गेल्या शतकातील महायुद्धे होण्याआधी माणसे ज्या मोकळेपणाने एका देशातून दुसऱ्या, तिथून तिसऱ्या देशात प्रवास करीत राहत, त्याचे त्याला फार आकर्षण आहे. ते खरे प्रवास होते. आपण व्हिसाने घालून दिलेल्या तुटपुंज्या मुदतीत थोडीशी ये-जा करतो. प्रवास हे महिनोन् महिने चालायला हवेत. ते आखलेले नसावेत.

प्रचंड मोठय़ा जगात अनेक देशांमध्ये माणसे इकडून तिकडे फिरत असत. सत्ताविस्तारासाठी. लढण्यासाठी. व्यापारासाठी. संशोधनासाठी. घर सोडून बाहेर पडलेली माणसे महिनोन् महिने आणि वष्रे घरी परतत नसत. आणि हे घडत होते विमाने नसताना. संगणक आणि संपर्कव्यवस्था नसताना.

parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

काळाच्या यंत्रात बसून मागे जाता आले तर एकोणिसाव्या शतकात जाऊन अनेक देश पाहायला त्याला आवडेल. नुकतीच त्याने अमिताव घोष यांची ब्रिटिशांच्या चीनसोबतच्या अफूच्या व्यापाराच्या भोवती गुंफलेली तीन कादंबऱ्यांची विशाल आणि सचित्र मालिका वाचून काढली, तेव्हा त्याचे मन अस्वस्थ झाले. स्वतच्या त्रोटक आणि कृश प्रवास अनुभवांची जाणीव होऊन त्याला खजील व्हायला झाले. जाऊ त्या देशात स्त्री-पुरुषांवर प्रेम करीत, मारामाऱ्या करीत, अनेक मुले, अनेक घरे जन्माला घालत शांतपणे पुढे पुढे सरकता यायला हवे. मेलेले घोडे मागे पुरत पुढे जायला हवे. तो मागे इस्तंबूलला गेला होता तेव्हा त्याला भारतातून खुष्कीच्या मार्गाने रेशीम घेऊन तिथल्या बाजारपेठेत आलेले दोन शतकांपूर्वीचे व्यापारी डोळ्यांसमोर तरळून गेले होते.

अठराव्या-एकोणिसाव्या शतकातील प्रवाशांइतके व्यापक जगणे जमले नाही तरी जर्मन चित्रपट दिग्दर्शक वर्नर हेझरेगने १९७४ साली केले तितके तरी करायची आपल्यात ऊर्जा आणि प्रेमाची ताकद हवी. तो म्युनिकहून पॅरिसला चालत गेला होता.

‘‘At the end of November 1974, a friend from Paris called and told me that Lotte Eisner was seriously ill and would probably die. I said that this must not be, not at this time, German cinema could not do without her now, we would not permit her death. I took a jacket, a compass, and a duffel bag with the necessities. My boots were so solid and new that I had confidence in them. I set off on the most direct route to Paris, in full faith, believing that she would stay alive if I came on foot. Besides, I wanted to be alone with myself. What I wrote along the way was not intended for readers.’’

हेझरेगच्या डायरीत लिहिलेले हे प्रवासवर्णन त्याने जेव्हा वाचले होते तेव्हा तो तेवीस वर्षांचा मुलगा होता. सिनेमाचा अभ्यास करीत होता. ‘आपण कुणावर इतके प्रेम करतो का?’ हे त्याने स्वतला निक्षून विचारले होते. ‘प्रेमाची गोष्ट राहू दे; आपल्याला जे काही वाटते आहे त्याबद्दल आपल्या स्वतला इतकी पक्की खात्री आहे का?’ असा प्रश्न त्याने स्वत:ला पंचविसाव्या वर्षी विचारला होता. त्याचे उत्तर ‘नाही’ असे आल्यावर तो आतून हादरून गेला होता. आपल्याला जे वाटते त्याबद्दल आपल्याला खात्री नसणे ही फार भयंकर गोष्ट आहे. ही गोष्ट बदलायला हवी. आणि त्यासाठी उठून घराबाहेर पडायला हवे.. एकटे राहायला हवे असे त्याने ठरवले आणि नकळत स्वत:च्या आयुष्याला आकार द्यायला सुरुवात केली. असे करताना थोडेफार काहीतरी त्याच्या हाती लागले. आणि बरेचसे इतके साधे आणि सपक होते, की त्याच्याच्याने साठवून ठेववेना. म्हणून ते सुटून गेले.

प्रवास करून परतताना त्याला आपल्या कामाचा आणि ज्ञानाचा त्रोटकपणा जाणवून जीवघेणे नराश्य येते. आपल्याला माहिती खूप आहे, पण ज्ञान नाही. प्रवासात पुस्तके विकत घेऊन तो मनाची ही तगमग शांत करतो. पुस्तक आपले होताना त्याला फार मनापासून आनंद होतो.

प्रवासात आपल्या शेजारी कोण येऊन बसेल याची शक्यता ही जगातल्या अनेक सुंदर आणि घाबरवून टाकणाऱ्या गोष्टींपकी एक आहे. तो सीटवर आधी जाऊन बसला तर तो केबिनमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे उत्सुकतेने किंवा भीतीने पाहतो. योग्य व्यक्ती प्रवासात शेजारी असेल तर प्रवास संपत नाही.. एकातून दुसरा सुरू होतो. चुरगळलेला सौम्य रंगाचा शर्ट घातलेला फ्रेंच मुलगा यावा असे वाटले तरी दर वेळी तसे घडतेच असे नाही. इस्त्री न करता कपडे घालणाऱ्या तरुण मुलांविषयी त्याला खात्री असते. त्यांच्या बुद्धीची आणि जाणिवेची चांगलीच खात्री असते. तसे होणार नसेल तर निदान एक ग्रामीण, सुंदर इटालियन मुलगी यावी आणि तिने ‘केरला आयुर्वेदा’ किंवा ‘नंदिता दास’ याविषयी आपल्याशी बोलावे. पण तसेही दर वेळी घडतेच असे नाही. लहान बाळ असलेली एखादी भारतीय बाई मात्र आपल्या शेजारी येऊन बसू नये एवढीच त्याची प्रार्थना असते. कारण लहान बाळे घेऊन विमानात फिरणाऱ्या भेदक आणि कर्कश्श भारतीय बायका त्याने अनेक वेळा पाहिल्या आहेत. ती रडकी बाळे परवडली; पण त्या बायका नकोत. आपण आपल्याला नाही, तर संपूर्ण भारतमातेलाच बाळ दिले आहे अशा थाटात त्या वावरत असतात. बारा- पंधरा महिन्यांपूर्वी पुरुषासोबत एका रात्री केलेली मज्जा विसरून त्या बायका झालेल्या बाळाला ‘देवाचा प्रसाद’ किंवा ‘वंशाचा दिवा’ असले काहीतरी पवित्र वगरे खुशाल मानून मोकळ्या होतात आणि आजूबाजूच्या लोकांना खूप त्रास देत फिरतात. स्वतचे नको इतके लाड करून घेतात. त्यांच्याइतके कंटाळवाणे विमान प्रवासात दुसरे काही नसते. अशा भारतीय बाया विमानात मिळणारी सॅण्डविचेस् नेहमी पिशवीत टाकतात, हे त्याने पाहिले आहे. हवाई सुंदऱ्यांचे सौंदर्य विमान जमिनीला टेकेपर्यंत या बायका संपवून टाकतात, इतकी कामे त्या त्यांना सांगतात.

विमान आकाशात असताना परतीच्या प्रवासात त्याला कधीच झोप येत नाही. तो लिहीत बसतो, वाचत बसतो किंवा सिनेमे पाहत वेळ काढतो. पण त्याचे डोके विचारांनी भरून गेलेले असते. परत गेल्यावर त्याला खूप काही करायचे असते. नव्याने सर्व काही सुरू करायचे असते. हे नेहमी होते. असेच वाटते. जे वाटते ते प्रत्यक्षात घडते का, हे त्याने तपासून पाहिलेले नाही. पण त्या वाटण्यामुळेच की काय, त्याला हे परतीचे प्रवास फार जवळचे वाटतात. एकटा माणूस त्याच्या आयुष्याला आकार देण्याच्या गोष्टी करतो तेव्हा ते खूप सोपे आणि हास्यास्पद असते. कारण तुमच्या आयुष्याला आकार देण्यापासून तुम्हाला थांबवणारे आजूबाजूला कोणीही नसते. मग तो विचार करतो की, मी या क्रांतिकारक क्षणाची वाट का पाहत बसलो? आधीच नवे वळण का नाही दिले? हा विचार करताना त्याला लक्षात येते, की त्याला नवीन काही करावेसे वाटते आहे ते प्रवासात त्याने पाहिलेल्या आणि स्पर्श केलेल्या गोष्टी आणि माणसांमुळे. त्याची नीतिमत्ता बदलली आहे. आणि ती जोवर बदलत नाही तोवर नवीन काही संपूर्णपणे सुरू होऊ शकत नाही. प्रवास तुमची नीतिमत्ता बदलवतो. ती सावकाशीने आणि नकळत होणारी गोष्ट आहे. बरे-वाईट, काळे-पांढरे, नतिक-अनतिक, श्लील-अश्लील अशा त्याच्या संस्कृतीने त्याला दिलेल्या अनावश्यक निर्णयप्रक्रियेपासून तो मोकळा होतो ते या प्रवासात. म्हणून तो दरवेळी उठून हिरीरीने प्रवासाला जातो. त्याला मिळालेली नवी त्वचा फार पटकन् जुनी आणि निबर होते. परदेशात त्याच्या ओठांना आणि अवयवांना लागलेले मीठ परत आल्यावर फार लवकर अळणी होते. आता त्याला चटक लागली आहे. कुठे जाण्याची नाही, तर जाऊन परत येण्याची. तो परत येण्यासाठी जातो. परत येण्यासाठी घर नसले तरी चालेल. कुणी वाट पाहत उभे नसले तरी चालेल. पण त्याला ओठांवरचे नवे मीठ घेऊन, अंगातली नवी रग घेऊन मुंबई विमानतळावर मोठय़ा आवेगात उतरायचे असते आणि धावपट्टीवरून शहराकडे वेगात धावत सुटायचे असते. विमान जमिनीवर आदळले की त्याचा आवेश संपू लागतो. कारण परतीचा प्रवास संपलेला असतो तिथे.

बाहेर सामान ओढत गेल्यावर घामट ओले शहर असते. त्याला अशा वेळी पुन्हा धावत जाऊन मिळेल त्या विमानात परत बसून ते जिथे नेईल तिथे जावेसे वाटते. त्याला परतण्याची भीती वाटते. परतीचे प्रवास आवडत असले, तरीही.

kundalkar@gmail.com