05 April 2020

News Flash

गुणी आणि कर्तबगार नटय़ा

चित्रपटाचा साहाय्यक म्हणून काम करताना तुमच्या कामाला एक ठरावीक असे स्वरूप नसते.

माधुरी तिच्या मागे बसून गाण्यातून तिला कानात काहीतरी सांगत आहे.

चित्रपटाचा साहाय्यक म्हणून काम करताना तुमच्या कामाला एक ठरावीक असे स्वरूप नसते. चित्रपट बनवायला शिकण्याची ती कार्यशाळा असते. तुमच्या आवडीनुसार, कुवतीनुसार आणि मनात असलेल्या उत्साहानुसार तुम्ही जितके शिकाल तितके थोडे असते. चित्रपट बनताना मानवी व्यवहार, माणसांची मने, त्यांचे राग-लोभ, आकर्षणे फार तीक्ष्ण होऊन बसतात. चित्रपट बनवणे हे अतिशय ताणाचे आणि जबाबदारीचे काम असते. सेटवरील नव्या माणसाला कुणीही कधीही टपली मारू शकते, ओरडू शकते. चांगल्या गोष्टींचे श्रेय मोठी माणसे पटकन् घेतात. पण थोडीशी जरी चूक झाली तरी साहाय्यकांना फार पटकन् वेठीला धरले जाते. काम चालू असताना सिनेमाला जातपात, लिंगभेद काहीही माहीत नसते. उत्तम शॉट मिळवण्यासाठी सेटवरील प्रत्येकजण झटत असतो. जे सिनेमाच्या संस्कृतीला उपरे नाहीत, त्यांनाच हे लक्षात येईल, की सेटवर तयार झालेली आकर्षणे, राग-लोभ आणि द्वेष हे चित्रीकरण संपताच विरून जातात. कारण कामाच्या धगीत ते केले गेलेले असतात. चित्रपट संपताच तो तांडा फुटतो आणि सगळे विखरून नव्या युनिटमध्ये नव्या कामाला लागतात. एकमेकांशी रोजचे त्रोटक संबंध उरतात. दरवेळी कोणताही चित्रपट पाहताना त्या लोकांना त्या सेटवर तयार झालेले राग-लोभ, मैत्री, आकर्षणे, भांडणे, शिव्याशाप, जोडलेली आणि तोडलेली माणसे आठवतात. पण सिनेमा करणाऱ्या माणसाचे मन हे दर कामागणिक पुढे जाणारे असते. साहाय्यक म्हणून काम करताना अनेक तांत्रिक आणि सर्जक शिक्षणासोबत तुम्हाला ही जोडण्या-तोडण्याची मानसिक तालीम मिळालेली असते. ती तालीम सिनेमाबाहेरच्या लोकांच्या समजुतीबाहेरची असते.

रीमाने मला सांगितलेले पहिले काम हे पुडी आणण्याचे होते. माझे वडील माझ्या लहानपणीपासून तंबाखू खात असल्याने पुडी आणणे माझ्यासाठी नवे नव्हते. मी ‘कोणती?’ असे विचारताच तिने मला तिच्याकडची संपत आलेली गायछापची खाकी रंगाची पुडी दाखवली आणि ‘पटकन् जाऊन ये’ असे सांगून पिटाळले. ती माझी आणि तिची पहिली ओळख असावी. मी वीसेक वर्षांचा असेन. आम्ही पुण्यात एका चित्रपटाचे शूटिंग करत होतो. मला रीमाला भेटायला मिळणार म्हणून मी फार उत्साहात होतो. मी साहाय्यक दिग्दर्शक होतो आणि रीमाला रोज हॉटेलवरून गाडीतून घेऊन येण्याचे काम मी हौसेने स्वत:कडे घेतले होते. ती माझी फार आवडती नटी. अगदी उभे राहून ज्यांना सॅल्यूट मारावा असे काही मोजके चित्रपट कलाकार महाराष्ट्रात आहेत, त्यांच्यापैकी माझ्यासाठी तिचा नंबर फार वरचा होता. तिला आठवडय़ातून दोन-तीनदा पुडय़ा आणून देताना मला फार आनंद होत असे. काही वेळा तिला व्हिस्की पिताना गप्पा मारायला ती मला हॉटेलच्या खोलीवर थांबून घेत असे. मी बोलेन ते ऐकून घेत असे. तिने भरपूर प्रवास केले होते. माणसे पाहिली होती. तिच्या आत माणसाची सोनोग्राफी करण्याचे मशीन आहे, असे ती मला सांगायची. सतत प्रश्न विचारायची. नवीन गोष्टी समजून घ्यायची. सर्वात आकर्षक क्षण असायचा तो म्हणजे शॉट सुरू झाला की अंगात वीज शिरावी तशी ती एका सेकंदात भूमिकेत शिरायची. उगाच सेटवर वाकडा चेहरा करून गंभीरपणाचा आव आणत काही नट भूमिकांची तयारी करत बसलेले असतात तशी ती अजिबात नव्हती.

महाराष्ट्रात सिनेमामध्ये ‘मावश्या-माम्या’ संस्कृती फार पूर्वीपासून बोकाळली आहे. आपल्या कामाच्या जागी पटकन् घरगुतीपणा तयार केला की आपला आळस, आपले दुर्गुण आणि आपला कमकुवतपणा लपवायला मदत होते. त्यामुळे मराठी रंगभूमीवरील सतत  घोळक्याने जगणाऱ्या भोंगळ माणसांसारखी मराठी सिनेमातसुद्धा मावशी, आत्या, मामा अशी भोंगळ, खोटी संस्कृती आहे. मराठी नाटके आणि सिनेमे हे प्रामुख्याने आपली लग्ने जमवायला, एकत्र दारू प्यायला किंवा बसमधून लांबवर हिंडत आडगावी प्रयोग करीत आठवणी आणि किस्से गोळा करत म्हातारे व्हायला केली जातात, असे अजूनही आपल्या अनेक दिग्गज नटांना वाटते. मनाचा मोकळेपणा नसल्याने आणि मराठी बोलीभाषेचा शहरी अवतारात फार विकास झाला नसल्याने चित्रपटसृष्टीतील सगळे एक तर एकमेकांना ‘सर’ किंवा ‘मॅडम’ म्हणत बसतात, किंवा अनेक माणसे ‘जी’चे शेपूट नावापुढे जोडतात. उरलेले नाटकाच्या वातावरणातून आलेले लोक त्यांच्यापेक्षा मोठय़ा लोकांना ‘अमुक मामा, तमुक मावशी’, ‘अमकी ताई, तमका दादा’ असे म्हणून स्वत:चे आभासी कुटुंब आणि खोटी जवळीक वाढवत बसतात.

रीमा ही फक्त रीमा होती. मी सुरुवातीला प्रथेप्रमाणे तिला ‘रीमाताई’ अशी हाक मारताच तिने मला फटकारून माझ्या चिंध्या केल्या होत्या. मी तेव्हापासून तिला ‘अहो रीमा’ अशी सुटसुटीत हाक मारत असे. रीमा गेली तेव्हा मला सगळ्यात कोणत्या विचाराने अस्वस्थ व्हायला झाले असेल, तर आपण कधीही तिच्यासोबत काम करू शकणार नाही, या त्रासदायक विचाराने. मी तिच्यासोबत एक नवीन चित्रपट करण्याची संपूर्ण तयारी करून बसलो होतो व आम्ही दोघेही त्या सिनेमाची फार वाट पाहत होतो.

रीमा स्वत:च्या बळावर ठाम टिकून उभी असलेली बाई होती. तिच्या आजूबाजूला सावल्या नव्हत्या. माणसांचे लटांबर नसायचे. ती तिचा खमका एकटेपणा पर्समध्ये टाकून फिरायची. ती तिचे आडनाव आणि तिचा खाजगीपणा घेऊन कामाला आलेली मी कधीही पाहिली नाही. अशा बायका महाराष्ट्रात दुर्मीळ असल्याने मला पूर्वीपासून जाम म्हणजे फारच आवडतात. खमक्या, कणखर आणि संपूर्ण एकटय़ा. शिवाय खूप गुणी आणि मेहनती. महाराष्ट्राने निर्माण केलेल्या नटय़ा हे आपल्या देशातील चित्रपटसृष्टीचे भूषण आहे. देखण्या, मेहनती आणि कर्तबगार नटय़ांची महाराष्ट्राने परंपरा तयार केली आहे.

मराठी नायक हे नेहमीच बिचारे मध्यमवयीन, पोट सुटलेले आणि  सामान्य असतात. ते वीस वर्षांचे असतात आणि मग एकदम चाळीस वर्षांचे असतात. अधेमधे कुणीच नसते. त्यांना पाठांतर किंवा अभिनय अफाट येतो, पण ते सिनेमाचा पडदा उजळून आपल्याला बेभान करून टाकू शकत नाहीत. पण मराठी नटय़ांचे याच्या अगदी उलट आहे. असे काय कारण असावे, की महाराष्ट्राने फारच अफलातून नटय़ा भारतीय चित्रपटसृष्टीला दिल्या आणि त्यांनी भाषांची बंधने सोडून कामे केली? अगदी नूतन, तनुजा  किंवा त्याच्या खूप आधीपासूनही अनेकजणी आहेत. आणि त्यानंतर स्मिता, रीमा, माधुरी, सोनाली, उर्मिला आणि आता राधिका. मला या गोष्टीचे फारच आश्चर्य वाटते. रीमा कोणत्याच बाजूने नुसतीच मराठी दिग्गज बाई होऊन बसली नव्हती. ती त्याच्या पार पोचली होती. ती तिखट, स्पष्टवक्ती आणि काही वेळा भीती वाटावी अशी उद्धट होती. पण गप्पा मारताना ती वय आणि सिनेमातली स्टार असण्याची आपली जागा विसरून साधेपणाने भरभक्कम बोलायची, खाऊपिऊ  घालायची, भांडायची आणि दमही द्यायची.

चार महिन्यांपूर्वी तिने मला फोन करून घरी बोलावले. हे सांगायला, की तिला माझ्याशी आम्ही करत असलेल्या चित्रपटाच्या पटकथेविषयी  काही बोलायचे आहे. आणि ती दहीवडे बनवणार आहे. मला अजिबातच दहीवडे आवडत नाहीत, तुम्ही प्लीज- काहीतरी दुसरे बनवा, असे मी तिला सांगूनही तिने तिला हवे तेच खायला बनवले होते. मला ते फार उत्साहात खाऊ  घातले होते. मी कंटाळलेला चेहरा करून ते खाल्ले. आमची ती शेवटची भेट. ती निघताना लिफ्टपाशी सोडायला आलेली. परत कधीच भेटणार नाही हे आपल्याला अशा वेळी ठाऊक नसते, ही किती भयंकर आहे. आपण ती शेवटची भेट अगदी साधेपणाने घेतो. त्या माणसाशी मोकळेढाकळे आणि अगदी सपक वागतो. आणि अचानक तो माणूस नष्ट होतो. परवा ती अचानक गेली तेव्हा मला तिचा ‘हम आपके है कौन’मधील एका गाण्यातील  तेजस्वी चेहरा दिवसभर आठवत राहिला. माधुरी तिच्या मागे बसून गाण्यातून तिला कानात काहीतरी सांगत आहे. तो अविस्मरणीय शॉट. मला रीमा एकदा टाळी देऊन म्हणाली होती की, ‘‘अरे मी, माधुरी आणि रेणुका अशा तीन मराठी खमक्या मुली होतो म्हणून तो सिनेमा इतका चढला आणि तगला..’’असे म्हणून ती जोरजोरात हसत बसली होती.

काही महिन्यांपूर्वी सुलभा देशपांडे अशाच कायमच्या गेल्या. कधी एकत्र काम करण्याची शक्यता संपवून गेल्या. आणि आता रीमा गेली. सुलभाताईसुद्धा अशाच होत्या. त्यांच्या जवळ जाऊन वायफळ बोलायची टाप व्हायची नाही. वय वाढले तरी काही घरगुती कारणांनी त्या खूप कष्ट करत भरपूर चित्रपटांत कामे करीत राहिल्या. अंगावर दुखणे काढत राहिल्या, पण घरी बसून राहिल्या नाहीत. अफाट काम आणि अघळपघळपणा कमी. भूतकाळात उगीच रमायची वृत्ती नाही. कामाला चोख. बुद्धी तीक्ष्ण. आणि आपण इथे सेटवर मज्जा करायला आलेलो नसून पैसे कमावून घर चालवायला आलो आहोत याचे सतत तीक्ष्ण भान. प्रत्येक भूमिका समजून प्रेमाने आणि उत्साहाने करणाऱ्या. मग भाषा कोणतीही असो.

या दोघींसोबत मी एकदाही चित्रपट बनवला नाही हे माझे फार मोठे दुर्दैव आहे.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2017 3:27 am

Web Title: talented and capable actress reema lagoo madhuri dixit
Next Stories
1 आपलीशी उबदार घरे
2 ब्रिटिश मालकीचे इतरांचे लंडन!
3 शहराचे छायाचित्र (भाग- २)
Just Now!
X