगळे जण मनातल्या मनात- ‘आला का हा लवकर? स्वत:ही निवांत झोपत नाही आणि आम्हालाही जरा तासभर जास्त पडू देत नाही!’ असे भाव असतात. मी सध्या बनवतो आहे तो चित्रपट ही एक फूड फिल्म आहे. मराठी पदार्थाची चव आणि महती साजरा करणारा चित्रपट. तसे असल्याने सकाळी सहालाच सेटवर स्वयंपाकी, स्वयंपाक सल्लागार आणि जेवणाचे सजावटकार यांची धांदल सुरू झालेली असते. दुसरीकडे मुख्य सेटवर प्रकाशयोजना सुरू होत असते. मी सेटवर पोचण्याआधी पहिल्यांदा तिथे शिरतो आणि तिथे बनत असलेल्या गरम गरम कोथिंबीर वडीचा किंवा साबुदाणा खिचडीचा ताबा घेऊन मग कॅमेऱ्यापाशी जातो.

चित्रपट आपल्या शहरात तयार होत असताना शहराचे छायाचित्र काढले जात असते याचे मला फार बरे वाटते. अमुक अमुक काळात हे शहर कसे दिसत होते, याचा दस्तावेज चित्रपटाच्या रूपाने तयार होत असतो. त्यामुळे जे लोक आम्हाला त्यांच्या घरात किंवा परिसरात चित्रीकरण करायला परवानगी देतात त्यांच्याविषयी माझ्या मनात एक प्रकारची ऋजुता तयार होते. माझे माझ्या शहराविषयीचे आकर्षण व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मी माझ्या चित्रपटाच्या कथा तिथे घडणाऱ्या लिहीत आलो आहे.

मला देवानंद किंवा गुरुदत्त यांच्या कृष्णधवल चित्रपटांतील किंवा ‘वेक अप् सिद’ या नव्या चित्रपटातील मुंबई आवडते. ‘रोमन हॉलिडे’मधील रोम शहर आवडते. ख्रिस्तोफ केस्लोवस्कीच्या ‘ब्लू’ या चित्रपटात दिसणारे पॅरिस आवडते. ‘उडान’ या अप्रतिम ताज्या चित्रपटात साकारलेले जमशेदपूर आवडते. माझे शहर सातत्याने कॅमेऱ्यात पकडून ठेवावे यासाठी मी सतत प्रयत्न करत असतो. ते करताना मी माझे आणि माझ्या शहराचे नाते तपासून पाहत असतो. माझ्या शहराविषयी राग-लोभ व्यक्त करीत असतो.

माझे दोन्ही कलाकार- सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर हे माझ्याप्रमाणे पुण्यात जन्मलेले आणि वाढलेले आहेत. आम्ही तिघेही आता इथे राहत नाही. या चित्रीकरणाच्या निमित्ताने आम्ही जुन्या पुण्यातील गल्लीबोळांमध्ये सतत फिरतो आहोत आणि बदललेल्या शहराविषयी एकमेकांशी सतत बोलत आहोत. आम्ही लहानपणी खायचो ते पदार्थ चाखून पाहायला सकाळी लवकर आणि रात्री उशिरा शहरात अनेक जागी फेरफटका मारत आहोत. आमच्या तिघांच्याही आया रोज सेटवर भरभरून जेवायचे डबे पाठवत राहतात. आम्ही तिघेही सातत्याने बदललेले शहर आणि अजिबात न बदललेले आमचे आई-वडील या विषयावर बोलत राहतो. आमच्या तिघांचेही अनुभव वेगवेगळ्या काळातील असले तरी कितीतरी साम्य घेऊन एकत्र येतात. आम्ही तिघांनी सायकली भाडय़ाने घेऊन रस्त्यांवर त्या चालवायला शिकलो त्याच्या त्यावेळच्या किमती पुढीलप्रमाणे होत्या..

सोनाली :  तासाला पन्नास पैसे. दिवसाला पाच रुपये.

सचिन : तासाला एक रुपया. दिवसाला आठ रुपये.

सिद्धार्थ : तासाला पाच रुपये. दिवसाला वीस रुपये.

आपल्या लहानपणी असलेली वास्तुरचना, परिसर, झाडे आणि माणसे बदलू नयेत अशी प्रत्येक मनुष्याची सोपी मागणी असते. पण काळ आपले म्हणणे ऐकत नाही. ज्या माणसांचे आई-वडील फार जास्त काळ एकाच जागी एकाच शहरात टिकून राहतात, त्या माणसांना बदलत्या काळाविषयी भीती आणि तक्रार मनात उमटत राहते. आपले जन्मदाते आई-वडील आणि आपला परिसर हे आपल्या मनात भावनेने प्रचंड गुंतागुंतीने हातात हात घालून चालत असतात. या तिन्हीपैकी काहीच बदलू नये, ही आपली सुखाची कल्पना ठरते. पौर्वात्य देशांत ही मागणी फारच मोठी बनते, कारण नव्या काळातील छोटय़ा कुटुंबव्यवस्थेमुळे स्त्रिया आपल्या मुलांना पटकन् सुटे करून टाकत नाहीत. धर्म, कर्मकांडे, आठवणी, परावलंबित्व, प्रेम अशी अनेक कारणे खोदून काढून त्या तरुण मुलामुलींना शहराशी, घराशी आणि स्वत:शी बांधून ठेवतात. कारण जन्म दिलेली मुले मोठी झाली की अनेक स्त्रियांना बेकारी येते. अनेक वेळा अशी जन्मदाती माणसे काळाच्या पडद्याआड गेली की मगच आपल्याला बदलत्या काळाचे भान येते आणि आपण कुठे उभे आहोत, हे लक्षात येते. अनेक भारतीय नागरिकांना आपल्या मूळ गावाचा भावनेच्या भरात विचार करताना या गोष्टी लक्षात येत नाहीत. आपली आपल्या जन्मगावांची स्मृतिचित्रे आपण स्वत: काढलेली नसून आपल्या आयांनी आपल्या हातातून आपली बुद्धी खेचून घेऊन पटापट काढलेली असतात आणि आपल्या नजरेसमोर टांगून ठेवलेली असतात. जन्मदाते विरून गेले कीमगच आपले आणि आपल्या जन्मगावाचे नाते स्थिरावते आणि पक्के स्वरूप धारण करते. काही स्थानिक आणि स्थलांतर अप्रिय असणाऱ्या माणसांना हा अनुभव यायला पन्नाशी किंवा साठी उजाडते. काही तरुणपणी स्थलांतर केलेल्या माणसांना हा अनुभव सुदैवाने फार लवकर येतो.

सकाळी सेटवर चालत जाताना मला अनेक जुन्या देवळांत सकाळी चालू असलेली भजने ऐकू येतात. हा आवाज सर्व जुन्या पेठांमधून माझ्यासोबत प्रवास करीत राहतो. संतोष बेकरी आणि हिंदुस्थान बेकरीसमोर गर्दी असतेच. हास्य क्लबात जाऊन रूपालीवर इडलीसाठी आलेले लोक दिसतात. पण या सगळ्यात लक्षात येतात ते शहरात गेल्या दहा वर्षांच्या काळात स्थलांतरित झालेले लोक. ही माणसे शहरातील मूळ माणसांसारखे वागण्याचा अट्टहास करतात आणि सोप्या सोप्या गोष्टीत कमी पडतात. कोणत्याही शहरात स्थानिक होण्यासाठी दोन पिढय़ा जाव्या लागतात, हे जगभरचे सोपे सत्य आहे. आपण आपली चालरीत सांभाळून राहणे आणि मिसळून जाण्यासाठी स्थानिक लोकांसारखे वागणे, यात नव्याने राहायला आलेल्या लोकांची खूप तारांबळ उडताना सकाळी पुण्यात दिसते.

परवा चित्रपटात एक जेवणाचा मोठा प्रसंग आम्ही चित्रित करत होतो. मी सेटवर चाललेली तयारी पाहायला मधेच डोकावलो तेव्हा पाने मांडली जात होती. उदबत्त्या बटाटय़ात खोचल्या जात होत्या. प्रकाशयोजना चालू होती. मला अचानक लक्षात आले की, समोर ताटे नसून थाळ्या ठेवल्या आहेत. त्यात अन्न वाढले जात आहे. ताटांना बाहेर आलेली पातळ कड असते. थाळ्यांना ती नसते. मी काम थांबवायला सांगितले आणि ताटांची मागणी केली तेव्हा पुन्हा सगळ्यांचे चेहरे कोरे झाले.

एकदा रस्त्यावर मी आणि सोनाली सकाळी उभे असताना एक खूप म्हाताऱ्या आजी आल्या आणि मला म्हणाल्या की, ‘तुमचे काम करून संपले की माझे एक काम करा. त्या पलीकडच्या मंदिरात बारा ज्योतिर्लिगे आहेत. मी किती जणांना सांगते की, जाऊन त्याचे फोटो काढा; पण माझे कुणी ऐकत नाही. तुमच्या सिनेमात तिथे जाऊन फक्त एकदा ते मंदिर दाखवाल का? मला ते मंदिर एकदा मोठय़ा पडद्यावर पाहायचे आहे. जमले तर इतके कराच.’