सावंतकाकूंच्या अंगणात विक्रमच्या होणाऱ्या बायकोविषयी चर्चा करत बसणाऱ्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपविषयी मी गेल्या रविवारी लिहायला सुरुवात केली तेव्हा माझा उद्देश कथा लिहायचा नसून अनेक वेगळ्या नावांनी मला भेटलेली माणसे त्यातून मांडायची होती. माझ्या मनातल्या वेगवेगळ्या मतांना आणि गोंधळांना नावे असलेल्या व्यक्ती बनवून मी अनेक वेळा ज्या प्रकारच्या चर्चामध्ये भाग घेतला, ते अनुभव त्यातून मांडायचे होते.

इतर कुणाहीप्रमाणे मी बायकांविषयी विचार करताना अनेक वेळा गोंधळून जाऊन त्या गोंधळात माझे दूषित आणि प्रस्थापित पूर्वग्रह आणि खरेखुरे विचित्र अनुभव मिसळून माझी मते मांडतो. आणि जवळजवळ सर्व वेळा माझ्या सिनेमातील, लिखाणातील आणि नाटकातील प्रमुख पात्रे स्त्रिया असल्या तरी मी कधीही त्यांचे फाजील लाड करून त्यांची बाजू घेत नाही. कारण मला ज्याप्रमाणे हुशार आणि चांगले स्त्री-पुरुष भेटले आहेत तसेच सामान्य किंवा बिनडोक स्त्री-पुरुषही भेटले आहेत. मी ‘बाई’ नावाच्या गोष्टीचे चांगल्या मुद्दय़ासाठीसुद्धा उदात्तीकरण करत बसत नाही. कारण त्यांच्यात आणि पुरुषांमध्ये कोणताही भेद नसतो.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…
shani surya yuti in kumbh rashi ended
शनि-सूर्याची युती संपली; या राशींचे लोक होतील मालामाल, मिळणार अमाप पैसै

फरक पडलेला दिसतो ते त्यांनी स्वत:ला सिद्ध करायच्या त्यांच्यावर पडलेल्या सक्तीवर! तुम्ही एकतर स्वयंपाकपाणी, मुलेबाळे, त्याग, देवधर्म, ‘मी दीराचे आणि जावेचे इतके इतके केले’, ‘मी नसते तर आमच्या ह्य़ांचे अवघड होते’.. असल्या प्रकारातल्या असाव्या लागता, किंवा मग तुम्ही डायरेक्ट विजया मेहता किंवा इंदिरा गांधीच असाव्या लागता. बिचाऱ्या मराठी आणि बंगाली मुलींवर एकतर प्रतिभावान असण्याची, किंवा डायरेक्ट त्यागमूर्ती असण्याची प्रचंड सक्ती केली गेलेली आपल्याला दिसते. त्या प्रमाणात भारतातील इतर प्रांतांमधील बायका साध्यासुध्या, मठ्ठ किंवा तालेवार असे त्यांना जे असायला हवे तसे असायला मोकळ्या असाव्यात. महाराष्ट्रात एखाद्या साध्यासुध्या ‘मनाली’ किंवा ‘वेदा’ अशी कल्पक नावे असलेल्या मुलीला ‘तू जिजाऊ किंवा सावित्रीची लेक आहेस’ असे कुणी अचानक सांगितले तर तिची लहानपणीच झोप उडून ती कंबर कसते आणि उभी राहते. पण कंबर कसून काय करायचे, हेच तिला कळत नसते. तिला ही मोठी जबाबदारी खरे तर नको असते. पण एकदा तुम्ही जिजाऊ  किंवा सावित्रीची लेक झालात, की मग काही न करून कसे बरे चालेल?

ज्यांना उत्तम आणि चांगले काम करून स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जगात पुढे जायचे असते ती माणसे गप्प बसून, कष्ट करून ते काम करतात आणि त्याचा आनंद घेतात. अशा अनेक मुली आणि मुले आहेत- ज्यांना कामाच्या ठिकाणचा लिंगभाव आणि लिंगभेद माहीत नसतो. ते अशा गोष्टी विसरून कष्ट करून, बुद्धी वापरून पुढे जात राहतात. पण असे जगायची आवड आणि सवय असायला लागते. सगळ्यांना ती असेलच असे नाही. आणि त्यामुळे सगळे सांभाळून कामाच्या पातळीवर विजय मिळवणारी मुलगी आपण आहोत का, याचा विचार प्रत्येक मुलीने नीट करायला हवा. आणि सगळे सांभाळायचे म्हणजे त्यात काय काय येणार आहे, याची सवय आपल्या जोडीदारांनाही करायला हवी आणि आपले नियम आपल्या कुटुंबाला नीट समजावून सांगायला हवेत.

काही न करता शांत बसून आयुष्य काढणे सोपे नसते. त्याला खूप ताकद असावी लागते. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला आर्थिक आणि मानसिक स्थैर्य देणारा जोडीदार असावा लागतो. मी अनेक जोडपी पाहिली आहेत- जी एकमेकाला अशा सुट्टय़ा देतात. दोन वर्षे त्यांच्यातील कुणी एकच जण काम करतो आणि एक जण पूर्ण सुट्टी घेतो. आणि सुट्टी ही सुट्टी असते. त्यात आवड नसलेले स्वयंपाकपाणी, हास्य- क्लबात जाणारे आणि चहा पीत सीरियल बघणारे सासू-सासरे आणि आणि घरकाम या गोष्टी नसतात.  नवीन गोष्टी शिकायला, वाचायला किंवा प्रवास करायला घेतलेली ती पूर्ण रिकाम्या वेळेची सुट्टी असते. आपण काय करतो याविषयी आपल्या कुटुंबाला आणि समाजाला उत्तर देणे आपल्याला कधीही बांधील नसते. ‘मी काहीही करत नाही..’ असे शांतपणे इतरांना सांगायचे धाडस शहरात किती जणांना असते? मलाही ते धाडस अजूनही आलेले नाहीये. मी प्रयत्न करत असतो. पण असे सांगणारी माणसे मला भेटली आहेत. मला अशा अनेक मुली आणि मुले माहिती आहेत. आणि मला त्यांचा फार हेवा वाटतो. कुणालाही घाबरून केवळ स्वत:ला सिद्ध करायला ते उगाचच समाजप्रिय कामे करीत बसत नाहीत. साधा चहासुद्धा बनवत नाहीत.

वाटेल ते करतात. वाचतात. लिहितात. फिरतात. नवी माणसे जोडतात. आपण कधी ट्रेकला किंवा प्रवासाला गेलो की आपल्याला अशी घरं सोडून लांब येऊन नव्या गोष्टी अनुभवणारी माणसे भेटतात. ती माणसे आपल्याला सांगतात, की मी डॉक्टर आहे, पण सध्या काही करत नाही. सुट्टी घेतली आहे. भटकतो आहे. किंवा.. मी शिकवतो कॉलेजात; पण आता मला सध्या स्वत:ला नवे काही शिकायचे आहे म्हणून मी शिकवणे थांबवून ब्रेक घेतला आहे. अशा पद्धतीने आपली व्यावसायिक किंवा कौटुंबिक ओळख संपूर्ण पुसून रिकामेपणा निवडणे हे फार अवघड आहे. असे करणारी माणसे मला फार आवडतात.

काहीही न करणाऱ्या मुलीविषयी माझ्या घरात, कुटुंबात आणि मित्रमंडळींमध्ये अनेक वेळा आश्चर्य आणि साशंकतेची भावना असते. कारण मी ज्या काळात आणि ज्या प्रकारच्या कुटुंबात राहतो आणि लहानचा मोठा झालो, तिथे रिकाम्या बसून राहणाऱ्या बायका आम्ही कधीही पाहिल्या नाहीत. अगदी सुट्टीच्या दिवशीही नाही. ज्या बायका आठवडाभर नोकरी करीत असत त्या शनिवार-रविवार आपल्या नवऱ्याचे आणि मुलांचे फाजील लाड पुरवत घरी राबत असताना मी सतत पाहिल्या. मोठा झालो आणि काम करू लागलो तशा आपल्या प्रत्येक दुर्दैवाचे खापर पुरुषांवर फोडून त्यांना खलनायक ठरवणाऱ्या नाटय़मय यशस्वी व्यावसायिक बायकाही पाहिल्या. आमची पिढी मोठी होताना टीव्हीवरती अशा जाहिराती येत असत- ज्यामध्ये उत्तम आणि चांगल्या स्त्रीची प्रतिमा ही घरचे सगळे सांभाळून नोकरी किंवा व्यवसाय करणारी अशी होती. त्यामुळे निवांतपणा आणि जाणीवपूर्वक निवडलेला रिकामेपणा याला मध्यमवर्गीय मूल्यांमध्ये काहीही किंमत उरली नाही. आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी काम करणे, किंवा आपण काहीतरी करत आहोत, रिकाम्या बसलेलो नाही, हे घरात आणि फेसबुकवर दाखवणे- हा एक नवा पायंडा पडलेला सध्या जो दिसतो आहे, त्याला भांडवलवादाने पोसलेल्या, सगळे सांभाळून घर चालवणाऱ्या जाहिराती जशा कारणीभूत आहेत तशीच स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची महाराष्ट्रात मी पाहिलेली आणि अनुभवलेली भ्रामक, गोंधळलेली आणि काही वेळा खोटी फॅशनसुद्धा कारणीभूत आहे. आपल्या समाजाने, धर्माने आणि कुटुंबव्यवस्थेने स्त्रीला नको तितके मोठे करून ठेवले आहे. मोठे म्हणजे ‘महत्त्वाचे’ नाही, तर ‘ग्लोरीफाय’ करून ठेवले आहे. धर्माप्रमाणेच स्त्रीचे खोटे आणि भयंकर उदात्तीकरण महाराष्ट्रातील कालबा झालेल्या स्त्रीवादी चळवळीने करून ठेवले आहे. अनेक कुटुंबे या जुन्या आदर्शवादी आणि पुस्तकी स्त्रीवादी विचारांच्या ताणाखाली कोसळलेली मी पाहिली आहेत. उदात्तीकरण करावे अशा फार तर दीड-दोन स्त्रिया आपल्या आजूबाजूला असताना त्यांना माता, भगिनी, पत्नी, लेक असली कुचकामी लेबले लावून जाहिरातीचा आणि राजकारणाचा माल बनवून ठेवले गेले आहे. या उदात्तीकरणाचे दडपण इतके मोठे केले गेले आहे, की ‘मला काम करायला जमणार नाही. मला कंटाळा येतो. मी काही न करता निवांत दोन वर्षे बसून राहणार आहे,’ हे म्हणण्याची सोयच आजच्या काळाने कुणालाही ठेवलेली नाही. याचे कारण feminism चे चुकीचे पडसाद आणि त्यातून उत्पन्न होणारे, नकळतपणे सतत धुसफूस करत जगायची सक्ती तयार करणारे नियम- हे आहेत. हुशार आणि संवेदनशील मुलीने रिकामे बसायचे ठरवले की तिच्याविषयी कुटुंबात आणि समाजात दुय्यम भावना तयार केली जाते याचा मी अनेक वेळा अनुभव घेतलेला आहे. आणि त्यामुळे सैरभैर होऊन आपल्याला न आवडणारे किंवा आपल्याला ज्यात अजिबातच गती नाही असे काम करत बसलेल्या बायका माझ्या आजूबाजूला खूप आहेत.

ज्यांचे आई-वडील कुणी हुशार, बुद्धिमान आणि मोठे नाहीत त्या मुली निदान थोडय़ा प्रमाणात या जाचातून सुटतात. पण तुमचे आई-वडील, सासू-सासरे किंवा इतर जवळचे कुणी जर समाजात महत्त्वाचे असे कुणी असतील तर मग तुमची प्रतिभावान किंवा सामाजिक जाणिवेचे असण्यापासून सुटका होत नाही. माझ्या अनेक मैत्रिणी अशा घरातल्या आहेत. आणि त्या त्यांना फारसे चांगले न येणारे काम करत बसलेल्या आहेत. याचे कारण ते करायची त्यांच्या प्रतिभावान पूर्वजांमुळे त्यांच्यावर सक्ती आहे.

माझी एक हुशार मैत्रीण आहे, जिने काही न करायचे ठरवले तेव्हा मला तिचे आश्चर्य वाटले. अनेक वर्षे तिने चांगला रिकामेपणा सोसला आणि पोसला. तिने आज पुण्यात ‘वारी’ नावाचे एक फार सुंदर कॅफे उभे केले आहे; ज्यामध्ये तिच्या निवांतपणाच्या आणि रिकामेपणाच्या मनातील विचारांचा फार चांगला पडसाद उमटलेला आहे. त्या कॅफेमध्ये उत्तम रुचकर जेवण आणि खूप सारी पुस्तके आहेत. आपण काही न करता तिथे वाचत बसून राहू शकतो. एका प्रकारे झेन तत्त्वज्ञानातील एक पापुद्रा तिने सोलून या कामात घातला आहे. मला तिचे म्हणणे कळायला फार वर्षे जावी लागली. पण आज त्या कामातून तिचे म्हणणे मला जेव्हा कळले, तेव्हा जाणीवपूर्वक स्वीकारलेला संपूर्ण रिकामेपणा ही चांगली गोष्ट असते यावर माझा विश्वास वाढत चालला आहे.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com