05 August 2020

News Flash

ब्लड ऑन द डान्स फ्लोर

मुंबईतले घर. दुपारचे शांत अंधारलेले.

मुंबईतले घर. दुपारचे शांत अंधारलेले. घरातली काटेकोर शिस्त आणि नीटनेटकेपणा तपासणारा जिचा वावर असतो ती मोठी काकू बाहेर गेली आहे. ती बाहेर गेली असली तरी तिच्या परफ्युमचा वास घरात मंदपणे रेंगाळतो आहे. जणू तो वास हे सांगतो आहे की, मी नसले तरी माझे घरात लक्ष आहे. धाकटा चुलतभाऊ  शाळेत गेला आहे आणि मोठी बहीण बाथरूममध्ये आहे. तिला खूप वेळ लागतो तयार व्हायला. मी फ्रिजमधील गारेगार पाणी घोटाघोटाने पीत माझ्यासमोरील आर्चीजच्या इंग्रजी कॉमिक्समधील ओळी सावकाश वाचायचा प्रयत्न करतोय. बाथरूमचे दार आणि बहिणीच्या आतील खोलीचे दार यांत दोनच पावलांचे अंधारलेले अंतर आहे. बाथरूम उघडते आणि बाथरूममधून बाहेर आलेली बहीण तिच्या खोलीचे दार उघडून दोन पावलांमध्ये आतमध्ये लुप्त होते. बहीण दिसत नाही. एक रंगीत टॉवेलचे गाठोडे इकडून तिकडे पटकन् पळत गेलेले दिसते. तिच्यामागे बाथरूममधून येणारी उष्ण वाफ घरातील शांततेत सावकाश पसरत विरून जाते. ती दार लावून घेते आणि काही क्षणांत दारामागून तो आवाज येतो. ‘धाड धाड धाड’ असा बंद गोलाकार आवाज. घरातील काचेच्या नाजूक गोष्टी थरथरतील असा आवाज. बहिणीच्या खोलीचे दार धपापते आहे. थरथरते आहे. त्या दारावर हात ठेवला तर हृदय धडधडताना जाणवते तशी धडधड जाणवते आहे. मी गेल्या उन्हाळ्यात इथे आलो होतो तेव्हा ती साबणाच्या फुग्यासारखी इंग्रजी विव्हळणारी गाणी ऐकत होती. आता या उन्हाळ्यात ती हे काय ऐकत आहे? घर ढासळून खाली येईल अशी ऊर्जा असलेले हे संगीत घरात कधी आले? असे काय घडले, की इतके रागावलेले आणि उसळ्या मारणारे संगीत आता तिला ऐकावेसे वाटते आहे? ती आई-वडिलांवर चिडली आहे का? तिला कुणी काही रागावून बोलले आहे का? माझी हसरी, प्रेमळ बहीण. माझे हवे ते लाड पुरवणारी. ती अचानक या वयात दूर गेल्यासारखी वाटते आहे. बराच वेळ ती खोलीचे दार लावून तासन् तास तयार होत बसते. हे कसले संगीत ती ऐकते आहे? आणि मी किती वेळ असा तिच्या दरवाजाबाहेर उभा राहिलो आहे? मला ते संगीत नीट ऐकू येत नाहीये. पण माझा डावा पाय थिरकू लागला आहे.. माझ्या नकळत. मला हे दार उघडायला हवे आहे आत्ताच्या आत्ता. आणि मला ते सगळे ऐकायचे आहे- जे ती ऐकते आहे.

दुपारी चार वाजता माझी काकू आणि माझा भाऊ  मिल्कमेड घालून केलेले लाडू चहासोबत खायला बनवतात आणि बहिणीच्या बंद दारावर टकटक होते. ते दार शेवटी उघडते. मुंबईतल्या तरुण मुलांना घरात आपला खासगीपणा ज्या शिताफीने कमवावा लागतो त्या हुशार शिताफीने तो कमावून माझी बहीण आता अभ्यासाची पुस्तके उघडून ती वाचत बसण्याचे नाटक करते आहे. ती अभ्यासात ढ आहे. तरीही किंवा त्यामुळेच ती मला आवडते. कारण माझ्या ओळखीच्या अभ्यासातील हुशार मुलींना जे करता येत नाही ते सगळे तिला करता येते. ती उंच आहे. तिला सुंदर कपडे आणि विचित्र रंगीत बूट घालून आत्मविश्वासाने कसे वावरायचे याची जाण आहे. ती उद्धट आहे. कुणालाही घाबरत नाही. आणि ती खरे बोलणारी आहे. तिला सायकलही चालवता येत नाही तरी ती मला आवडते. माझ्या आईने मला हे सांगितले आहे की, सुशीलात असलेले हे चार गुण गणितात शंभर मार्कस् मिळवण्यापेक्षा केव्हाही चांगले आहेत. तिची लिपस्टिक, परफ्युम्स, भिंतीवरची एल्विस प्रिस्लेची पोस्टर्स पाहत पाहत मी एका जागी थबकतो. मला जी ऊर्जा हवी होती ती ऊर्जा, ती व्यक्ती मला दिसते. मी समोर पडलेली कॅसेट उचलून सावकाश नाव वाचू लागतो. मायकल.. मायकल.. मला आडनाव वाचायचा प्रयत्न करायला लागत नाही. माझा भाऊ  येऊन मला सांगतो.. मायकल जॅक्सन. थ्रिलर.

आपण कोण आहोत, हा प्रश्न पौगंडावस्थेत आपल्याला छळायला लागताना आपली संगीताची आवड नकळत तयार होत असते. संगीत आपली लैंगिक ऊर्जा प्रवाही बनवून रक्तात मिसळते आणि आपल्यासमोर आपल्या तशा रक्ताचा खरा रंग धरते. काही वर्षांनी स्वत:च्या खोलीचे दार बंद करून आतमध्ये मोठय़ांदा म्युझिक लावून बाकीचे आवाज बंद करायचे माझे वय लवकरच येणार होते. अनेक महिने नि वर्षे खोलीत असे म्युझिक लावून मी तासन् तास ढसाढसा रडणार होतो. बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येक लहान भावाला आणि बहिणीला दार लावून आतमध्ये आपला मोठा भाऊ  किंवा बहीण काय करतात, कसले संगीत ऐकतात याची उत्सुकता असते. मला उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या त्या दुपारी मायकल मिळाला. तेव्हा तो कृष्णवर्णीय तरुण, कोवळा मुलगा होता. पण तो लिंग, त्वचेचा रंग, वय या सगळ्याचे समाजमान्य भेद मोडून काढणार होता. आणि पुढील अनेक वर्षे माझ्या खोलीचे दार पुन्हा उघडेपर्यंत माझ्यासोबत माझ्या जवळ बसून राहणार होता. मला माझे संगीत त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मिळाले.

‘बीट ईट’ असे तो गाण्यातून ओरडून सांगत होता. पण मला शब्द आणि त्याचा अर्थ दोन्ही कळत नव्हते. म्युझिक व्हिडीओ आणि टळश् चे दमदार आगमन व्हायला पुष्कळ वेळ होता. समोर होत्या त्या स्टीरिओवर चालणाऱ्या ऑडिओ कॅसेट्स. त्यांची बारकाईने सजवलेली सुंदर कव्हर्स. ‘अ’ बाजू आणि ‘इ’ बाजू. जशी आपल्याला असते. शाळेत आणि जगासमोर असते ती ‘अ’ बाजू आणि बाथरूममध्ये किंवा खोलीचे दार लावल्यावर जिवंत होते ती ‘इ’ बाजू. घरातले मोठे भाऊ  आणि बहीण आपल्यासाठी जर काही आयुष्यात करत असतात ती एकच गोष्ट असते.. ती म्हणजे- ते आपल्या आयुष्यात निवडण्यासाठी पुढे जाऊन ताजे संगीत आणून आपल्यासमोर ओतत असतात. माझ्या बहिणीने मला टख दिला; जसा तिने मला तिचा उद्धटपणा दिला, असे घरात आता सगळे म्हणतात. वर्षांनुवर्षे ती पुढे जात राहिली आणि माझ्यासमोर पुढचे संगीत आणून ओतत राहिली. मी आयुष्यातील किती वर्षे तिच्या आवडीनिवडीची कॉपी करण्यात घालवली असतील याची कल्पना मला आता आली तरी हसू येते.

माझे लहानपणातून तारुण्यात येणे सोपे नव्हते. तापदायक आणि भगभगीत उष्ण वर्षांचा तो फार अवघड काळ नको त्या लहानपणी मला भोगावा लागला आणि माझे मन आणि शरीर होरपळून, निळे पडून पुन्हा शांत, गव्हाळ झाले. आणि त्वचेवर सावकाश केस उगवू लागले तेव्हा मला लक्षात आले, की या सगळ्या काळात आपल्यासोबत आपल्याला आतून समजून घेणारे कुणीही उरले नाही; पण एकटा मायकल होता. मोठय़ा बहिणीने पाठवलेला बॉडीगार्ड असावा तसा तो सोबत उभा होता. आपल्या शरीरातून लालबुंद रक्त बाहेर पडेल कीपांढरा स्राव? आपण कुणाला स्पर्श केला तर कोण काय म्हणेल? आपल्याला जवळ घेणारे, समजून घेणारे कोण असेल? हे प्रश्न मनात साचून गोंधळाच्या चिळकांडय़ा उडत होत्या तेव्हा मायकल एकटा सोबत होता. मला तेव्हा महेश एलकुंचवार भेटले नव्हते, तसेच मला बॉब डिलनही भेटायला वेळ होता. मला जेफ डायरसारखा ऊर्जा देणारा लेखक भेटायला दशकभराचा वेळ होता. त्यावेळी भाषा कळत नसूनही हा बॉडीगार्ड प्रेमाने माझ्यासोबत बंद दाराआड किती वर्षे राहिला याची मी मोजदाद करू शकत नाही. तो माझा लाडका आहे, गेला त्या दिवशी मी दार बंद करून रडलो. जगभरातील अनेक मुले आणि मुलीही रडल्या असणार याची मला खात्री आहे. त्याच्या त्वचेचा रंग बदलत गेला आणि शरीरावर तो करत असलेले प्रयोग थांबता थांबेनात तेव्हा त्याच्या कामाचा सुवर्णकाळ चालू होता. एखाद्या राक्षसाची असावी तशी त्याची ऊर्जा होती. मला हळूहळू त्याची गाणी कळू लागली. त्यातले वैयक्तिक आणि राजकीय संदर्भ समजू लागले. रागाच्या आणि क्रोधाच्या धबधब्याचे रूपांतर गाण्यात करायचे असते हे त्याने मला सांगितले. आणि स्वत:च्या शरीर आणि मनाविषयी दाटून आलेली लाज त्याने कायम पुसून काढली.

मी आजही शांत, रिकामा वेळ असला की त्याचे तीस वर्षांत रेकॉर्ड केलेले अनेक व्हिडीओज् पाहत बसतो. एखादी कादंबरी किंवा कविता वाचल्यासारखे.

सचिन कुंडलकर

kundalkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2017 1:33 am

Web Title: michael jackson blood on the dance floor
Next Stories
1 गृहिणी  (भाग २)
2 गृहिणी
3 समाजाचे ऋण, रिक्षावाला मुन्ना आणि नोकरदार मी
Just Now!
X