05 August 2020

News Flash

समाजाचे ऋण, रिक्षावाला मुन्ना आणि नोकरदार मी

अनेक माणसे दिवाळीत सामाजिक पर्यटन करायला भामरागड, आनंदवन असे फेरे करतात

प्रतिनिधिक छायाचित्र

पुनरुत्पादन करणारा प्राणी आणि पुनरुत्पादन न करणारा प्राणी असे माणसाचे मानसिक आणि सामाजिक पातळीवर दोन प्रकार असतात. पुनरुत्पादन करणारा माणूसप्राणी त्याच्या अंतस्थ मानसिक प्रवृत्तीने जे जगतो त्यातून समाजाचे निर्णय आकाराला येत असतात. आपल्यानंतर कुणीतरी उरणार आहे या जाणिवेने धर्म आणि संपत्ती यांचे आयोजन हा पुनरुत्पादन करणारा प्राणी करीत असतो. या पुनरुत्पादन करणाऱ्या प्राण्याकडे पुनरुत्पादन न करणारा प्राणी एका उत्सुकतेने पाहत असतो. प्राणिसंग्रहालयाच्या पिंजऱ्यातील श्वापद गजापलीकडे दात विचकत आणि आचरट हसत उभ्या असलेल्या माणसांकडे पाहते त्याप्रमाणे पुनरुत्पादन न करणारा प्राणी आजूबाजूच्या समाजाकडे आणि त्याच्या लैंगिक आणि आर्थिक जाणिवेच्या सपाट समजुतीकडे पाहत असतो. आपल्यानंतर कुणीही उरणार नाही या जाणिवेने समृद्ध असणाऱ्या माणसांचा समाज संपूर्ण वेगळा असतो.

समाजकार्य हे पुनरुत्पादन करणाऱ्या प्राण्याने पुनरुत्पादन करणाऱ्या दुसऱ्या मनुष्यप्राण्यासाठी केलेले असते. प्राध्यापकी वातावरणात जे समाज वाढतात त्यांची पर्यायी विचार करण्याची दृष्टी आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींकडे पाहायची दृष्टी ही आजूबाजूच्या समाजाप्रमाणेच मध्यमवर्गीय, पुस्तकी आणि  सोपी असते. नट आणि प्राध्यापक यांना आपल्या कामाचे तास संपले आहेत ही जाणीव कधीच येत नसते. ते दिवसभर आपण काम करीत असणे अपेक्षित असल्यासारखे इकडेतिकडे तोऱ्यात फिरत असतात. त्याचप्रमाणे प्राध्यापकी समाजातील वेगळा, निराळा आणि समाजोपयोगी विचार करणाऱ्या बुद्धिमान माणसांचे असते. कार्यरत समाजातील माणसे वेगळी असतात आणि प्राध्यापकी समाजातील माणसे वेगळी असतात. कार्यरत महानगरीय समाजात सभा, चर्चा, तेच तेच विचार मांडणाऱ्या बैठका करायला वेळ शिल्लक राहत नाही. त्या शहरांमध्ये सामाजिक कामाचे स्वरूप वेगळा आकार आणि चेहरा धारण करते.

गेल्या दोन दशकांचा महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी आणि उपक्रमांचा काळ हा आमटे कुटुंबीय, बंग दाम्पत्य, मेधा पाटकर यांना दैवत्व बहाल केले जाण्याचा काळ आहे. असे करून मध्यमवर्गीय आणि प्राध्यापकी समाजाने आपली मोठय़ा जबाबदारीतून सुटका करून घेतलेली असते. बहुतांशी प्राध्यापकी विचारांच्या पुस्तकी बुद्धिवादी माणसांना आपण समाजापेक्षा एक अंगुळे वरती चालत आहोत असे वाटत असले तरी तो त्यांचा भ्रम असतो. कोणताही प्राध्यापक हा त्याच्या आत्ये किंवा मामेबहिणीइतकाच साधा आणि सामान्य असतो. एकदा आपण कुणालाही दैवत्व बहाल केले की त्या व्यक्तीचे काम संपूर्ण मुळापासून समजून घेण्याची आपली जबाबदारी संपते. त्या व्यक्तींवर दिवाळी अंकात जे लेख येतात ते वाचले किंवा पुण्यातील प्रकाशकांनी त्यांची काढलेली पुस्तके वाचली की आपले मन काठोकाठ भरून येते. अनेक माणसे दिवाळीत सामाजिक पर्यटन करायला भामरागड, आनंदवन असे फेरे करतात. असे सगळे करून प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या रोजच्या ओढाताणीतून आणि बदलत्या परिस्थितीला तोंड देताना होणाऱ्या त्यांच्या दमणुकीतून समाज हुशारीने आपली सुटका करून घेतो. असा प्राध्यापकी समाज- जो स्वत:ला पुरोगामी समजतो- तो कोणत्या धार्मिक मठात जाण्याऐवजी अशा लोकांचे मठ उभारून आपली देवाला पुजण्याची आणि कुणाचे तरी पिढय़ाने ्पिढय़ा डोळे बंद करून ऐकण्याची भूक भागवत असतो. मी लहानाचा मोठा झालो त्या प्राध्यापकी समाजातील ज्या माणसांनी अशा पद्धतीने गेल्या दोन दशकांत या व्यक्तींना आणि कुटुंबांना दैवत्व बहाल केले आणि एक अद्भुतरम्य ऋणाचे दान या व्यक्तींना वाहिले, त्या चाहत्या माणसांनी समाजसेवेचे अफू खाल्ले आहे, हे आपल्याला लक्षात येईल. सभा भरवून बाष्कळ चर्चा करणारा हा प्राध्यापकी समाज खरेखुरे काम करणाऱ्या माणसांच्या कधीच कामी येत नाही. तो फक्त हवे असेल तर त्यांचे इगो कुरवाळायला मदत करतो. पूर्वी आमच्या शहरात प्राध्यापकी घरांमध्ये एक मूल नर्मदेला वाहण्याची रीत आली होती, ती याच ओढीने.

व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात महत्त्वाचे काम सातत्याने करणाऱ्या ‘मुक्तांगण’च्या प्रवक्त्या डॉ. अनिता अवचट आणि मुक्ता अवचट, ‘मिळून साऱ्याजणी’चे अफाट काम सांभाळणाऱ्या विद्या बाळ, ‘वनस्थळी’चे ग्रामीण भागातील शिक्षणाचे कार्य मेहनतीने चालवणाऱ्या निर्मला पुरंदरे, प्राथमिक शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या वर्षां सहस्रबुद्धे, शिक्षणाचे काम शिस्त आणि आधुनिक विचारसरणीने करणारे संशोधक विचारांचे तरुण नीलेश निमकर ही शांतपणे आणि सातत्याने काम करणारी आणि कमी बोलणारी माणसे. कोणतीही प्रसिद्धी किंवा कौटुंबिक सहानुभूती न मिळवता प्रचंड काम करणाऱ्या या माणसांनी सभा, सत्कार, भाषणे, पुस्तके, गंभीर चेहऱ्याने द्यायच्या मुलाखती, चित्रपट असे कोणतेही प्राध्यापकी समाजातील मोह केले नाहीत. या यादीत अजूनही शेकडो लोक आहेत- ज्यांची माहिती समाजाला नाही. कारण त्या माणसांनी काही सेन्सेशन तयार केलेले नाही. व्यक्तिपूजक समाजाच्या जाळ्यातून त्यांनी स्वत:ची सुटका करून घेऊन आपण निवडलेले आणि आनंदाने करत असलेले काम या व्यक्ती नेटाने करीत राहिल्या आणि अजूनही करीत आहेत.

समाजाने आपल्याला सुपरस्टार केले की आपल्या भूमिकेचे आणि कामाचे सुलभीकरण होत असते याची जाण या शहाण्या व्यक्तींना आहे. त्यामुळे प्रसिद्धी आणि स्तुती करणाऱ्या लोकांचे मोहोळ टाळून आपापले काम आपल्याला सुसंगत वाटेल त्या मार्गाने आणि कालसुसंगत भूमिकेतून करायची मुभा महाराष्ट्रात या इतर व्यक्तींना मिळाली आहे.

आमच्या शहरात आमटे कुणाकडे उतरतात त्या घराला तीर्थक्षेत्राची कळा येत असे. आमटे यांच्या तिसऱ्या पिढीतही हे वातावरण बदललेले नाही. इतरांपेक्षा वेगळे, अवघड आणि महत्त्वाचे काम करणाऱ्या व्यक्तीला समजून न घेता किंवा त्या व्यक्तीच्या कामाचे मूल्यमापन करून स्वत:च्या बुद्धीत आणि अनुभवात भर न घालता माणसे हे देवभक्तीचे काम फार उत्साहात करतात. माणसाला देव देव करण्याची भूक संपत नाही. मेधा पाटकर यांच्या मोठय़ा भक्त असलेल्या एक बाई मला म्हणाल्या, ‘‘मला नं, काही आजारबिजार झाला नं, तर मी त्या अमुक एक रुग्णालयातच जाते बाई. कारण तिथे नं ते रिझर्वेशनवाले डॉक्टर नसतात. उगाच तसली जातीची प्रमाणपत्रे दाखवून डॉक्टर झालेल्या माणसाच्या हातात आपले प्राण कशाला द्या?’’ हे मेधा पाटकर यांना समजले तर त्या या बाईंना नक्कीच धरणात ढकलून देतील. सभांना, मोर्चाना गर्दी करणारा आणि सामाजिक माणसांची चरित्रे वाचणारा त्यांचा चाहतावर्ग हा कधीच काही मनापासून ऐकत नसतो, काही अंगाला लावून घेत नसतो. तो त्याच्या अंगात वास्तव्याला असलेली कसलीतरी अपराधाची भावना अंगावरून धुऊन काढण्यासाठी हे सगळे करीत असतो. हा अपराध नक्की कसला असतो ते त्याला समजलेले नसते. पैशाचा असतो, की जातीचा असतो, किंवा आपण सामान्य आहोत आणि तसे असणे त्याला उमजलेले असते म्हणून तो स्वत:ला सजवण्यासाठी त्या सभांना किंवा त्या मोठय़ा व्यक्तींच्या सहवासात आलेला असतो, हे कळायला मार्ग नसतो.

टेकडय़ांनी वेढलेल्या आणि दुमडलेल्या कागदी मोरांनी सजलेल्या प्राध्यापकी आणि पुस्तकी समाजातून तुम्ही जर कधी महानगरीय कार्यरत आणि प्रदूषित वातावरणात सावकाश आलात आणि सुधीर पटवर्धन यांनी काढलेल्या एखाद्या चित्रासमोर उभे राहिलात की तुमची जाणीव एका फटक्यात बदलते. कलेचे प्रयोजन काय, याचे उत्तर तुम्हाला सावकाश झिरपत मनात मिळू लागते. सुधीर पटवर्धन यांची चित्रमालिका तुम्ही कधी अनुभवली आहे का? जयंत पवार यांचे एखादे नाटक तुम्ही समजून पाहिले किंवा वाचले आहे का? हजार सभा आणि दोनेकशे पुस्तकांच्या संवादाचे आणि अनुभूतीचे काम पटवर्धन यांचे एकच एक चित्र करते. तुम्हाला सुधीर पटवर्धन माहीत आहेत का? बहुधा नसतील. तुम्ही त्यांचे काम पाहिले आहे का? बहुधा नसेल. कारण ते सत्काराला, सभेला फारसे जात नाहीत. अजून खूप काम करतात. कलाकाराने एखाद्या विशिष्ट विचारसरणीला पाठिंबा कसा द्यावा? कलाकाराने एका टोकदार दृश्यात्मक जाणिवेतून आजूबाजूच्या समाजाचे वर्णन कसे करावे? कामाला राजकीय परिमाण कसे द्यावे? याचे सकस आणि ताकदवान उदाहरण चित्रकार सुधीर पटवर्धन आणि चित्रकार गीव पटेल हे आहेत. त्यांची चित्रे सगळ्यांना पाहता यावीत म्हणून ते खूप परिश्रमपूर्वक प्रवास आणि प्रदर्शने करतात. पण आपल्या व्यक्तिपूजक समाजसेवेच्या मध्यमवर्गीय चौकटीत ते बसत नाहीत. त्यामुळे कितीही वय वाढले तरी आपल्याला त्यांची ओळख नाही.

याचे कारण आपण सगळे जुनाट झालो आहोत आणि आपल्या मनातील दिनदर्शिकेवर अजूनही १९६८ साल चालू आहे- ज्यातून बाहेर पडायला आपल्याला भीती वाटते, हे आहे. त्यामुळे आपण भाबडेपणाचा आणि कमकुवतपणाचा समाजसेवेचा एक प्राध्यापकी भावनिक मार्ग निवडलेला समाज आहोत.

क्रमश:

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2017 3:22 am

Web Title: sachin kundalkar article on true social activist behind the curtain
Next Stories
1 समाजाचे ऋण, रिक्षावाला मुन्ना आणि नोकरदार मी भाग – १
2 मुंबई मेरी जान!
3 एकच तिकीट
Just Now!
X