20 March 2018

News Flash

गृहिणी

आमच्या लहानपणी खूप गृहिणी असत. आता पूर्णवेळ गृहिणी हा प्रकार तसा कमी होत जातो आहे.

सचिन कुंडलकर | Updated: December 3, 2017 1:04 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

स्वयंपाक आणि घरकाम शिकण्याचा एक मोठा परिणाम माझ्यावर झाला तो म्हणजे ‘गृहिणी’ नावाची जी एक भारतीय जमात आहे, ज्या घरकाम आणि स्वयंपाकाचे प्रचंड भांडवल करून घरात सतत आपली पत जपत बसलेल्या असतात आणि भयंकर मोठय़ाने बोलून आपले म्हणणे लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांना चक्राकार सांगत बसलेल्या असतात, त्यांच्याविषयी उगाच दाटून आलेला माझा आदर कमी होऊन रसातळाला गेला. ‘‘मी तुमच्यासाठी इतके केले, मी होते म्हणून हे घर वर आले, मी हाडाची काडे करून, कोंडय़ाचा मांडा करून तुम्हाला वाढवले, मी होते म्हणून चार पैसे बाजूला तरी पडले, नाही तर तुझ्या वडिलांच्याने काही होणार नव्हते, मी एका साडीवर आणि चार काळ्या मण्यांवर हा संसार ओढला, मी खमकी निघाले म्हणून घरातील चांदीची का होईना, चार भांडी तुझ्या नावावर झाली, मी रात्री-अपरात्री पन्नास-पन्नास पोळ्या करून ह्यंनी जमवलेल्या गर्दीला जेवायला घातले आहे, मी कधी बाजारातून हळद आणली नाही, हळकुंडे फोडून माझे हात फाटले म्हणून ही चव आहे जेवणाला.. उगीच नाही, तुझ्या वडिलांचे काही सांगू नकोस, ते दिसतात तसे साधे नाहीत, तुम्ही लहान असताना मी कशाकशातून गेले याची कल्पना नाही तुम्हाला..’’ अशी अनेक सुंदर वाक्ये माझ्या लहानपणी आजूबाजूला दुपारच्या रिकाम्या शेकडो घरांमध्ये तरंगत असत- ती हळूहळू काळानुसार विझून गेली. तशा गृहिणी आता पुन्हा होणे नाही हे आता लक्षात येते. दोघांनी नोकऱ्या करून घराचे आणि गाडीचे हप्ते फेडणे हा उद्देश असलेल्या या काळात पूर्णवेळच्या सोशीक की काय म्हणतात त्या गृहिणी दिसेनाशा झाल्या. हातात दिलेली चकली किंवा करंजी मुकाटय़ाने चाखत आपल्या आया दुपारी एकटीने घरात जी बडबड करतात, ती बडबड ऐकणारी आमची पिढी ही शेवटचीच असावी. घरगुती स्त्रियांविषयी आदर, त्यागमूर्तीची भावना आणि त्यांच्या भावनिक राजकारणाला सहानुभूती असण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे असते, ते म्हणजे त्यांना येते ते तुम्हाला न येणे. त्यांना येते ते सगळे तुम्हाला येऊ  लागले की तुमचे स्त्रीविषयक भावनिक राजकारण बदलून जाते. जसे माझे झाले. स्वयंपाक आणि घरकाम येणे ही क्रिया वयात येण्याच्या क्रियेइतकी महत्त्वाची आणि तुमच्यात अंतर्बा बदल करणारी ठरते. मी लहानपणीच्या समाजात स्त्रीत्यागाचा आणि मग सुमित्रा भाव्यांकडे कामाला गेल्यावर तरुणपणी स्त्रीवादाचा चकली खात बसलेला पूर्णवेळ श्रोता होतो, तो उठून, पळून अंगणात खेळायला निघून गेलो. सोबत लहानपणी ऐकलेली त्याग, त्रास, अपमान, पाणउतारा, जाच, टोचणी, काळे मणी ही सगळी शब्दसंपत्ती घेऊन निघालो. आणि मग लिहू लागलो. ‘हक्क, मोर्चे, जाणीव, भान, आत्मसन्मान’ अशी स्त्रीवादाने शिकवलेली शब्दसंपत्ती माझ्या लिखाणात अजून तरी येऊ  शकलेली नाही. पण प्रवृत्ती कशी बदलेल हे सांगता येत नाही. कदाचित ती पुढे येईलसुद्धा.

लहानपणापासून तसा आतून मी बऱ्यापैकी स्त्रीद्वेष्टा माणूस आहे. सौम्य नव्हे, अगदी कडकडीत. बायकांच्या भावनिक साम्राज्याचे मला एका बाजूला अतिशय गूढ आकर्षण आणि दुसऱ्या बाजूला तीव्र कंटाळा आहे. माझ्यात असलेली ती निसर्गदत्त जाणीव आहे. स्वयंपाकाची आवड असल्याने आणि नंतर स्वयंपाक येऊ  लागल्याने मला हे उमजत गेले, की मला खरे तर  स्त्रियांचा कंटाळा नसून ‘गृहिणी’ नावाच्या आवाजी फटाक्यांचाच अतिशय तिटकारा आहे.काम करून आनंदाने जगणाऱ्या आणि केलेल्या कष्टाचे भांडवल न करणाऱ्या बायकांशी माझी प्रमाणाबाहेर मैत्री होते. स्वत:च्या निर्णयाची आणि आपण ज्यातून गेलो त्या चांगल्या-वाईट अनुभवांची शंभर टक्के जबाबदारी स्वत: घेणाऱ्या अनेक मुलींच्या सहवासात मी राहतो आणि काम करतो. त्यामुळे जुन्या गृहिणी या माझ्या समजुतीच्या बाहेरच्या प्राणी आहेत. कारण त्या कधीच आनंदी नसतात आणि सतत कुरकुर व बडबड करतात. इतकी, की मला अनेकदा ‘‘कशाला मग लग्न केलेत तुम्ही आणि मुले जन्माला घातलीत?’’ असे त्यांना विचारावेसे वाटते.

आमच्या लहानपणी खूप गृहिणी असत. आता पूर्णवेळ गृहिणी हा प्रकार तसा कमी होत जातो आहे. आमच्या लहानपणी गृहिणी हा प्रकार मोठय़ा शहरांत मराठी समाजात पुष्कळ होता. अगदी गुजरात- राजस्थानात असतील तितक्या गृहिणी पूर्वी महाराष्ट्रात असत. मी जात्याच बैठा आणि बाहेर जाऊन क्रिकेट वगैरे कधी न खेळलेला असल्याने माझ्या बालपणातील रिकाम्या वेळेत अशा गृहिणी नावाच्या वाघिणी मला पुरेपूर भेटल्या आणि त्यांनी माझे बालपण रंगीत आणि साजरे केले. माझ्या हातून लिहून होणाऱ्या जवळजवळ सर्व कथांना माझ्या आयुष्यातील या काळाची एक लिंबू पिळल्यासारखी चव आहे. जी. ए. कुलकर्णी मला फार लहानपणी आवडायला लागायचे महत्त्वाचे कारण- त्यांचा स्त्रियांच्या राजकारणाविषयीचा अगदी सोपा आणि पारदर्शक दृष्टिकोन आहे. संपूर्ण कंटाळ्याचा. त्यात त्यांना लाज वाटत नाही. अगदी आजच्या पुरोगामी की काय म्हणतात त्या काळात  हा स्त्रीविषयक दृष्टिकोन अगदी हेटाळणीचा ठरावा. पण तो असला तर तुमच्या लिखाणात तो आपसूक येतो. जसा तो त्यांच्या लिखाणात आहे. आणि तो वाचून मला अगदी लहानपणी हुश्श झाले आणि एखादा खेळगडी मिळावा तसे वाटले. अगदी बालवयाचा असल्यापासून आजूबाजूच्या मुलींनी आणि घरातल्या गृहिणींनी केलेल्या फालतू तक्रारी आणि घरगुती राजकारणाचे फाजील लाड मी कधी मनावर घेतले नाहीत. प्रत्येक जण आपल्या निर्णयाला जबाबदार असतो, ही साधी गोष्ट भारतीय बायकांना कळेल असे मला कधीच वाटले नाही. निदान माझ्या आजूबाजूच्या घरी बसून राहिलेल्या बायकांना पाहून तर ती खात्रीच झाली. अगदी नंतरच्या आयुष्यात पक्क्या स्त्रीवादी म्हणून नावाजल्या गेलेल्या व्यक्तींच्या बालेकिल्ल्यात, त्यांच्याच ताटात जेवून लहानाचा मोठा झालो तरी मनात निसर्गत: वस्तीला असलेला हा स्त्रियांच्या घरगुती भावनिक राजकारणाचा कंटाळा माझ्या मनातून जाता जाईना. मला सत्यजित राय यांची ‘चारुलता’ सोडल्यास इतर खऱ्या आयुष्यातील पूर्णवेळ गृहिणी फार कंटाळवाण्या वाटतात.

चारुलता ही एकच गृहिणी भारतात कमालीची अफलातून आहे. ठाकूर आणि राय या जोडगोळीने तिला असे कमालीचे साकारले आहे, की वाटते, गृहिणी व्हावे तर बंगालच्या मोठय़ा हवेल्यांमध्ये. गुजराती, मारवाडी, मराठी गृहिणी होणे हे अतिशय तुपकट, चिकट आणि बोजड काम असते. मुख्य म्हणजे या गृहिणींना कामे खूप करावी लागतात; जसे बंगालमधील भद्रलोकी गृहिणींचे होत नाही. जुन्या बंगालमधील तो संथ, सुंदर रिकामा वेळ, ते कामासाठी दूर दूर गेलेले नवरे, ते बुद्धिमान, देखणे, रिकामटेकडे कविमनाचे बंगाली दीर, त्या सुंदर रेशमी साडय़ा, कमरेला अडकवलेले किल्ल्यांचे जुडगे, ते चौसोपी पलंग, ते पानाचे डबे आणि मोठय़ा हवेल्यांमध्ये भरून राहिलेला रिकामा काळ. नुसता वेळ नाही, तर काळ. इथे महाराष्ट्रात नुसताच वेळ असतो. काळ नसतो. इथल्या अंधाऱ्या सामायिक न्हाणीघरे असलेल्या छोटय़ा घरांमध्ये गृहिणी होणे फार कंटाळवाणे असते, हे मी लहानपणी हजारो बायकांची लाखो गॉसिप्स ऐकून शिकलो आहे. मोलकरणी सोडून त्यांची बडबड ऐकणारे त्यांना कुणी नसते. हल्ली तशा निवांत मोलकरणी नसल्याने अशा सर्व गृहिणींचा ताफा फेसबुकवर दुपारभर बसलेला असतो.

आजूबाजूच्या जाणत्या आणि जवळच्या व्यक्तींनी घालूनपाडून बोलून, मला ओरडून, सल्ले देऊनही माझ्या मनातील तो सोपा आणि छोटा टोकदार असा स्त्रीद्वेष्टेपणा जाता जाईना. शांता गोखले मला एकदा माझी नाटके वाचून या विषयावर इतक्या बोलल्या की मला माझी भीती वाटू लागली. काही दिवस हातून लिहून झाले नाही. सुमित्रा भाव्यांनी तर माझ्यापुढे आता अगदी हात टेकले असतील. ‘कुठून या सापाला आपल्या स्त्रीवादी घरात दूध पाजले मी इतकी वर्षे?’ असे त्यांना दरवेळी वाटते आणि त्या मला बोल बोल बोलतात. पण चांगली गोष्ट ही की, सगळी माझी आवडती माणसे अजूनही हिरीरीने माझ्याशी बोलायला, भांडायला आणि माझे कान उपटायला तत्पर असतात. त्यामुळे मी चोरून एक कथा लिहायला घेतली- ज्यात मी गृहिणी असलेल्या बायकांविषयी अतिशय हेल्दी दृष्टिकोन ठेवला. ती अजून लिहून होतेच आहे. तिला काही आकारच येत नाहीए.

मराठी स्त्रियांवर कर्तृत्ववान होण्याची सक्ती आहे तशी सुप्त सामाजिक सक्ती भारतात इतर प्रांतांत नसते. घरी निवांत लोळत पडलात की हल्ली तुम्हाला कुणी गांभीर्याने घेत नाही, हा सगळ्यात मोठा जाच मेल्या पुरोगामी समाजाने करून ठेवला आहे. त्यामुळे कसली मजाच उरलेली नाही. काही नाही तर निदान भाषांतराचे काम तरी गृहिणींना करावेच लागते. आमच्या पुण्यात इंग्रजीतून मराठीत महिन्याला जी शेकडो पुस्तके पापड लाटल्याप्रमाणे भाषांतरित होतात त्याचे कारण हेच आहे. खांडेकर-फडके वाचणारी माझी आजीसुद्धा त्यामुळे शोभा डे वाचू लागली. रिकामा वेळ जरा म्हणून नाही. आणि मोलकरणीशी तासन् तास मारायच्या गप्पा तर अजिबातच नाहीत. ही कसली जगण्याची सक्ती आपण गृहिणींवर केली? मराठी भाषेतील मोठी शब्दसंपदा या जाचाने अगदी आटून जात आहे याचे कुणाला काहीच वाटत नाही. या भयंकर पुरोगामी जाचाने अगदी भक्कम उत्पन्न असलेल्या घरातील बाईलादेखील हल्ली पूर्णवेळ गृहिणी म्हणवून घेणे नकोसे वाटते. त्यामुळे अशा अनेक घाबरलेल्या गृहिणी मराठी उच्चभ्रू समाजात वावरताना दिसतात आणि पटकन् काहीतरी होण्यासाठी त्या धावपळ करतात. त्यांच्या सहवासाने आणि परिचयाने मला खूप ऊर्जा आणि गमतशीर कथासूत्रे मिळतात. त्याविषयी पुढे सांगतो..                          (क्रमश:)

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com

First Published on December 3, 2017 1:04 am

Web Title: sachin kundalkar article on housewife
 1. M
  Meera Phansekar
  Dec 11, 2017 at 1:33 pm
  छान लिहिले आहे...
  Reply
  1. A
   Asawari
   Dec 4, 2017 at 4:03 pm
   ा तुमचे लेख तसे नेहेमी आवडतात पण हा लेख जरा ताणल्यासारखा वाटतोय. तुम्ही ज्या सतत तक्रारी करणाऱ्या "त्या" काळाच्या "गृहिणी" चे वर्णन केले आहे त्यांच्या तक्रारीमागची कथा त्या सांगायचं प्रयत्न करत असतात. कारण त्यांनी केलेल्या कष्टांची आणि त्यागाची जाणीव कोणी ठेवली नसते. केलेल्या कामाचा कौतुक झाला नाही आणि उपेक्षा पदरी आली तर पुरुष काय स्त्री काय, तक्रार करणारच. असे अनेक पुरुष आहेत त्यांना असाच मोठ्या आवाजात गाऱ्हाणी मांडताना ऐकले आहे. त्यांना तुम्ही काय म्हणाल? तुमचा असा आत्यंतिक मत होण्याचा कारण तुम्ही खूप कमी गृहिणींना भेटला असावा असा वाटते. असो - तुमच्या पुढच्या लेखाची वाट पाहत आहे.
   Reply
   1. Y
    Yet another Shubhangi
    Dec 4, 2017 at 11:28 am
    I guess you usually try to make a point in our articles, however one-sided and biased. Maybe it's the literatural equivalent of disruptive technologies, and glad to see the fourth estate push it forward, as always. The sad part is, it displays you in such a poor light. ". आमच्या पुण्यात इंग्रजीतून मराठीत महिन्याला जी शेकडो पुस्तके पापड लाटल्याप्रमाणे भाषांतरित होतात" really????? can you name even 25 per month out of those? Women were the unpaid and unappreciated force for centuries, so perhaps in that time, their complaining was to make up for that lack of appreciation from people not too unlike you? By making two rotis and something tiny does not equate you and your cooking skills with women who had to do a lot more work round the clock and for a lot many people and for years, mostly without any appreciation whatsoever, and a lot of emotional abuse. Even today, many women spend half their lives walking for water for miles every day! You must have had a pretty pathetic childhood!!!!
    Reply
    1. A
     arun
     Dec 4, 2017 at 8:31 am
     " गृहिणी " या शब्दाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर त्यात तुम्हाला कारुण्यच दिसेल. न घरका न घाटंका म्हणजे न माहेरची न संसाराची अशी अवस्था करून घेऊन स्त्रियाना जगत होत्या. स्वतः:तील बौध्हक वकूब मोठा असूनही पुरुषी वर्चस्वामुळे कुचंबणा होत असलेल्या , काशीबाई कानिटकर, ताराबाई मोडक, मालतीबाई बेडेकर, डॉ. रखमा अशा कितीतरी स्त्रियांना बंड करूनच सदा सर्वाकाळ गृहिणी ही भूमिका बजावत स्वतः:ला मोठं करावं लागलं. स्वतः:च्या नवऱ्याकडून जराही मानसिक आधार नसलेल्या त्या कुठेतरी मन मोकळ्या करत होत्या म्हणूनच मानसिक रोगी बनल्या नाहीत. ( म्हणूनच भाषेला मातृभाषा म्हणत असावेत ). गृहिणीचं सगळंच काम विनामोबदला असतं. शून्य मेंदूने जन् ेल्या आपल्या मुलांनाही बौद्धिक आणि शारीरिक वाढ करण्यात हयात घालवणाऱ्या गृहिणीला जेव्हा " आई, तुला कळत नाही " म्हणतात तेव्हा मुलांना वाढवल्याचं ते क्रेडिट असतं. घरातील सर्वजण तिला गृहीत धरतात. कोणत्याही मुलांना, तुम्हालाही आपल्या आईला कोणता रंग, कोणता पदार्थ आवडतो ते माहित असतं ? पुरुष मात्र आपल्या बडबडीचा पैसे करत असतो. तो नाटककार, कथाकार, कंमेंटिटर असतो. जरा नजर बदला.
     Reply
     1. S
      Shubhangi
      Dec 4, 2017 at 2:16 am
      हा लेख वाचायचा निर्णय माझा असून त्यामुळे आलेल्या भिकार अनुभवाची जबाबदारी संपूर्णपणे माझी- इति मी एक भारतीय स्त्री
      Reply
      1. प्रसाद
       Dec 3, 2017 at 2:23 pm
       लेखात व्यक्त केलेली मते पटली तरी गृहिणींवर त्यात खूपच अन्याय केला आहे. याचे कारण म्हणजे मुलांकरता आम्ही किती खस्ता काढल्या ह्याची वर्णने फक्त गृहिणीच करतात असे नाही. लेखकाने घरी बसून अशी वाक्ये फक्त गृहिणींच्याच तोंडून ऐकली असावीत. पूर्वी आणि आताही करिअरिस्ट बायका प्रवासात, कामाच्या ठिकाणी आणि लंच करताना काय बोलतात हे लेखकाने ऐकले नसावे! यात बायकांना वेगळे काढून पुरुषांना क्लीन चीट द्यावी असेही काही नाही. पाल्याकरता आपण अपार कष्ट केले अशी भावना सगळ्याच स्त्री-पुरुष पालकांची असते. त्यात लाड करवून घेण्याच्या मुलांच्या त्या लहान वयाचा आणि लाड करण्यातच आनंद मिळण्याच्या मोठ्यांच्या वृत्तीचा मोठा वाटा असतो. घर सांभाळणे हा पूर्णवेळ व्यवसायच आहे, अर्थात नीट करायचा असेल तरच. वहीच्या एका पानावर इमारतीचा आणि जगाचाही नकाशा काढता येतो ... किती बारीकसारीक तपशिलांचे डिटे करायचे आहे हे महत्वाचे असते. घरकामाचेही तसेच आहे. सतारीच्या तारेचा मंजुळ नाद ऐकणाऱ्याला त्या तारेच्या खुंटीवर पडलेला ताण कधीच जाणवत नाही असे व.पु. म्हणाले होते. तात्पर्य इतकेच की एकांगी निष्कर्ष काढण्यात इतकी घाई नको.
       Reply
       1. आदिती
        Dec 3, 2017 at 11:05 am
        कंटाळवाण्या बायका दोन्ही कडे असतात. शहाणपणाचा नोकरी अथवा शिक्षणाशी काही संबंध नाही. एखादी कमी शिकलेली गृहीणी सुद्धा अर्थ पूर्ण संभाषण करू शकते. बंगाली बायकांचा साहिब बीबी और गुलाम पाहिला आहे का? त्यात कंटाळलेल्या गृहीणी आहेत.
        Reply
        1. Load More Comments