05 August 2020

News Flash

दोन रात्री

मी रात्री फार उशिरापर्यंत जागू शकत नाही.

मी रात्री फार उशिरापर्यंत जागू शकत नाही. मी सकाळी लवकर ताजातवाना असणारा माणूस आहे. मी पहाटे कितीही वाजता उठू शकतो. उठून व्यायाम करून लिहायला बसू शकतो, घरकाम करू शकतो. मला मित्रांना उत्तम ब्रेकफास्ट मिळतो अशा कॅफेमध्ये सकाळी लवकर भेटायला फार आवडते. सकाळी लवकर माझ्या मनात आणि शरीरात अपूर्व उत्साह आणि चेतना असते. मला वर्षांनुवर्षे ओळखणारे माझे जवळचे मित्र-मैत्रिणी माझी या विषयावर भरपूर चेष्टा करतात. कारण मी कधीही त्यांच्यासोबत रात्रभर चालणाऱ्या पाटर्य़ाना जाऊ  शकत नाही. इतकेच काय, मी माझ्या सिनेमात रात्री घडणारे प्रसंग शूट करत असतो तेव्हा सेटवर बारा-एक वाजता सरळ झोपून गेलेला असतो. माझ्या तोंडावर पाणी मारून मला अनेक वेळा उठवले गेले आहे. चहा, कॉफी पाजून मला सकाळपर्यंत जागे ठेवले गेले आहे. रात्री बारा-एक वाजून गेले, की सेटवर मी सगळे टेक ओके करतो. कधीच नटांना पुढचा टेक घ्यायला लावत नाही. मग माझे सहकारी किंवा स्वत: नट मला अजून अजून काही टेक्स घ्यायला भाग पाडतात. रात्री उशिरा माझे कामात मुळीच लक्ष लागत नाही. इतके की, हल्ली मी शूटिंग सुरू होण्याआधी स्क्रिप्ट हातात घेऊन बसतो आणि रात्री घडतील असे जे प्रसंग लिहिलेले असतात ते दिवसा घडतील असे लिहून काढतो. उगाच त्रास कशाला करून घ्या? कुठल्यातरी प्रसंगात दोन माणसे रात्रीच्या जेवणानंतर गच्चीत बसून बोलत असतील, तर मी तो प्रसंग सरळ संध्याकाळी चहा घेताना घडवून आणतो. म्हणजे जागरणाची पाळी येऊ नये.

रात्रभर जागून गप्पा मारणाऱ्या किंवा मुद्दाम रात्री काम करणाऱ्या माणसांचे मला तितकेच आश्चर्य वाटते जितके निशाचर माणसांना भल्या पहाटे उठून तरातरा कामाला लागणाऱ्या माणसांचे वाटत असते. मी अनेक वेळा दुष्ट माणसासारखा घरी आलेल्या मित्रांना खूप वाईट वागवून रात्री बारा वाजायच्या आत बाहेर काढू शकतो आणि ते गेले नाहीत तर मी सरळ आत जाऊन गुडूप झोपी जातो. माझे अनेक संगीतक्षेत्रात काम करणारे मित्र कामाला लागतात रात्री दहा वाजता. पहाटे दीड-दोन वाजता ते अतिशय उत्साहात आणि उमेदीने काम करत असतात. अमित त्रिवेदी या संगीतकारासोबत काम करताना मी हा अनुभव घेतला आहे. तो मला आनंदाने उडय़ा मारत नवीन काही सुचलेले ऐकवायचा तेव्हा मी वाकडा चेहरा करून झोपाळलेला स्टुडिओच्या एका कोपऱ्यात पडून असायचो.

हेच मला कुणी पहाटे पाच वाजता तयार होऊन कामाला यायला सांगा. मी पूर्ण उत्साहात असतो. माझ्या सेटवर सकाळी सातच्या शिफ्टचा नियम असतो आणि जवळजवळ सगळे तंत्रज्ञ आणि कलाकार माझ्यावर रागावून सकाळी सातच्या शिफ्टचा जाच सहन करत असतात.

रात्रीची माणसे आणि सकाळची माणसे असे माणसांच्या मेंदूचे दोन प्रकार असावेत. बोटांवर मोजता येतील अशा काही वेळा आहेत जेव्हा मी रात्रभर अजिबात न झोपता जागा राहिलो असेन. ते अनुभव माझ्यासाठी फार मोलाचे आहेत. कारण तेव्हा असे काहीतरी विलक्षण घडले असणार, ज्यामुळे माझ्या मनाने ही माझी एकसुरी सवय मोडायचे ठरवले असेल. हे प्रसंग कामाच्या वेळा आणि रात्रीच्या शूटिंग शिफ्ट सोडून घडलेले आहेत. माझ्या मनावर अजुनी कोरले गेले आहेत. त्यातल्या दोन रात्री तर मी कधीच विसरू शकत नाही. याला योगायोग म्हणता येईल किंवा त्या वातावरणाचा आणि हवेचा परिणाम म्हणता येईल, त्या दोन्ही रात्री माझ्या देशापासून लांब असलेल्या एकाच देशातल्या आहेत. एकमेकींपासून काळाने खूप लांब असलेल्या त्या दोन रात्री; दोघींमध्ये बारा वर्षांचे अंतर आहे. ऋतू आणि हवासुद्धा वेगळी आहे. माझे शरीर आणि माझे मन निराळे आहे. त्या रात्री इतक्या शांतपणे माझ्या आत राहायला आल्या आहेत, की मी त्यांच्याकडे आठवण म्हणून नाही तर चालू क्षणातील ऊर्जा म्हणून पाहतो. त्यामुळे त्यांचे वर्णन मला भूतकाळात करणे शक्य होत नाही. त्या रात्रींमधील घरे आणि माणसे आता माझ्या आजूबाजूला नाहीत. त्या रात्री पुन्हा तयार करता येणार नाहीत. तरीही मी त्यांचे वर्णन नेहमी वर्तमानकाळात करतो. असे का?

मी विद्यार्थी आहे. ठरलेले काही महिने एका शिष्यवृत्तीच्या मदतीने इथे राहायला आलो आहे. तो काळ संपत आला आहे. गेले काही महिने या शहरात बारा देशांतल्या बारा मुलांनी घर तयार केले. आम्ही एका ठिकाणी शिकलो, राहिलो, आपापल्या पहिल्या फिल्म बनवल्या आणि आता पुढील आठवडय़ात परत जायची वेळ आली आहे. इथून परत जाऊ  तेव्हा सगळे बदलले असेल. आमच्या सोबतचे अनेक विद्यार्थी गेल्या दोन दिवसांत आपापल्या देशात परत गेले आहेत. मी दोन दिवसांनी निघणार आहे. ती नाही. तिला तिच्या देशात- रुमानियाला परत जायचेच नाही. कारण तिथे जाऊन करण्यासारखे काही नाही. ती इथेच राहून काम शोधणार आहे. मला परत जायला माझा भलामोठा गोंगाटाचा देश आहे. तिथे मला भरपूर काम असणार आहे. आम्ही परत कधी आणि कसे भेटू हे मला माहीत नाही. आज आम्ही दोघांनी शांतपणे फिरायला जायचे ठरवले आहे. जाण्याआधी मी हॉटेलमध्ये तिच्या खोलीच्या दारावर टकटक करतो. ती दार उघडते. तिच्या खोलीला मोठी बाल्कनी आहे, जिथे तिने म्युझिक लावले आहे. मी चौकोनी ठोकळेबाज माणूस. मला नाचता येत नाही. पण ती माझा हात हातात घेऊन मला म्युझिकवर तिच्यासोबत नाचायला भाग पाडते. हॉटेलच्या समोरच्या घरातून एक म्हाताऱ्या आजी आमच्याकडे पाहात हसत आहेत. आम्ही पिशवीत वाईनची बाटली आणि दोन ग्लास घेऊन चालायला बाहेर पडतो. उन्हाळा असल्याने सूर्य रात्री साडेनऊ -दहाशिवाय मावळणार नाही. माझ्या अंगात कसलीशी ऊब आली आहे. डोळ्यात चमक आहे. आयुष्यातला सोपेपणा चालू असण्याचा तो विशीतला काळ आहे. म्हणजे विशी नुकती सुरू झाली आहे. आपण ठरवू तसेच पुढे सगळे होत जाईल असा विश्वास मनात आहे. या शहराविषयी आणि इथे आलेल्या सुंदर अनुभवांविषयी परत जाऊन किती बोलू आणि किती नाही असे सगळे मनात झाले आहे. एकमेकांचा हात हातात घेऊन आम्ही दोघे चालत आहोत..

पॅरिस हे वर्तुळाकार शहर आहे. लांबवर आणि निवांत चालत राहण्यासाठी याच्याइतके सुंदर शहर जगात दुसरे नसेल. हे शहर तुमच्या गतीने तुम्हाला चालू देते. वेगाची सक्ती करत नाही. गेले काही महिने चालून चालून आम्ही हे शहर पिंजून काढले आहे. मध्येच काहीतरी बोलत आणि मध्येच शांत बसत आम्ही दोघे या ओळखीच्या रस्त्यांवरून चालून घेत आहोत. मी परत जाणार आणि इथे परतून कधी येणार याची खात्री नसल्याने, आणि ती विद्यार्थीदशेतील तिचा हा शेवटचा आठवडा असल्याने. पुढील आठवडय़ापासून तिला मिळणारे पैसे थांबणार. तिला कुठेतरी नोकरी मिळवून पैसे कमवावे लागणार. सोळा ते वीस वर्षांपर्यंत कुणावरतरी अवलंबून राहून आयुष्याचा आनंद घेण्याचा एक काळ असतो. तो वेगाने संपतो. तिचा संपत आला आहे हे तिला दिसते आहे. आम्ही मध्येच नदीच्या काठावर बसतो. पिशवीत आणलेली वाईन ग्लासमध्ये ओतून समोर हिरव्या पाण्याकडे पाहात ती रिचवत राहतो. उठून पुन्हा चालत राहतो.. जुन्या इमारतींकडे पाहात, आजूबाजूच्या टूरिस्ट गर्दीकडे पाहात. रात्री बारा वाजता मी तिला म्हणतो की, ‘मला एकदा आपले फिल्म स्कूल पाहायचे आहे. जाण्याआधी एकदा शेवटचे.’ आम्ही तिथून पुरेसे लांब आहोत. ती म्हणते की, ‘मी इथेच बसते. तू जाऊन पाहून ये.’ आम्ही लॅटिन क्वार्टरमधील एका बारमध्ये बसलो आहोत. पण मी तिला तिथे सोडून जायला तयार नाही. मी परत आलो आणि ती तिथे नसेल तर?

इतर शहरे माझ्याप्रमाणे सकाळी जागी होतात तसे पॅरिस रात्री पुन्हा एकदा जागे होते. त्या शहराचा तो स्वभाव आहे. त्याला दोन मुंडकी आहेत. दोन्ही आळीपाळीने झोपतात आणि जागी असतात. क्वचितप्रसंगी दोन्हीही जागी असतात.     (क्रमश:)

– सचिन कुंडलकर

kundalkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2017 3:34 am

Web Title: sachin kundalkar articles in marathi on night shift jobs
Next Stories
1 नैराश्याची सुबक नोंदवही (भाग ३)
2 नैराश्याची सुबक नोंदवही (भाग २)
3 नैराश्याची सुबक नोंदवही (भाग १)
Just Now!
X