05 August 2020

News Flash

समाजाचे ऋण, रिक्षावाला मुन्ना आणि नोकरदार मी

शहरात राहून, कष्ट करून आयुष्य जगणाऱ्या पांढरपेशा माणसाचे कुणीही नसते.

समाज, सामाजिक, समाजोपयोगी अशा कोणत्याही विशेषणाने संपृक्त झालेल्या माणसाला काळानुसार जोखून त्या व्यक्तीचे वर्तमानातील मूल्यमापन करायची सवय भारतीय समाजाला नसते. याबाबतीत आपण शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील माणसांसारखे आहोत. थेट पाया पडायचे, नाव घेतले तर कान धरायचे आणि मगच नाव घ्यायचे. परंपरा आणि शैली यांना प्रश्न विचारायचे नाहीत. जे आहे तेच पुढे चालू ठेवण्यासाठी आपले शरीर आणि आपले मन कलेला उसने दिलेले आहे, या भावनेत शास्त्रीय संगीताच्या अनेक खुब्या शिकणारे विद्यार्थी जगत असतात. त्यातला एखाद् दुसराच प्रश्न विचारतो. बाकी सगळे आपल्या गुरूच्या चेहऱ्यापेक्षा जमिनीकडे पाहत बसलेले असतात. त्यांच्यात आणि सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांमध्ये आता जवळजवळ फरक उरलेला नाही, हे आपल्याला आजच्या काळातील निमूट चालणारे कार्यकत्रे आणि जुन्या पोथ्या पाठ करणारे विचारवंत पाहिले की लक्षात येते. विसंवाद हा नेहमी दुष्ट आणि सुष्ट यांच्यातच असायची गरज नाही. सुष्ट आणि सुष्ट यांच्यातसुद्धा विसंवाद असायला हवा. कारण त्या विसंवादातूनच अनेक प्रश्नांची उत्तरे दीर्घकाळात सापडतात. वयातील आणि पिढीतील अंतर आणि अनुभवातील कच्चेपणा या अशा विसंवादासाठी फार चांगल्या तऱ्हेने पूरक गोष्टी आहेत. त्याची जाणीव आपल्याला असायला हवी.

मी हे अनेकदा अनुभवले आहे की आपापल्या विचारवंत नेत्याबद्दल, लेखकाबद्दल, सामाजिक काम करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तीबद्दल कुणीही प्रश्न विचारून पाहिला की त्यांचे कार्यकत्रे भावनेचा उद्रेक करून सगळी सभा शांत करू शकतात. आपण ज्यांच्या विचारांचा अनुनय करीत आहोत ती सगळी विचारवंत मंडळी ही काही वर्षांपूर्वी विशीतील मुले-मुली होती आणि काहीतरी शोधण्यासाठी प्रचंड धडपडत होती हे आपल्या लक्षात येत नाही. प्रश्न विचारायला हवा. एकदा नाही तर अनेकदा प्रश्न विचारायला हवा. त्यासाठी मनामध्ये एक सुसंस्कृत उद्धटपणा हवा. विशीच्या पिढीच्या प्रत्येकाचे प्रश्न विचारणे हे काम आहे. त्याबाबतीत घाबरता कामा नये. तुम्ही आम्हाला हे जे अनेक वेळा सांगता त्याची काही कालसुसंगततेची कसोटी तुमच्याकडे आहे का? तुमची काम करायची, विरोध करायची आणि आंदोलने करायची पद्धत जुनी आणि निष्प्रभ होऊ शकते असे तुम्हाला वाटत नाही का? चळवळी आणि आंदोलनांचे सामाजिक मूल्यमापन करायची काही ताजी पद्धत तुम्ही अवलंबिली आहे का? असल्यास तिच्याबद्दल आम्हाला सांगाल का? तुम्ही तुमच्या वडील किंवा आजोबांमुळे या क्षेत्रात आलात, की तुम्हाला तुमची म्हणून एक स्वयंप्रेरणा होती? असल्यास ती काय होती? आपल्या आधीच्या पिढीच्या किंवा आपल्या घरातील ज्येष्ठ विचारवंत असलेल्या वडील किंवा आजोबा यांच्या भूमिकेला संपूर्ण विरोधी अशी तुमची कधी भूमिका तुमच्या विशीत होती का? की तुम्ही बालपणापासूनच वंचित समाजाच्या चिंतेतच लहानाचे मोठे झालात? प्रत्येक कार्यकर्त्यांने, प्रत्येक विद्यार्थ्यांने किंवा प्रत्येक नातवाने आणि नातीने भारावून न जाता, बुद्धी आणि सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून आपल्या गुरूला, आपल्या नेत्याला किंवा आपल्या परिसरातील सामाजिक विचारवंत म्हणून नावाजल्या जात असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला प्रश्न विचारून जागते ठेवायला हवे.

आपण आजच्या काळात विशीत किंवा तिशीत असू तर आपल्यापुढे प्रश्न उभा राहतो तो आपल्या तोंडावर गांधी फेकल्याचा. एका विशिष्ट काळात लहानाचे मोठे होऊन सामाजिक क्षेत्रात काम करणारी मोठी माणसे कोणत्याही क्षणी तुमच्या चेहऱ्यावर गांधी फेकून तुमचे तोंड बंद करू शकतात. पण आपण तसे होऊ न देता प्रश्न आणि प्रतिप्रश्न करत राहायला हवेत. गांधी फेकणारी माणसे वयाने नेहमी पन्नाशीच्या आसपास किंवा त्यापेक्षा वृद्ध असतात. ती नुसती वृद्ध नसतात, तर अनेक वेळा एकारलेली आणि तर्कटही असतात असे आपल्याला दिसून येईल. काही माणसे तर इतकी अडेलतट्ट असतात, की त्यांना िहसक म्हणायलासुद्धा हरकत नाही. कोणत्याही घटनेचे प्रमुख पाहुणे त्यांनीच होणे त्यांना अपेक्षित असते. आपण चौकातील दिशादर्शक आहोत आणि आपण नसलो तर वाहतूक बिघडेल असे त्यांना उगीचच वाटत असते. गांधी सगळेच वापरतात. स्त्रीमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, कृषी आणि ग्रामीण व्यवस्थापन क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्ती, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती तुम्हाला पटकन् असे म्हणतात की, ‘‘तू नको रे बाळा बोलूस, तू जाऊन आधी गांधी वाच.’’ आपण अशा वेळी तटस्थ राहून धावपळ करायची टाळायला हवी. ‘‘गांधी वगरे मी नंतर वाचतो, आधी तुम्ही मला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या,’’ असे म्हणायला शिकायला हवे. त्यासाठी अंगात सुसंस्कृत उद्धटपणा यायला हवा. आजच्या काळात फारच आवश्यक आहे ते. असा शांत आणि सुसंस्कृत उद्धटपणा नुसता गांधी तोंडावर फेकणाऱ्या माणसांच्याच बाबतीत करून चालणार नाही. आपल्याला सावरकर किंवा शिवाजीमहाराज यांच्याबाबतीत कुणी घरात किंवा समाजात प्रश्न विचारायला परवानगी नाकारली तर आपण ती आग्रहाने मिळवायला हवी आणि प्रश्न विचारायला हवेत. मला माझ्या आजच्या आयुष्याला चांगले वळण द्यायला आणि माझे आयुष्य भक्कम उभे करायला या तीन व्यक्तींनी सुचवलेल्या मार्गापेक्षा महाराष्ट्रात वेगळा मार्ग आहे की नाही? आपण आजच्या काळात समाज म्हणून या तीन विचारसरणी सोडून काही वेगळा विचार करू शकतो की नाही? आपले राजकीय पक्षसुद्धा या तीन बिंदूंमध्ये गोल गोल फिरत आहेत. आणि मला यापेक्षा काही वेगळे वाटत असेल तर मी हा देश किंवा हा समाज सोडून जायला हवे का? मला वेगळा विचार करायला आधीच्या या पिढय़ांनी काही पर्याय ठेवला आहे का? या विचारांनी विशीची पिढी अस्वस्थ होऊन त्यांच्या मनात प्रश्न पडायला लागणे आणि त्यांनी ते वरील तीन विचारसरणी घेऊन राजकीय नेतेपद आणि सामाजिक नेतृत्व अनुभवणाऱ्या व्यक्तींना विचारणे हे फार गरजेचे आहे.

आपण माहिती आणि तंत्रज्ञान स्वस्त आणि सोपेपणाने उपलब्ध असणाऱ्या काळात आहोत ते एकमेकांना बागेत भेळ खातानाचे फोटो पाठवण्यासाठी नाही. प्रश्न विचारायचा आणि आपल्या पिढीचे आपले मत मांडायचा आपल्याला हक्क आहे. आणि ते न विचारणे हे फार धोक्याचे आहे.

शहरात राहून, कष्ट करून आयुष्य जगणाऱ्या पांढरपेशा माणसाचे कुणीही नसते. त्याला काही वेळा सिनेमातील हीरो सोडून कुणाकडे पाहायची सोय नसते. कारण त्याच्या समाजातील राजकारणी संपन्न साखरेच्या ग्रामीण भागात सत्ता, संपत्ती आणि मते मिळवत असतात. दुसऱ्या बाजूच्या मोठय़ा संवेदनशील व्यक्ती डोंगरपाडय़ावर, आदिवासी भागांत जाऊन स्वत:चे श्रेयस आणि प्रेयस शोधत असतात. शहरे ही नगरसेवकांच्या ताब्यात देऊन बाकी सगळे इतरत्र चौफेर गेलेले असतात. तुम्ही मोठे होता तसे तुम्हाला लक्षात येते की तुमच्या मतामुळे कोणतेही सरकार निवडून येत नाही. तुम्ही देणगीदार होत असलात तर तुमच्या पाठिंब्याची संस्थांना गरज आहे, नाहीतर नाही. तुम्ही व्यक्तीपूजक होऊन त्यांच्या कलाकारी लीलांचे कौतुक करीत राहिलात तरच मोठय़ा सामाजिक व्यक्ती तुम्हाला जवळ येऊ देतील, नाहीतर नाही. मग शहरात जन्मून शहरातच वाढणारी जी मुलेमुली असतात आणि आजूबाजूला पाहत आणि विचार करत असतात, त्यांनी काय करायचे? त्यांनी उपलब्ध असलेले हेच दोन-तीन गणवेश घालायचे? की अमेरिकेला निघून जायचे? त्या सर्व मुलांना भांडवलवाद आणि मुक्त अर्थव्यवस्थेने सोपे उत्तर दिले. न लाजता पसे कमवायचे आणि आपल्याकडे दुर्लक्ष केलेल्या माणसांकडे दुर्लक्ष करायचे. त्यांना असे वाटले तर त्यात चुकीचे काही घडलेले नाही. कारण शहरी मध्यमवर्गीय माणसाचा विचार अनेक दशके महाराष्ट्रात कुणीही केलेला नाही. तो मध्यमवर्ग अचानक इतका पारंपरिक कसा काय झाला, त्या मध्यमवर्गाला अचानक पर्यायी विचार करणाऱ्या प्रवाहाबद्दल असलेली सहानुभूती कधी संपली, तो मध्यमवर्ग अचानक अशी मते का देऊ लागला, हे जे प्रश्न आजच्या काळात अनेक ज्येष्ठ विचारवंतांना पडून त्यांचे रुमाल ओले होतात त्या गांधीजींच्या नातवंडांना आज हे लक्षात यायला हवे, की काळ हा त्यांच्यासाठी थांबून राहिला नव्हता. तुम्हाला माहीत असलेला मध्यमवर्ग मरून जाऊन आता पुन्हा जन्मलेला आहे. तो १९८० सालातला मध्यमवर्ग नाही.

मी त्या काळात जन्मलेला मुलगा आहे- ज्याला काही प्रश्न असतील असे कुणाला वाटले नव्हते. अर्थव्यवस्था खुली होताना आणि स्थलांतरित माणसांचे लोंढे ठरावीक शहरांत येऊन राहू लागतानाचा काळ विशीत आणि तिशीत पाहिलेला. शहरी जाणीव, शहरी जगणे आणि शहरातील मानसिक आणि आर्थिक ताणेबाणे याबद्दल विचार करणारी आणि त्याबद्दल तरुण मुलांशी बोलणारी कोणतीही व्यवस्था आजूबाजूला नव्हती. परदेशातील देणग्यांवर समाजसेवा करणाऱ्या संस्था (मुख्यत: एड्स- जो आमच्यात कुणाला होत नसे अशी आमची हृदयापासून भक्ती होती.) आणि राजकीय नगरसेवक यांच्या कात्रीत शहरे वाढली आणि मोठी झाली तेव्हा अस्तित्वात असलेल्या कोणताही पर्यायी विचार करणाऱ्या ज्या हुकमी व्यक्ती आणि संस्था आज महाराष्ट्रात आहेत, त्या आमच्याशी बोलायला कधीही आल्या नाहीत. कारण आम्ही पुरेसे गरीबही नव्हतो आणि पुरेसे श्रीमंतही नव्हतो. शिवाय डोंगरपाडय़ावर राहत नव्हतो. देणगीदार व्हायची आमची ऐपत नव्हती. त्यामुळे आम्ही फक्त चाहते बनलो. Admirers. पूर्णवेळचे चाहते. बाकी काहीही नाही.

(उत्तरार्ध)

kundalkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2017 12:42 am

Web Title: sachin kundalkar article in loksatta lokrang
Next Stories
1 समाजाचे ऋण, रिक्षावाला मुन्ना आणि नोकरदार मी
2 समाजाचे ऋण, रिक्षावाला मुन्ना आणि नोकरदार मी भाग – १
3 मुंबई मेरी जान!
Just Now!
X